मराठी बातम्या /बातम्या /लाइफस्टाइल /

हाय-प्रोटीन डाएटचा अतिरेक धोकादायक, आहाराचं प्लॅनिंग करण्याआधी हे जाणून घ्या!          

हाय-प्रोटीन डाएटचा अतिरेक धोकादायक, आहाराचं प्लॅनिंग करण्याआधी हे जाणून घ्या!          

प्रोटीन आपल्या शरीरासाठी महत्वाचा घटक आहे.

प्रोटीन आपल्या शरीरासाठी महत्वाचा घटक आहे.

अधिक प्रथिनांनी युक्त (High Protein Diet) असा आहार सतत घेतल्यास त्याचे दीर्घकालीन विपरीत परिणाम शरीरावर होऊ शकतात.

    मुंबई 21 डिसेंबर: आपल्या शरीराची उत्तम जडणघडण होण्यासाठी आणि शरीरातल्या काही घटकांचा ऱ्हास झाला असेल, तर तो भरून काढण्यासाठी प्रोटीन्स ( Proteins) म्हणजे प्रथिनं अत्यावश्यक असतात. मेंदूतल्या हायपोथॅलॅमस (Hypothalamus) भागात असलेल्या तृप्ती केंद्रावरही (Satiety Centre) प्रथिनांमुळे चांगला परिणाम होतो आणि तृप्ततेची भावना येते. त्यामुळे भूक कमी होते आणि आपल्या पोटात जाणाऱ्या अन्नपदार्थांचं प्रमाण काहीसं कमी होतं. त्याचा उपयोग वजन तात्पुरतं कमी करण्यासाठी (Weight loss) होतो. वजने उचलण्याचा व्यायाम करणाऱ्यांना आपल्या नियमित आहारातल्या प्रमाणापेक्षा अधिक प्रमाणात प्रथिनं घेण्यास सांगण्यात येतं; मात्र असा अधिक प्रथिनांनी युक्त (High Protein Diet) असा आहार सतत घेतल्यास त्याचे दीर्घकालीन विपरीत परिणाम शरीरावर होऊ शकतात. हाडांचे विकार आयोनिस डेलिमारिस यांनी 2013मध्ये केलेल्या अभ्यासाविषयीचा लेख NCBIने प्रसिद्ध केला आहे. उच्च प्रथिनयुक्त आहार, खासकरून मांस (Red Meat), तसंच न्यूट्रिशनल सप्लिमेंट्स (Nutritional Supplements) आहारात असतील, तर कोणते धोके निर्माण होऊ शकतात, याचा अभ्यास त्यांनी केला होता. उच्च प्रथिनयुक्त आहारामुळे शरीरात जास्त अॅसिडची (आम्ल) निर्मिती होते. त्यामुळे कॅल्शियमची (Calcium) जास्त प्रमाणात झीज होते आणि त्याचा विपरीत परिणाम हाडांवर होतो. अतिरिक्त प्रमाणात मांस खाल्ल्यामुळे हाडांची झीज होऊन फ्रॅक्चर (Fracture) होण्याचा धोका असतो. वनस्पतिजन्य प्रथिने (Plant Proteins) आहारात असतील, तर हा धोका कमी असतो, असंही त्या अभ्यासात म्हटलं आहे. हृदयाची दुखणी प्राणिजन्य प्रथिनं (Animal Proteins) म्हणजे मांस आहारात असेल, तर हृदयरोग (Heart Ailments) होण्याची शक्यता अधिक असते; मात्र मासे, पोल्ट्री, लो-फॅट डेअरी प्रॉडक्ट्स आणि नट्स आदी पदार्थ आहारात असतील, तर त्यामुळे हृदयरोग होण्याचा धोका संभवत नाही, असंही या अभ्यासात म्हटलं आहे. मूत्रपिंडाच्या समस्या उच्च प्रथिनयुक्त आहार असेल, तर किडनी स्टोन (Kidney Stone) अर्थात मूतखडा होण्याचा धोका अधिक असतो, असं अनेक अभ्यासांतून आढळलं आहे. प्राणिजन्य प्रथिनं अधिक प्रमाणात आहारात असतील, तर युरिक अॅसिडची (Uric Acid) पातळी वाढते. त्यामुळे किडनी स्टोन्सच्या निर्मितीला चालना मिळू शकते, असं 'हार्वर्ड हेल्थ'च्या लेखात म्हटलं आहे. ज्यांच्या मूत्रपिडांचं कार्य मंदावलेलं असतं, त्यांना अल्प प्रथिनयुक्त (Low Protein Diet) आहार दिला जातो, तसंच वनस्पतिजन्य प्रथिनं दिली जातात, जेणेकरून त्यांच्या मूत्रपिंडाचं कार्य पूर्णपणे थांबू नये. कर्करोगाचा धोका (Cancer) अनेक अभ्यासांमधून असं आढळलं आहे, की लाल मांस आहारात असेल, तर कोलोरेक्टल कॅन्सर (Colorectal Cancer) (मोठ्या आतड्याचा कर्करोग) होण्याचा धोका खासकरून पुरुषांमध्ये वाढतो. वर उल्लेख केलेल्या सगळ्या अभ्यासांतून असं दिसून येतं, की उच्च प्रथिनयुक्त आहारामुळे पिळदार स्नायू, भुकेवर नियंत्रण आदी गोष्टी तात्पुरत्या स्वरूपात साध्य होतात; मात्र दीर्घकालीन विचार करता या आहारामुळे गंभीर व्याधी जडण्याची शक्यता बळावते.
    Published by:Ajay Kautikwar
    First published:

    पुढील बातम्या