मुंबई, 13 जानेवारी: लोकप्रिय अभिनेत्रींची प्रेग्नन्सी आणि बाळंतपणं यांच्याकडे त्यांचे चाहते खूप लक्ष ठेऊन असतात. अनुष्का शर्मा (Anushka Sharma) नं 11 जानेवारीला दुपारी मुंबईत ब्रीच कँडी रुग्णालयात मुलीला जन्म दिला. अनुष्का तिच्या गर्भारपणादरम्यान पारशी डॉक्टर रुस्तम सोनावाला (Doctor Rustom Sonwala) यांच्याकडे उपचार घेत होती. हे डॉक्टर तब्बल 91 वर्ष वयाचे आहेत. त्यांच्या अनुभव आणि तज्ञतेसाठी त्यांची मोठीच ख्याती आहे. याच डॉक्टरांनी अनुष्काची डिलिव्हरी केली.
दिव्य मराठीनं याबाबतचं वृत्त दिलं आहे. डॉ. सोनावाला हे वैद्यकीय क्षेत्रात अतिशय आदरानं घेतलं जाणारं नाव आहे. त्यांच्या क्षेत्रात दिलेल्या अमूल्य योगदानासाठी त्यांना पद्मश्री पुरस्कारानंही गौरवण्यात आलं आहे. वैद्यकीय क्षेत्रात या डॉक्टरांना आर. पी. सोनावाला या नावानंही ओळखलं जातं.
20 डिसेंबर 2016 ला ब्रीच कॅंडी रुग्णालयात करीनानं तैमूरला जन्म दिला होता. आता करीना दुसऱ्यांदा प्रेग्नंट आहे. सूत्रांकडून कळते आहे की आता करीनाही दुसरी डिलिव्हरी याच सोनावाला यांच्याकडून करून घेणार आहे. फेब्रुवारीमध्ये करीना दुसऱ्या बाळाला जन्म देईल.
हे डॉ. सोनावाला म्हणजेच डॉ. रुस्तम फिरोज सोनावाला. आता वयाची नव्वदी पार करूनही सक्रिय असलेले सोनावाला यांनी आपली प्रॅक्टिस 1948 साली सुरू केली. सोनावाला आपल्या आत्मचरित्रात लिहितात, की तेव्हा डॉक्टर रुग्णांची नाडी पाहून उपचार करायचे. डायग्नोस्टिक प्रक्रिया आणि रक्तगटासारख्या गोष्टी नंतर आल्या.' इतकंच नाही, तर सोनावाला यांनी इंट्रा गर्भाशय गर्भनिरोधक या यंत्राचा शोध लावला. त्यांना 1991 मध्ये पद्मश्री पुरस्कारानं सन्मानित केलं गेलं. रश्मी उदयसिंह यांनी डॉ. सोनावाला यांच्यावर एक पुस्तक लिहिलं असून त्याचं नाव 'लाईफ गिव्हर' आहे.
विशेष गंमत म्हणजे करिश्मा आणि करीनाच्या जन्मावेळी त्यांची आई बबिता यांची डिलिव्हरीही डॉ. रुस्तम सोनावाला यांनीच केली होती. सोबतच नीतू सिंह, गौरी खान, जया बच्चन आणि विजय माल्ल्यांच्या पत्नीचीही प्रसूती याच सोनावाला यांच्या हातानं झाली.