या देशात पर्यटनासाठी जा आणि कमवा 200 युरो!

या देशात पर्यटनासाठी जा आणि कमवा 200 युरो!

गेल्या वर्षभरात जगभरात पसरलेली कोरोना महामारी (Corona Pandemic)आणि त्यानंतर लागू करावा लागलेला लॉकडाउन (Lockdown) यामुळे सर्वच क्षेत्रांवर विपरीत परिणाम झाला. पर्यटनाचं क्षेत्राची (Tourism Sector) कोरोनामुळे सर्वाधिक हानी झाली.

  • Share this:

मुंबई, 13 एप्रिल : गेल्या वर्षभरात जगभरात पसरलेली कोरोना महामारी (Corona Pandemic)आणि त्यानंतर लागू करावा लागलेला लॉकडाउन (Lockdown) यामुळे सर्वच क्षेत्रांवर विपरीत परिणाम झाला. पर्यटनाचं क्षेत्राची (Tourism Sector) कोरोनामुळे सर्वाधिक हानी झाली. जिथे घरातून बाहेर पडण्यावरच निर्बंध होते, तिथे पर्यटनाचं काय होणार म्हणा! त्यामुळे सर्वच देशातल्या पर्यटनावर आणि त्यावर अवलंबून असलेल्याविविध उद्योगांवर मंदीची कुऱ्हाड कोसळली, पण हळूहळू सावरण्याशिवाय पर्यायच नसल्याने प्रत्येक जण काही तरी क्लृप्त्या लढवून उद्योग नव्याने सुरू करण्यासाठी सध्या धडपडत आहे. आता कोरोनाचे नियम पाळून पर्यटन काही अंशी सुरू झाले आहे. भूमध्य समुद्रातल्या मालटा रिपब्लिक (Malta Republic) या द्वीपसमूह स्वरूपातल्या देशाने पर्यटकांना आकर्षित करण्यासाठी एक अनोखी योजना जाहीर केली आहे. तिथे येऊन किमान तीन रात्री वास्तव्य करणाऱ्या प्रत्येक पर्यटकाला चक्क 200युरोचं (200 Euroes)बक्षीस दिलं जाणार आहे.एका युरोचं आजचं मूल्य 89.34 रुपये एवढं आहे. म्हणजे या हिशेबाने 17 हजार 868 रुपये प्रत्येक पर्यटकाला मिळणार आहेत.

लस घेतलेल्या व्यक्तींची संख्या वाढत असल्यामुळे वेगवेगळे देश आता हळूहळू अंतर्गत आणि परदेशी पर्यटकांसाठी (Tourists) पर्यटनस्थळं खुली करत आहे. वर्ल्ड ट्रॅव्हल अँड टुरिझम कौन्सिलच्या (World Travel & Tourism Council) माहितीनुसार,मालटाची 27टक्के अर्थव्यवस्था पर्यटनावर थेट अवलंबून आहे. गेल्या वर्षीपासून उद्भवलेल्या परिस्थितीमुळे त्या देशाचं लाखो डॉलर्सचं नुकसान झालं आहे. अधिकृत आकडेवारीनुसार 2019 मध्ये मालटाला 27 लाख परदेशी पर्यटकांनी भेट दिली होती. 2020 मध्ये महामारीमुळे या संख्येत तब्बल 80 टक्क्यांनी घट झाली.म्हणून 9 एप्रिल रोजी मालटाचे पर्यटनमंत्री क्लेटॉन बार्टोलो (Clayton Bartolo) यांनी ही योजना जाहीर केली.

बार्टोलो यांनी सांगितलं की, स्थानिक हॉटेल्समध्ये बुकिंग करणाऱ्या पर्यटकांना ही रक्कम दिली जाईल. कोविडमुळे लागू करण्यात आलेले जवळपास सगळे निर्बंध 1 जूनपासून काढून टाकण्यात येतील, त्यामुळे या योजनेचा फायदा जास्तीत जास्त पर्यटकांना मिळू शकेल,असंही बार्टोलो यांनी सांगितलं. 'आंतरराष्ट्रीय पातळीवरचं पर्यटन सुरू होत असताना मालटाची हॉटेल्स स्पर्धेत असावीत, म्हणून ही नवी योजना जाहीर करण्यात आली आहे,' असं बार्टोलो म्हणाले.

अशी आहे योजना

मालटामधल्या (Malta) फाइव्ह स्टार हॉटेलमध्ये बुकिंग करणाऱ्या प्रत्येक पर्यटकाला मालटाच्या पर्यटन मंत्रालयाकडून 100 युरो दिले जातील. तेवढेच म्हणजे 100 युरो त्या हॉटेलकडून दिले जातील. म्हणजे एकूण 200युरो (17,868रुपये) एका पर्यटकाला मिळतील. फोर-स्टार हॉटेलमध्ये बुकिंग करणाऱ्या पर्यटकाला प्रत्येकी 150 युरो (13,401रुपये),तर थ्री-स्टार हॉटेलमध्ये बुकिंग करणाऱ्याला प्रत्येकी 100 युरो (8934रुपये) मिळतील.

मालटा देशाचाच भाग असलेलं गोझो (Gozo) नावाचं छोटं बेट मालटाच्या मुख्यभूमीपासून उत्तरेकडे तीन किलोमीटरवर आहे. तिथल्या हॉटेल्समध्ये बुकिंग करणाऱ्या पर्यटकांना मालटात मिळणाऱ्या रकमेपेक्षा 10टक्के अधिक रक्कम दिली जाणार असल्याचंही पर्यटन मंत्रालयाने स्पष्ट केलं आहे. आता किती पर्यटक त्या देशात जाऊन पर्यटनाचा आनंद घेतात आणि मालटाची ही योजना किती यशस्वी होते, हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे.

First published: April 13, 2021, 7:35 AM IST
Tags: corona

ताज्या बातम्या