कोरोनाव्हायरसपेक्षाही जास्त बळी; भयंकर ठरला छोट्याशा कीटकामुळे पसरणारा आजार

कोरोनाव्हायरसपेक्षाही जास्त बळी; भयंकर ठरला छोट्याशा कीटकामुळे पसरणारा आजार

जर वेळीच या आजाराच्या वाढत्या वेगाला आळा घातला नाही तर जगातील निम्मी लोकसंख्या याची शिकार होईल, अशी चिंता WHO नं व्यक्त केली आहे.

  • Share this:

जिनिव्हा, 30 नोव्हेंबर : संपूर्ण जगभरात कोरोनाव्हायरसनं (coronavirus) हाहाकार माजवला आहे. कोरोनाच्या प्रकरणांची आणि मृत्यूच्या आकडेवारीची नोंद घेतली जाते आहे. मात्र कोव्हिड 19 या आजारापेक्षाही एका छोट्याशा किटकामुळे पसरणारा आजार भयंकर ठरला आहे. कोरोनाव्हायरसपेक्षा याच आजारानं सर्वात जास्त बळी घेतले आहेत. जागतिक आरोग्य संघटनेनं (WHO) ही धक्कादायक माहिती दिली आहे.

जागतिक आरोग्य संघटनेच्या जागतिक मलेरिया (maleria)  रिपोर्टनुसार यावर्षी कोरोनामुळे सर्वाधिक मृत्यू झाले असले तरी आफ्रिकामध्ये मलेरियामुळे मृत्यू होणाऱ्यांची संख्या यापेक्षा जास्त आहे, असं वृत्त रॉयटर्सनं दिलं आहे.

जागतिक आरोग्य संघटनेनं दिलेल्या माहितीनुसार एका देशात कोरोनापेक्षाही जास्त मृत्यू हे डासांमार्फत पसरणाऱ्या आजारामुळे झाले आहेत. डासांमार्फत पसरणाऱ्य आजारांपासून बचावासाठी आंतरराष्ट्रीय स्तरावर प्रयत्न सुरू आहेत. मात्र गेल्या काही महिन्यांपासून इतर आजारांवरील लस आणि औषध पुरवण्यात उशीर झाला. त्यामुळे डासांमार्फत पसरणारा आजार या देशात मोठ्या प्रमाणात पसरला आणि कित्येकांचा जीव गेला.

जागतिक आरोग्य संघटनेच्या माहितीनुसार 2019 मध्ये जगभरात मलेरियाची 22.90 कोटी प्रकरणं समोर आली आहेत.  संपूर्ण जगात गेल्या वर्षी  4.09 लाख लोकांचा मलेरियामुळे मृत्यू झाला. 2019 मध्ये संपूर्ण जगात मलेरियामुळे जितके मृत्यू झाले आहेत, त्यापैकी निम्मे मृत्यू आफ्रिकेतील देशांमध्ये आहेत.

हे वाचा - कोरोनाग्रस्तांचे पडतायेत दात; CORONA चं नवं लक्षण तर नाही ना?

जागतिक आरोग्य संघटनेच्या मलेरिया प्रोग्रामचे संचालक पेड्रो आल्सोन्सो यांनी सांगितलं, आफ्रिकेतील देशांमध्ये मलेरियामुळे सर्वाधिक मृत्यू झालेल्यांमध्ये  लहान मुलांचा जास्त समावेश आहे. नायजेरियामध्ये 23 टक्के, काँगोमध्ये 11 टक्के, टान्झानियामध्ये 5 टक्के, नाइझर आणि मोझाम्बिक, बुर्किना फासोमध्ये  प्रत्येकी 4 टक्के मृत्यू मलेरियामुळे झाले आहेत. आफ्रिकेतील या देशांमध्ये 20 हजार ते 1 लाख लोक फक्त मलेरियामुळे मृत्यू पावलेत. या ठिकाणी कोरोनामुळेही इतक्या लोकांचा बळी गेला नाही.

2016 नंतर आफ्रिकेत मलेरियावर नियंत्रण मिळवण्यासाठी खूप मेहनत घेण्यात आली, मात्र कोरोनाच्या महासाथीमुळे आता ही सर्व मेहनत वाया गेली आहे. मलेरियाच्या बाबतीत आफ्रिका आता पुन्हा एक पाऊल मागे गेलं आहे, असं जागतिक आरोग्य संघटनेनं सांगितलं आहे.

हे वाचा - Moderna कंपनीनं दिली GOOD NEWS! गंभीर कोरोनावर 100% प्रभावी ठरली लस

जगभरात प्रत्येकी दोन मिनिटाला मलेरियामुळे एका मुलाचा मृत्यू होतो आहे. कोरोनामुळे संपूर्ण जगाचं लक्ष मलेरियासारख्या आजारावरून हटलं आहे आणि हे खूप घातक ठरू शकतं, असा इशारा डब्ल्यूएचओनं दिला आहे. मलेरियाच्या वाढत्या वेगाला आळा घातला नाही तर जगातील निम्मी लोकसंख्या याचा शिकार होईल. त्यामुळे कोरोनासह इतर आजारांकडेही लक्ष द्यायला हवं, असं डब्ल्यूएचओनं म्हटलं आहे.

Published by: Priya Lad
First published: November 30, 2020, 7:36 PM IST

ताज्या बातम्या