मुंबई 30 जानेवारी : महात्मा गांधी यांनी सत्य आणि अहिंसेच्या मार्गाने भारताला स्वातंत्र्य मिळवून दिले. मोहनदास करमचंद गांधी यांना कोणी महात्मा म्हणत तर कोणी त्यांना बापू म्हणत. महात्मा गांधींनी जगाला अहिंसेचे महत्त्व पटवून दिले. त्यांनी आयुष्यभर अहिंसेचा मार्ग स्विकारला. त्यांचे विचार आजही अनेकांसाठी प्रेरणादायी आहेत. स्वातंत्र्यानंतर काही महिन्यांनी 30 जानेवारी 1948 रोजी महात्मा गांधी यांचे निधन झाले. हा दिवस गांधीजींची पुण्यतिथी म्हणून इतिहासात कायमचा नोंदवला गेला. महात्मा गांधी आज आपल्यात नसले तरी त्यांचे विचार आजही अनेकांना प्रेरणा देतात. आज त्यांच्या पुण्यतिथीनिमित्ताने तुम्ही हे छोटे भाषण करून उपस्थितांची मनं जिंकून घेऊ शकता.
भाषण
आदरणीय प्राचार्य महोदय, शिक्षक आणि माझे प्रिय वर्गमित्र, तुम्हा सर्वांना माझा नमस्कार.
आपल्याला सर्वांना माहित आहे की आज आपल्या शाळेत महात्मा गांधी पुण्यतिथीचे आयोजन करण्यात आले आहे. यावेळी मला बोलण्याची संधी दिली त्यासाठी मी तुम्हा सर्वांचा ऋणी आहे. 30 जानेवारी 1948 हा दिवस भारतीय इतिहासातील काळा अध्याय म्हणून नोंदवला गेला आहे. देशाच्या स्वातंत्र्यलढ्यातील प्रमुख नायक मोहनदास करमचंद गांधी यांचे ३० जानेवारी १९४८ रोजी निधन झाले. स्वातंत्र्याच्या काही महिन्यांनंतरच नथुराम गोडसेने ३० जानेवारी रोजी बिर्ला हाऊस येथे प्रार्थनेदरम्यान बापूंवर गोळ्या झाडल्या. हा दिवस आजही लोकांच्या स्मरणात आहे.
हा दिवस दरवर्षी हुतात्मा दिन म्हणून साजरा केला जातो. साबरमतीच्या संताने ‘हे राम’ म्हणत जगाचा निरोप घेतला तो हा दिवस. याप्रसंगी भारताचे राष्ट्रपती, उपराष्ट्रपती, पंतप्रधान आणि संरक्षण मंत्री बापूंचे स्मरण करून दिल्लीतील राजघाटावरील गांधीजींच्या समाधीवर आदरांजली वाहितात.
महात्मा गांधी यांना 'राष्ट्रपिता' म्हणूनही ओळखले जाते. त्यांनी सत्य आणि अहिंसेचा मार्ग अवलंबून भारताला इंग्रजांच्या गुलामगिरीतून मुक्त केले. बापूंनी देशातील प्रत्येक नागरिकाला हिंसा आणि रक्तपातापासून दूर राहून अहिंसेचा मार्ग स्वीकारण्याची प्रेरणा दिली.
सूट बूट असा पेहराव असलेल्या इंग्रजांना बापूंचे धोतर आणि लंगोटीचे वैशिष्ट्य कधीच समजू शकले नाही. एके काळी ब्रिटनचे पंतप्रधान विन्स्टन चर्चिल यांनी बापूंची खिल्ली उडवली होती. त्यांनी बापूंना नग्न फकीर म्हटले होते. परंतु एके दिवशी हा फकीर एवढा मोठा होईल की संपूर्ण जग त्यांच्यापुढे नतमस्तक होईल हे त्यांना माहित नसावे.
बापूंचे सत्य आणि अहिंसेचे विचार भारतालाच नव्हे तर संपूर्ण जगाला मार्गदर्शक ठरतात. गांधीजींनी आपले जीवन सत्याच्या शोधासाठी समर्पित केले. देशाला स्वातंत्र्य मिळवून देण्यात महात्मा गांधींनी महत्त्वाची भूमिका बजावली. महात्मा गांधींनी स्वातंत्र्यलढ्यात अनेक चळवळींचं नेतृत्व केलं. भारत छोडो आंदोलन, सत्याग्रह, दांडी मार्च, असहकार आंदोलन, सविनय कायदेभंग आंदोलन ही त्याची काही उदाहरणं आहेत. नेताजी सुभाषचंद्र बोस यांनी त्यांना पहिल्यांदा राष्ट्रपिता म्हणून संबोधले होते. त्यानंतर त्यांना महात्मा, बापू अशा या नावांनी देखील संबोधले जाऊ लागले.
महात्मा गांधींसारखा महापुरुष आपल्या देशात जन्माला आला याचा आपल्या सर्वांना अभिमान वाटायला हवा. महात्मा गांधींच्या पुण्यतिथीनिमित्त मी बापूंना नमन करतो आणि माझे भाषण संपवतो.
धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र!
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Lifestyle, Mahatma Gandhi