Home /News /lifestyle /

सावधान! महाराष्ट्रात येतोय कोरोनापेक्षा भयंकर काँगो फीव्हर, जाणून या तापाविषयी सर्वकाही

सावधान! महाराष्ट्रात येतोय कोरोनापेक्षा भयंकर काँगो फीव्हर, जाणून या तापाविषयी सर्वकाही

पालघर जिल्हा प्रशासनानं या तापाबाबत अलर्ट जारी केला आहे. तुम्हाला ही लक्षणं असतील तर लगेच डॉक्टरकडे जा.

    पालघर, 01 ऑक्टोबर : पालघर जिल्हा प्रशासनानी मंगळवारी क्रेमियन काँगो हेमोऱ्हागिक फीव्हर (Crimean Congo Hemorrhagic Fever CCHF) म्हणजेच काँगो तापाच्या साथीच्या आजाराचा संसर्ग होऊ शकतो, अशी शक्यता व्यक्त केली आहे. त्याचबरोबर नागरिकांना सावधानतेचं आवाहन केलं आहे. गुजरातमधील काही जिल्ह्यांत CCHF चे रुग्ण आढळले असून, महाराष्ट्रातही ही साथ पसरू शकते, असा सावधानतेचा इशारा पालघर जिल्ह्याच्या पशुसंवर्धन विभागाचे उपायुक्त डॉ. प्रशांत डी. कांबळे यांनी प्रसिद्ध केलेल्या परिपत्रकात देण्यात आला आहे. काँगो तापाविषयी जाणून घ्या महत्त्वाच्या गोष्टी: 1. हा आजार प्रामुख्याने गोचिडीच्या (Tick) संपर्कात आलेल्या माणसाला होऊ शकतो. गोचीडीपासून हवेत प्रसारित होणाऱ्या Bunyaviridae family या वर्गातल्या Nairovirus नावाच्या विषाणूपासून माणसाला हा आजार होऊ शकतो. गोचिडी प्रामुख्याने शेतकऱ्यांकडील पाळीव जनावरांच्या अंगावर असतात त्यामुळे त्यांपासून सावध रहायला हवं, असं जागतिक आरोग्य संघटनेचं (WHO) म्हणणं आहे. 2. गोचिडीच्या चावल्यामुळे किंवा हा आजार झालेल्या जनावराच्या रक्ताचा संपर्क आला तर किंवा जनावराच्या कत्तलीनंतर लगेचच ज्या पेशी माणसाच्या शरीरावर राहतात त्यांच्या संपर्कात आल्याने या विषाणूचं माणसात संक्रमण होऊ शकतं. आतापर्यंत हा आजार झालेल्यांमध्ये दुभत्या जनावरांशी संबंधित व्यवसाय करणार म्हणजे शेतमजूर, कत्तलखान्यातील कामगार आणि पशुतज्ज्ञ, पशुपालकांचा मोठ्या प्रमाणात समावेश होता असंही WHO नी म्हटलं आहे. या आजाराच्या रुग्णाच्या रक्ताच्या, शरीरातील स्रावांच्या (लाळ, घाम), किंवा अवयव व शरीराशी संबंधित इतर स्रावांच्या संपर्कात दुसरी व्यक्ती आल्यास तिला हा संसर्ग होऊ शकतो. 3. काँगो तापामुळे गंभीर स्वरूपाचा हेमोऱ्हागिक ताप येऊ शकतो ज्यातील मृत्यूचं प्रमाण 10 ते 40 टक्के आहे. या आजाराचा प्रादुर्भाव प्रामुख्याने अफ्रिका, बाल्कन प्रदेश, मध्यपूर्वेतील आणि आशियातील देशांमध्ये झाल्याचं दिसून आलं आहे. 4. कोणत्या प्रकारचा विषाणू आहे त्यानुसार त्याचा इनक्युबेशनचा (incubation) काळ असतो. गोचीडीने चावा घेतल्याने आजार झाला तर त्याचा इनक्युबेशन काळ 3 ते जास्तीत जास्त 9 दिवस असतो. रुग्णाच्या रक्ताच्या किंवा पेशींच्या संपर्कात आल्याने याची लागण झाली तर इनक्युबेशन काळ 5 ते 6 दिवसांपासून 13 दिवसांपर्यंत असतो. 5. ताप, स्नायूदुखी, अंग जड होणं, मानदुखी, अंगदुखी, पाठदुखी, डोकेदुखी, डोळे चुरचुरणं, प्रखर प्रकाशाचा त्रास होणं ही या आजाराची प्रमुख लक्षणं आहेत. शिसारी येणं, उलट्या, जुलाब, ओटीपोटात दुखणं आणि घसा कोरडा पडणं ही पण या आजाराची लक्षणं आहेत आणि त्याचबरोबर रुग्णाला मूड स्विंग आणि भ्रमिष्टपणाचा त्रासही होऊ शकतो. दोन-चार दिवसांनंतर ही लक्षणं सारखं झोपावंसं वाटणं, नैराश्य यामध्ये रुपांतरित होऊ शकतात. नंतर पोटदुखीचं रुपांतर यकृताचा आकार वाढण्यामध्येसुद्धा होऊ शकतो. 6. हृदयाचे ठोके वाढणं, लिम्फ नोड्सचा आकार वाढणं, तोंडाच्या आतील भागांत रक्तस्राव होणं किंवा रॅश येणं किंवा त्वचेवर रॅश येणं अशी लक्षणंही आहेत. हिपेटायटिससारख्या किंवा इतर गंभीर आजारांच्या रुग्णांना हा ताप आला तर पाच दिवसांनंतर मूत्रपिंडांची कार्यक्षमता कमी होणं यकृत बंद पडणं अशी लक्षणंही दिसू शकतात असं WHO नी म्हटलं आहे. 7. काँगो तापाचा मृत्यूदर 30 टक्के असून, हा रुग्ण आजार झाल्यानंतर दुसऱ्या आठवड्यात दगावू शकतो. जे रुग्ण बरे झाले आहेत त्यांच्या प्रकृतीत आजार झाल्यापासून नवव्या किंवा 10 व्या दिवशी सुधारणा झाल्याचं लक्षात आलं आहे. 8. या प्राणघातक विषाणूसाठी अद्याप लस उपलब्ध नाही पण रिबाव्हिरिन (Ribavirin) हे विषाणूरोधक औषध या संसर्गावर उपचार करताना उपयोगी पडल्याचं दिसून आलंय. हे औषध तोंडावाटे आणि इंजेक्शनच्यामार्फत नसेतून दिलं तरीही उपयुक्त ठरतं.
    Published by:Priyanka Gawde
    First published:

    पुढील बातम्या