काय सांगता?... या उद्योजकाने बांधलं समुद्रावर तरंगणारं घर

काय सांगता?... या उद्योजकाने बांधलं समुद्रावर तरंगणारं घर

चीनमधल्या एका उद्योजकाने चार लाख युआन म्हणजे जवळपास 45 लाख रुपये खर्चून एक असं घर तयार केलं आहे, जे पाण्यावर तरंगतं. चीनच्या फुजिआन प्रांतात तयार करण्यात आलेल्या या घराबद्दल...

  • Share this:

फुजियान 28 डिसेंबर: भारतातल्या बहुतांश लोकांना शिकारा नावेबद्दल (Shikara) माहिती असेल. काश्मिरातल्या 'दाल लेक'च्या (Dal Lake) पाण्यावर तरंगणाऱ्या छोट्याशा घरासारख्या होड्या अनेकांनी प्रत्यक्ष किंवा निदान चित्रपट, टीव्हीवर तरी पाहिल्या असतील. त्या होड्यांना शिकारा म्हणतात. काश्मिरात (Kashmir) फिरायला गेलेले पर्यटक या शिकारा होड्यांचा आनंद घेतातच. कारण पाण्यावरच्या घरासारख्या या होडीतला आनंद अद्भुतच असतो; पण समजा तुम्हाला होडीऐवजी पाण्यावर तरंगणाऱ्या खऱ्याखुऱ्या घरातच राहायला मिळालं तर? ही कल्पना खोटी वाटली, तरी खरी आहे. चीनमध्ये (China) एका व्यक्तीने खरंच असं घर तयार केलं आहे.

चीनच्या फुजिआन प्रांतात (Fujian Province) एका तरुण उद्योजकाने चार लाख युआन म्हणजे जवळपास 45 लाख रुपये खर्चून असं पाण्यावर तरंगणारं घर तयार केलं आहे. या उद्योजकाचं केवळ टोपण नावच लोकांना माहिती आहे आणि ते आहे कोस्टलाइन (Coastline). या घराची वैशिष्ट्यं काय आहेत, ते पाहू या.

कल्पना कशी सुचली?

साउथ सी चायना (South Sea China) अर्थात दक्षिण चीन समुद्राच्या प्रांतात असलेल्या डाँगशान काउंटीमध्ये (Dongshine County) कोस्टलाइन यांचं वास्तव्य आहे. त्यांचं बालपण समुद्रकिनारी गेलं आणि त्यांनी त्यांच्या लहानपणाचा बराचसा काळ मासे पकडण्यात व्यतीत केला. मित्रमंडळींसोबत बोलतानाही ते समुद्राबद्दल भरभरून बोलतात, डाँगशानच्या मच्छिमारांचं जीवनमान सुधारण्याच्या दृष्टीने काय करता येईल, याबद्दल बोलत राहतात. 2018मध्ये असेच एकदा ते आपल्या मित्रासोबत होते. त्या वेळी गप्पांमध्ये असाच विषय निघाला, की पाण्यावर तरंगतं घर असलं, तर किती मजा येईल. दिवसभर मासळी पकडता येईल आणि बिअर पिता येईल. रात्रभर दोघांची याच विषयावर चर्चा सुरू होती आणि दुसऱ्या दिवशी दोघांनी निश्चित केलं, की आपण असं फ्लोटिंग हाउस (Floating House) अर्थात पाण्यावर तरंगणारं घर बांधायचं.

अशी झाली सुरुवात

मत्यपालन, मासेमारी आदी बाबी डाँगशान प्रांतात पहिल्यापासूनच होतात. त्यासाठी नावांचा वापर केला जातो. कोस्टलाइन आणि त्यांच्या आर्किटेक्ट मित्राने राफ्ट आणि होडीच्या संकल्पनेचा उपयोग करून आपल्या घराचं डिझाइन ठरवलं. आपण दोघांनीही एकत्र या घरात राहायचं, असं त्यांनी ठरवलं. 600 स्क्वेअर मीटर क्षेत्रफळाचं घर बांधायचं त्यांनी निश्चित केलं. एवढं मोठं घर जमिनीवर बांधण्यासाठी जेवढे व्याप असतील, त्यापेक्षा फारच कमी व्याप पाण्यावरचं घर बनवण्यासाठी होते. सुरुवातीला त्यांनी उथळ पाण्यात घराचं बांधकाम सुरू केलं; मात्र लाटांमुळे ते हैराण झाले. शेवटी त्यांनी आपल्या घराचा प्लॅटफॉर्म भर समुद्रात नेला आणि तिथेच घराचं बांधकाम सुरू केलं.

अडचणी

तरंगतं घर बांधण्याच्या कामात त्यांनी विचार केला होता त्यापेक्षा जास्त अडचणी त्यांना आल्या. घराचा पाया कामगारांच्या चालण्यामुळे सारखा हलत राही. त्यामुळे त्यावर उभं राहणं अवघड होतं. जोरदार वारे वाहायला लागल्यावरही काम कठीण व्हायचं. घराचा सांगाडा स्टीलपासून बनवण्यात आला. काचेचा जास्तीत जास्त वापर असावा, असं कोस्टलाइन यांना वाटत होतं; मात्र पाया ठोस नसल्यामुळे काचा सारख्या फुटण्याची भीती होती. घर मजबूत व्हायला हवं असेल, तर घराचं सौंदर्य आणि लूक्स यांच्याबाबतीत तडजोड करायला पर्याय नाही, हे कोस्टलाइन यांच्या लक्षात आलं.

विजेची समस्या कायमस्वरूपी सोडवण्यासाठी कोस्टलाइन यांना जवळपास वर्षभराचा काळ लागला. जवळच्याच जलविद्युत प्रकल्पातून या घरापर्यंत वीज पोहोचवण्यात आली होती; मात्र आजूबाजूने जाणाऱ्या मच्छिमारी नौकांमुळे (Fishing Boats) ती वीजवाहिनी सारखी तुटायची. अखेर त्या नौकाचालकांशी चर्चा करून त्यांना याबद्दल सांगितल्यानंतर वीजवाहिनी तुटायचे प्रकार कमी झाले. ही वीजवाहिनी जवळपास तीन किलोमीटर लांब आहे. ही समस्या सुटली असली, तरी वादळाच्या वेळी आपलं घर तुटणार ही भीती कोस्टलाइन आणि त्यांच्या मित्राच्या मनात कायम असते.

खर्च आणि वैशिष्ट्यं

कोस्टलाइन यांनी या घराचं नाव हेक्सी (Haixi) असं ठेवलं आहे. हे घर एका ठिकाणी स्थिर राहण्यासाठी त्यांनी 16 मोठ्या नांगरांचा वापर केला आहे आणि प्रत्येक नांगर एक टन वजनाचा आहे. घर दुसऱ्या ठिकाणी घेऊन जायचं असेल, तर हे नांगर काढून एका पॉवरबोटच्या साह्याने ते घेऊन जाता येऊ शकेल. 2019मध्ये हे घर तयार झालं, त्यानंतर सुट्ट्यांमधलं घर म्हणून त्याचा वापर कोस्टलाइन यांनी सुरू केला. या घराच्या आतमध्ये आणि बाहेरही भरपूर जागा आहे.

या घरातून समुद्राचा 360 अंशांचा नजारा (360 Degree View) दिसतो. डाँगशानच्या किनाऱ्यापासून सुमारे अर्धा किलोमीटर अंतरावर हे घर आहे. कोस्टलाइन आणि त्यांचे मित्र डॉन जिमेंग यांनी 45 लाख रुपये खर्चून हे घर उभारलं. एवढंच घर जमिनीवर उभारायचं असतं, तर यापेक्षा किती तरी अधिक खर्च आला असता. त्यामुळे हे घर स्वस्तात पडलं, असं कोस्टलाइन म्हणतात. घराचं इंटीरियर पाहणारे थक्क होऊन जातात.

कोरोना महामारीपूर्वी कोस्टलाइन या घरात जास्तीत जास्त सात दिवसांपर्यंत राहिले होते; मात्र चीनमध्ये लॉकडाउन लागू झाला, तेव्हा ते पत्नी आणि दोन वर्षांच्या मुलासोबत या घरात 21 दिवस राहिले. इथे वेळ खूप चांगल्या प्रकारे व्यतीत झाला, असं ते म्हणाले.

कोस्टलाइन आणि डॉन यांनी स्वतःला राहण्यासाठी हे घर तयार केलं होतं; मात्र त्यांनी आपल्या घराचे फोटो सोशल मीडियावर शेअर केले, तेव्हा त्यांच्या अनेक मित्रांनी या घरात राहण्याची इच्छा व्यक्त केली. या दोघांनी अनेकांशी या घराबद्दल बोलायला सुरुवात केली. इथे राहण्याची मागणी वाढू लागल्याने सप्टेंबर 2020मध्ये या घराचं हॉटेल बनवण्यात आलं आणि चीनमधलं ते पहिलं फ्लोटिंग हॉटेल बनलं. ते कोणत्याही कंपनीला विकलेलं नाही, तर मित्रमंडळींच्या माध्यमातून होणाऱ्या प्रचारातून येणाऱ्या पाहुण्यांचं ते स्वतःच स्वागत करतात. त्यासाठी महिनाभर आधी नियोजन करावं लागतं. अशा रीतीने त्यांचं हे घर लोकप्रिय झालं आहे.

Published by: Amruta Abhyankar
First published: December 28, 2020, 6:25 PM IST
Tags: chinasea

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading