मराठी बातम्या /बातम्या /लाइफस्टाइल /

'या' दुर्मिळ आजारानं त्रस्त आहे मध्य प्रदेशातील ललित पाटीदार; जाणून घ्या सविस्तर माहिती

'या' दुर्मिळ आजारानं त्रस्त आहे मध्य प्रदेशातील ललित पाटीदार; जाणून घ्या सविस्तर माहिती

वेयरवुल्फ सिंड्रोम

वेयरवुल्फ सिंड्रोम

17 वर्षीय ललितच्या चेहऱ्यावर आणि शरीरावर एखाद्या प्राण्यासारखे घनदाट केस आहेत. डॉक्टरांनी ललितला 'वेअरवुल्फ सिंड्रोम' नावाचा दुर्मिळ आणि असाध्य आजार असल्याचं घोषित केलं. या आजारावरती उपचार उपलब्ध नाहीत.

  • Trending Desk
  • Last Updated :
  • Mumbai, India

मुंबई, 24 नोव्हेंबर : गेल्या काही दिवसांपासून मध्य प्रदेशातील रतलाम जिल्ह्यातील नांदलेट गावातील ललित पाटीदार नावाचा मुलगा चर्चेत आहे. 17 वर्षीय ललितच्या चेहऱ्यावर आणि शरीरावर एखाद्या प्राण्यासारखे घनदाट केस आहेत. ललितचा जन्म 2005 साली झाला होता. जन्माच्या वेळीच त्याच्या चेहऱ्यावर लांब केस होते. काही लोकांनी त्याची बाल हनुमान म्हणून पूजा करण्यास सुरुवात केली. पण जसजसा ललित मोठा होऊ लागला तशी या केसांची त्याला अडचण होऊ लागली. चेहऱ्यावर केस असल्याने ललितला जेवण करतानाही त्रास होऊ लागला. सोबतची मुलं त्याला माकड म्हणून चिडवतात. त्याच्या पालकांनी उपचारांसाठी अनेक ठिकाणी प्रयत्न केले. मात्र, डॉक्टरांनी ललितला 'वेअरवुल्फ सिंड्रोम' नावाचा दुर्मिळ आणि असाध्य आजार असल्याचं घोषित केलं. या आजारावरती उपचार उपलब्ध नाहीत.

वेअरवुल्फ सिंड्रोम म्हणजे काय?

वेअरवुल्फ सिंड्रोम हा दुर्मिळ आजार आहे. त्याला हायपरट्रिकोसिस असंही म्हणतात. 20 लाख जणांमध्ये एका व्यक्तीला हा आजार होतो. महिला किंवा पुरुष कोणालाही हा सिंड्रोम होऊ शकतो. हा आजार असलेल्या व्यक्तीच्या सर्व चेहऱ्यावर दाट केस उगवतात. या केसांमुळं संबंधित व्यक्ती जंगली प्राण्याप्रमाणं दिसते. काहीवेळा संपूर्ण चेहऱ्यावर केस न उगवता शरीरावर विविध ठिकाणी केस उगवतात. हा सिंड्रोम जन्मापासूनच किंवा नंतरही होऊ शकतो. हा आजार होण्यामागील नेमकं कारण अद्याप समोर आलेलं नाही. पण, एका पिढीकडून तो दुसऱ्या पिढीकडे जाऊ शकतो. म्हणजेच वेअरवुल्फ सिंड्रोम 'जेनेटिक' आहे.

हेही वाचा - कोरोनानंतर आता डिसीज Xचा धोका; WHOने घेतला मोठा निर्णय

कॅनरी बेटावर आढळला होती पहिली व्यक्ती

हायपरट्रिकोसिस किंवा वेअरवुल्फ सिंड्रोमची पहिली नोंद कॅनरी बेटांवर झाली होती. तेथील पेट्रस गोन्साल्विस या व्यक्तीच्या कुटुंबातील सदस्यांच्या चेहऱ्यावर प्राण्यासारखे केस होते. इटालियन निसर्गशास्त्रज्ञ उलिसे अल्ड्रोवंडी यांनी याचं दस्तऐवजीकरण केलं होतं. 1642 मध्ये उलिसे यांच्या मृत्यूनंतर 'हिस्ट्री ऑफ मॉन्स्टर्स विथ क्रॉनिकल्स ऑफ ऑल अॅनिमल्स' या जर्नलमध्ये ही माहिती प्रकाशित झाली होती. या माहितीनुसार, गोन्साल्विस यांच्या कुटुंबात दोन मुली, एक मुलगा आणि एक नातू हायपरट्रिकोसिसने ग्रस्त होते. गेल्या 300 वर्षांत जन्मजात वेअरवुल्फ सिंड्रोमची केवळ 50 प्रकरणं नोंदवली गेली आहेत. वैज्ञानिक प्रकाशनांमध्ये अशा सुमारे 100 प्रकरणांचं दस्तऐवजीकरण केलं गेलेलं आहे.

वेअरवुल्फ सिंड्रोमवर उपचार नाहीत

वेअरवुल्फ सिंड्रोमवर अद्याप कोणतेही ठोस उपचार उपलब्ध झालेले नाहीत. फारफार तर डॉक्टर अशा रुग्णांना मिनोक्सिडिलसारख्या औषधांपासून दूर राहण्यास सांगतात. कारण, त्यामुळे त्याची तीव्रता कमी ठेवता येऊ शकते. शेव्हिंग, केमिकल अॅप्लिकेशन, व्हॅक्सिंग, हेअर ब्लिचिंगसारखे उपाय करून चेहऱ्यावर उगवलेले केस काही काळासाठी नाहीसे करता येतात. याशिवाय, इलेक्टोलिसिस आणि लेझर सर्जरीचाही अवलंब करता येऊ शकतो.

100 वर्षांपूर्वी वेअरवुल्फ सिंड्रोम ठरत होता उत्पन्नाचं साधन

1884 मध्ये अमेरिकेतील प्रसिद्ध शोमन पीटी बर्मन यांनी एक शो केला होता. या शोमध्ये कोस्ट्रोमा फॉरेस्टची कथा सांगण्यात आली होती. 'एका गुहेत जंगली मनुष्य राहत असे. एका शिकाऱ्याला याची माहिती मिळते. तो या जंगली माणसाला आणि त्याच्या मुलाला पकडतो. त्या मुलाच्याही चेहऱ्यावर केस असतात आणि त्याचा चेहरा श्वानासारखा दिसतो. या मुलाचं नाव 'जो-जो द डॉग फेस्ड बॉय' असे ठेवण्यात आलं होतं. हा मुलगा चिडल्यानंतर भुंकायचा आणि गुरगुरत असे.' त्यावेळी लोकांनी ही गोष्ट खरी वाटत होती.

हेही वाचा - मित्राच्या लग्नात इतका नाचला की मंडपातच तरुणाचा झाला धक्कादायक शेवट; पाहा Live Video

या शोमध्ये वाईल्ड मॅन आणि त्याच्या मुलाचं पात्र करणाऱ्या व्यक्तींना वेअरवुल्फ सिंड्रोम होता. दोघेही रशियातील सेंट पीटर्सबर्गमधील होते. एंड्रियन आणि त्याचा मुलगा फेडर झेफिचेव्ह दोघेही हायपरट्रिकोसिस नावाच्या दुर्मिळ आजाराने ग्रस्त होते. 100 वर्षांपूर्वीपर्यंत लोक या आजाराला कमाईचं साधन मानत असत. एंड्रियनचे वडीलही सर्कसमध्ये परफॉर्म करायचे.

आपल्या हात-पायांचा आणि प्रत्येक बोटाचा आकार ठरलेला असतो. यासोबतच शरीराच्या कोणत्या भागात केस असतील आणि कुठे नसतील, हेही ठरलेलं असतं. पण जर आपल्या शरीरातील जीन कोडिंगमध्ये गडबड झाली तर यात बदल होतात. पीटी बर्मनच्या शोमधील वाइल्ड मॅनची हीच समस्या होती.

स्पेनमध्ये चुकीच्या औषधामुळे 20 हून अधिक मुलांना झाला वेअरवुल्फ सिंड्रोम

2019 मध्ये स्पेनमधील 20 मुलांना वेअरवुल्फ सिंड्रोम झाल्याचं धक्कादायक प्रकरण समोर आलं होतं. चुकीचं औषध दिल्याने मुलांच्या कपाळावर, गालावर, हातावर आणि पायावर भरपूर केस उगवले होते. स्पेनमधील हेल्थ रेग्युलेटर्सला त्यांच्या तपासणीत असं आढळलं की, दोन वर्षांपूर्वी या सर्व मुलांचे नातेवाईक मुलांच्या पोटदुखी आणि गॅसच्या तक्रारी घेऊन वेगवेगळ्या डॉक्टरांकडे गेले होते. डॉक्टरांनी त्यांना ओमेप्राझोल नावाचे औषध दिलं होतं. नातेवाइकांनी मेडिकल दुकानातून हे औषध विकत आणलं आणि मुलांना पाजलं. यानंतर मुलं बरी झाली. पण, दुसरीच एक समस्या सुरू झाली.

ज्या मुलांनी हे औषध खाल्लं त्यांच्या अंगावर अतिरिक्त केस वाढू लागले. तक्रारीनंतर स्थानिक प्रशासनानं याची चौकशी करून या मुलांना चुकून ओमेप्राझोलऐवजी मिनोक्सिडील हे औषध देण्यात आल्याचं सांगितलं. मिनोक्सिडील या औषध कंपनीने चुकून आपल्या सिरपच्या बाटल्यांवर पोटदुखी आणि गॅसवर वापरल्या जाणार्‍या ओमेप्राझोल या औषधाचे लेबल लावलं होतं. यानंतर, ते स्पेनमधील अनेक दुकानांमध्ये वितरित केलं गेलं. मिनोक्सिडिल हे टक्कल पडू नये यासाठी वापरलं जाणारं औषध आहे. म्हणजेच हे औषध घेतल्यानं केस वाढू लागतात.

मेक्सिकोतील एकाच कुटुंबातील 30 व्यक्तींना वेअरवुल्फ सिंड्रोम

मेक्सिकोच्या लोरेंटो येथील हेसियस एसेव्हास यांच्या कुटुंबातील एकूण 30 जणांना वेअरवुल्फ सिंड्रोम आहे. हेसियस आता जगप्रसिद्ध सर्कस कलाकार बनले आहेत. ते 'वुल्फ मॅन' नावानं प्रसिद्ध आहेत. पूर्वी त्यांची मोठ्या प्रमाणात खिल्ली उडवली जात असे. त्यांचं संपूर्ण कुटुंब 'चुए' या टोपणनावाने ओळखलं जातं. त्यांच्यावर 'चुए द वुल्फ मॅन' नावाची एक डॉक्युमेंट्रीही बनवण्यात आली आहे.

एकूणच, वेअरवुल्फ सिंड्रोम हा एक दुर्मिळ आजार आहे. या आजारानं ग्रस्त असलेली व्यक्ती प्राणी नसते. फक्त चेहऱ्यावर जास्त केस असल्यामुळे त्यांना प्राण्यांसारखी वागणूक देणं योग्य नाही.

First published:

Tags: Health