मराठी बातम्या /बातम्या /लाइफस्टाइल /सहन नाही झालं जोडीदाराच्या विरहाचं दुःख; म्हणून त्यानं चक्क रेल रोको केलं!

सहन नाही झालं जोडीदाराच्या विरहाचं दुःख; म्हणून त्यानं चक्क रेल रोको केलं!

फोटो साभार- न्यु यॉर्क पोस्ट

फोटो साभार- न्यु यॉर्क पोस्ट

दो हंसों का जोडा .. असं म्हटलं जातं. पण खरंच या दोन हंसांची जोडगोळी इतकी एकमेकांच्या प्रेमात होती की, एकाचा मृत्यू झाल्यावर दुसरा विरहात तसाच रेल्वे रुळांवर बसून राहिला. 23 रेल्वेगाड्या या अनोख्या रेल रोकोमुळे उशिराने धावल्या.

बर्लिन, 1 जानेवारी: असं म्हटलं जातं की, हंस आपलं संपूर्ण जीवन एकट्या जोडीदारासोबतच घालवतो. जर हंस जोडीपैकी एकाचा मृत्यू झाला तर दुसरा हंस देखील त्याच्या विरहातून आपला मृत्यू ओढावून घेतो. म्हणून हंसाची जोडी ही खर्‍या प्रेमाचं प्रतीक मानली जाते. याचा प्रत्यय नुकताच एका देशात आला आहे. दोन हंस चुकून एका रेल्वे रुळाकडं गेल्यानंतर त्यातील एका हंसाचा विजेचा झटका बसून मृत्यू झाला. आपला जोडीदाराचं निधन झाल्याने विरहापोटी दुसरा हंस तब्बल एक तास लोहमार्गावर बसून होता. यामुळं त्यामार्गावरील तब्बल 23 रेल्वेगाड्या उशीरा धावल्या आहेत.

संबंधित घटना जर्मनीतील आहे. जर्मनीतील कॅसल येथे दोन हंस चुकून एका वेगवान रेल्वे मार्गावर पोहोचले होते. या रेल्वे ट्रॅकच्या वर विद्युत तारा बसवण्यात आल्या होत्या. यातील एका हंसाला विजेच्या तारांचा धक्का बसला आणि या अपघातात त्याचा मृत्यू झाला. त्यामुळं जोडीदाराच्या हंसाच्या मृत्यूनंतर दुसरा हंस त्याच रेल्वे मार्गाच्या जवळ बसला आहे. आज माणुसकीच्या नात्यातलं प्रेम आटत जात असताना, या हंसानं समस्त मानवजातीला खऱ्या प्रेमात सर्वस्व अर्पण करायचं असतं हे पुन्हा एकदा अधोरेखित केलं आहे.

पण ही घटना पाहिल्यानंतर उपस्थित लोकांना आश्चर्य वाटलं. स्थानिकांनी त्या हंसाला तेथून हटवण्याचा प्रयत्न केला, पण तो हंस आपल्या जोडीदाराला सोडून जाण्यास तयार नव्हता. या घटनेमुळे स्थानिक लोकांनी फायर डिपार्टमेंट याबाबत माहिती दिली. फायर डिपार्टमेंटच्या कर्मचाऱ्यांच्या मोठ्या प्रयत्नानंतर हंसाला रुळावरून हटवण्यात यश आलं. त्यानंतर या हंसाला जवळच्या एका नदीत सुरक्षित ठिकाणी सोडून दिलं.

फायर डिपार्टमेंटच्या या प्रयत्नांना सुमारे 1 तास लागला. यामुळं 23 गाड्या वेळेवर पोहोचू शकल्या नाहीत. त्यांना उशीर झाला. खरं तर एका हंसाचा जीव वाचवण्यासाठी 23 गाड्यांना विलंब करणं खुपच कौतुकास्पद बाब आहे. आपल्या देशात असा प्रकार घडला असता तर त्याच्याकडे कोणी ढुंकुनही पाहिलं नसतं. पण जर्मनीतील लोकांनी तसं केलं नाही. त्यांनी या हंसांच्या भावनांची देखील पूर्ण काळजी घेतली. त्याच्या दुःखाला समजून घेण्याचा प्रयत्न केला.

First published:
top videos