मुंबई २६ नोव्हेंबर : अनेक खवय्यांना वेगवेगळ्या पदार्थांची चव घ्यायला आवडते. चायनीज, इटालियन, थायफूड आणि भारतीय पदार्थांची रेस्टॉरंट्स आपल्याला मोठ्या प्रमाणात दिसतात; पण इराणी रेस्टॉरंट्सची संख्या तुलनेने कमी असते. त्यामुळे अनेकांनी अस्सल पारशी पदार्थांची चव चाखलेली नसते. खाद्यप्रेमी पारशी समुदाय भारतात गुजरात आणि मुंबईमध्ये मोठ्या प्रमाणात स्थायिक झाला. त्यानंतर त्यांनी गोवा, पोर्तुगीज आणि ब्रिटिशांचा प्रभाव असलेल्या त्यांच्या इराणी पाककृती तयार केल्या.
इराणी पदार्थ खूपच लज्जतदार असतात. तुम्हालाही त्यांची चव चाखायची असेल तर मुंबईतल्या पाच रेस्टॉरंट्सची माहिती आम्ही तुम्हाला देतोय. तुम्ही तिथे भेट देऊ शकता. महत्त्वाचं म्हणजे यापैकी काही रेस्टॉरंट्स तर 100 वर्षांपेक्षा जास्त जुनी आहेत. या संदर्भात माहिती देणारं वृत्त 'आय दिवा' या पोर्टलने दिलं आहे.
1. क्यानी अँड को
या रेस्टॉरंटमध्ये चेकर केलेले टेबल क्लॉथ आणि व्हिंटेज खुर्च्या हा आकर्षणाचा केंद्रबिंदू आहे. Kyani & Co ची सुरुवात 1904 मध्ये झाली होती. या रेस्टॉरंटचे इराणी फ्लेव्हर्स काळाच्या ओघात थोडेफार बदलत गेले; पण त्यांचा युनिकनेस कायम आहे. या ठिकाणी तुम्हाला ‘इराणी कबाब’, ‘चिकन चीज भुर्जी’ किंवा ‘खिमा पाव’ची चव चाखता येईल. इथलं फ्रेश रासबेरी ड्रिंकदेखील खास असतं.
2. कॅफे मिलिटरी
फोर्टच्या बिझनेस डिस्ट्रिक्ट एरियाच्या गजबजलेल्या गल्ल्यांमध्ये वसलेलं ‘कॅफे मिलिटरी’ हे एक उत्कृष्ट पारशी रेस्टॉरंट आहे. व्हिंटेज बेंटवूड खुर्च्या आणि तिथलं वातावरण खूप प्रसन्न करणारं आहे. या ठिकाणी तुम्ही ‘कॅफे खिमा पाव’, ‘चिकन धंसक’ आणि ‘कारमेल कस्टर्ड’ यांसारख्या स्वादिष्ट पदार्थांचा आस्वाद घेऊ शकता. हे रेस्टॉरंट या पदार्थांसाठी विशेष ओळखलं जातं.
3. गॅलॉप्स
मुंबईतलं ‘गॅलॉप्स’ रेस्टॉरंट दर वर्षी नवरोझ स्पेशल मेनू बनवते. तिथे अनेक पारंपरिक व नवीन फ्लेव्हर्स चाखता येतात. तुम्ही नवखे असलात, तर तिथले पारंपरिक पारशी पदार्थ खाऊ शकतात. त्यात ‘कोल्मी नी करी’, ‘सल्ली बोटी’, ‘अकुरी’ आणि ‘उडवाडा नू सांचा नु मँगो आइस्क्रीम’ आणि ‘लवजी ना लगन नु कस्टर्ड’ यांसारखे गोड पदार्थ आदींचा समावेश आहे. रेस्टॉरंटमध्ये हिरवंगार लॉन असून बसण्याची सोय उत्तम आहे.
4. बावा झेस्ट बाय चेरॉन
बांद्रा पश्चिमेल चेरॉनचं ‘बावा झेस्ट रेस्टॉरंट’ आहे. ते स्वादिष्ट स्टार्ट्ससाठी ओळखलं जातं. ते लिंबू आणि चॉकलेट या दोन फ्लेव्हर्समध्ये उपलब्ध असतात. त्यांच्या पारशी पदार्थांमध्ये लज्जतदार ‘मटण धनसक चिकन फरचा’ आणि ‘आकुरी’ यांचाही समावेश आहे. तसंच तिथे तुम्हाला ‘चिकन सल्ली बन’, ‘चिकन टिक्का क्रोइसंट’, ‘चिकन सॉरपोटेल पफ’ हे पदार्थही चाखायला मिळतील.
5. ब्रिटानिया अँड को
हे मुंबईतल्या सर्वांत जुन्या पारशी रेस्टॉरंट्सपैकी एक आहे. बॅलार्ड इस्टेटमधल्या ब्रिटानिया अँड कंपनीने 1923मध्ये हे रेस्टॉरंट सुरू केलं होतं. ते आपल्या पारंपरिक इंडो-इराणी स्पेशल बेरी पुलावसाठी ओळखलं जातं. या रेस्टॉरंटमध्ये गेल्यावर ‘फ्राइड बुमला’ (बॉम्बे डक) नावाचा एक पदार्थ नक्की खाऊन बघा.
ही आहेत अस्सल पारशी मेन्यू असणारी मुंबईतली पाच रेस्टॉरंट्स. तुम्हालाही असे विविध प्रकारचे पदार्थ खायला आवडत असतील, या ठिकाणी नक्की भेट द्या.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Food, Travel, Travelling, Viral