Home /News /lifestyle /

धक्कादायक! गर्भातील बाळापर्यंत पोहोचतंय प्लॅस्टिक; नाळेत सापडले कण

धक्कादायक! गर्भातील बाळापर्यंत पोहोचतंय प्लॅस्टिक; नाळेत सापडले कण

याआधी झालेल्या संशोधनात बाटलीने दूध पिणाऱ्या बाळांच्या पोटात दररोज प्लॅस्टिकचे (plastic) लाखो सूक्ष्मकण जात असल्याचं दिसून आलं होतं.

 मुंबई, 23 डिसेंबर :  बाळाला प्लॅस्टिकच्या (plastic) बाटलीतून दूध देऊ नये, असा सल्ला तज्ज्ञ वारंवार देतात. कारण प्लॅस्टिकचे कण बाळाच्या शरीरात जाण्याचा धोका असतो. मात्र बाळ जन्मल्यानंतर त्याचा थेट प्लॅस्टिकशी संपर्क आल्यानंतरच नव्हे तर ते आईच्या गर्भात असताना त्याचा प्रत्यक्ष प्लॅस्टिकशी संपर्क येत नसतानाही त्याच्यापर्यंत प्लॅस्टिक पोहोचतं आहे. एका संशोधनात जन्मलेल्या बाळाच्या नाळेत प्लॅस्टिकचे सूक्ष्म कण सापडले आहेत. नवजात बाळांच्या नाळेत मायक्रोप्लॅस्टिक (Microplastics) अर्थात प्लॅस्टिकचे सूक्ष्म कण असल्याचं शास्त्रज्ञांना प्रथमच आढळलं आहे. चांगलं आरोग्य असलेल्या चार महिलांच्या नॉर्मल बाळंतपणानंतर (Normal Pregnancy) जन्मलेल्या बाळांच्या नाळेत हे कण आढळले आहेत. नाळेची बाळाकडची बाजू आणि आईकडची बाजू अर्थात वार (Placenta), तसंच गर्भातल्या ज्या पडद्याच्या (Mermbrane) आधाराने गर्भ विकसित होतो, त्या पडद्यातही हे कण असल्याचं आढळलं आहे. या संशोधनात नाळेच्या केवळ चार टक्के भागाचं विश्लेषण करण्यात आलं होतं. त्यामुळे मायक्रोप्लॅस्टिक्सचं एकूण प्रमाण खूपच जास्त असावं, अशी भीती आहे. प्लॅस्टिकचे जे सूक्ष्म कण नाळेत सापडले, त्यात निळ्या, लाल, नारिंगी किंवा गुलाबी रंगाच्या कणांचा समावेश होता. पॅकेजिंग मटेरियल, रंग किंवा कॉस्मेटिक्स आणि पर्सनल केअर प्रॉडक्ट्समधून (Personal Care Products) हे प्लॅस्टिक शरीरात गेलं असल्याचा अंदाज आहे. हे वाचा - लहान मुलांना कोरोना लस देता येणार नाही - हे आहे कारण 'प्लॅस्टिसेंटा : फर्स्ट एव्हिडन्स ऑफ मायक्रोप्लास्टिक्स इन ह्युमन प्लासेंटा' या नावाचं हे संशोधन एव्हायर्न्मेंट इंटरनॅशनल (Environment International) नावाच्या जर्नलमध्ये प्रकाशित झालं आहे. "बाळाच्या वाढीमध्ये नाळेची भूमिका अत्यंत महत्त्वाची असते. तसंच बाह्य वातावरणाशी संपर्काचा तो एक दुवा असतो. त्यामुळे तिथे प्लॅस्टिकचे कण सापडणं हे अत्यंत धोकादायक आहे. या प्लॅस्टिकच्या कणांच्या उपस्थितीमुळे शरीराकडून काही प्रतिकार होत आहे का किंवा विषारी घटकांची निर्मिती होते आहे का, हे तपासण्यासाठी अधिक अभ्यास करावा लागेल. असं काही होत असेल तर ते  घातक ठरू शकेल", असं शास्त्रज्ञांनी म्हटलं आहे. "प्लॅस्टिकचे हे सूक्ष्म कण नाळेमधल्या पेशीनियंत्रक मार्गांमध्ये (Cell Regulating Pathways) बदल घडवू शकतात. गर्भारपणावेळीची प्रतिकारशक्तीची यंत्रणा, गर्भ स्थापित झाल्यानंतर होणारं संदेशवहन, आई- आणि बाळात होणारं संदेशवहन, अन्य प्रकारचं संदेशवहन, नॅचरल किलर सेल्स, टी सेल्स आदींची उपस्थिती यांमध्ये बदल होऊ शकतो. या सगळ्यामुळे प्री-इक्लॅम्प्सियासारखी (Preeclampsia) गंभीर स्थिती किंवा बाळाच्या वाढीवर दुष्परिणाम होऊ शकतो", अशी भीतीही शास्त्रज्ञांनी व्यक्त केली आहे. हे वाचा - प्रेग्नंसीनंतर आलेलं डिप्रेशन तुमच्या बाळासाठीही ठरेल घातक; हे सोपे उपाय करा ! "अशा पद्धतीने जन्माला आलेल्या बाळांना सायबोर्ग बेबी (Cyborg baby) असं म्हणू शकतो. कारण ती बाळं केवळ मानवी पेशींपासून बनलेली नसतील, तर त्यांच्यामध्ये जैविक आणि इनऑरगॅनिक असे दोन्ही घटक समाविष्ट असतील", असं या संशोधन प्रकल्पाचे प्रमुख अँटोनियो रागुसा यांनी सांगितल्याचं गार्डियनच्या वृत्तात म्हटलं आहे. ते रोममधल्या (Rome) सॅन गिओवानी कॅलिबिटा फेटबेनेफ्रॅटेली हॉस्पिटलच्या स्त्रीरोगविभागाचे संचालक आहेत. यापूर्वी ऑक्टोबरमध्ये झालेल्या संशोधनात असं आढळलं होतं, की बाटलीने दूध पिणाऱ्या बाळांच्या पोटात दररोज प्लॅस्टिकचे लाखो सूक्ष्मकण जात असतात. आता झालेल्या या नव्या संशोधनामुळे तर आपल्या फूड प्रॉडक्ट्समध्ये असलेल्या प्लॅस्टिकच्या कणांच्या मोठ्या अस्तित्वाचे पुरावेच मिळाले आहेत. हे वाचा - PewDiePie अन् मि. बीस्टलाही टाकलं मागे,9 वर्षांच्या चिमुरड्याची थक्क करणारी कमाई 2019 मध्ये झालेल्या एका संशोधनात असं आढळलं होतं, की एका मनुष्याच्या आहारातून एका आठवड्यात सरासरी एका क्रेडिट कार्डच्या आकाराएवढं प्लॅस्टिक पोटात जात असावं. प्लॅस्टिक जैवविघटनशील (Biodegradable) नाही. ते केवळ छोट्या-छोट्या कणांमध्ये विभाजित होऊ शकतं. त्यामुळे ते निसर्गातही सगळीकडे पोहोचतं. समुद्रकिनाऱ्यांवरून सागरी जैवसाखळीत (Food Chain) पोहोचतं आणि तिथून मानवी अन्नसाखळीतही येतं. त्यामुळे योग्य ती काळजी घेणं आपल्या हातात आहे.
Published by:Priya Lad
First published:

Tags: Health, Plastic, Small baby

पुढील बातम्या