Home /News /lifestyle /

वर्षातलं पहिलं चंद्रग्रहण आहे वेगळं; विरळ छायेमध्ये 4 तास राहणार चंद्र

वर्षातलं पहिलं चंद्रग्रहण आहे वेगळं; विरळ छायेमध्ये 4 तास राहणार चंद्र

2020 हे वर्ष खगोलप्रेमींसाठी खास आहे. निसर्गाचा चमत्कार पाहण्याची संधी उद्या खगोलप्रेमींना मिळणार आहे. वर्षातल्या या पहिल्या चंद्रग्रहणाचं काय आहे वैशिष्ट्य?

    मुंबई, 9 जानेवारी : नवीन वर्ष खगोलप्रेमींसाठी खास हे वर्ष खगोलप्रेमींसाठी खास आहे. निसर्गाचा चमत्कार पाहण्याची संधी उद्या खगोलप्रेमींना मिळणार आहे. या ग्रहाणाची खासियत म्हणजे वर्षातलं हे पहिलं ग्रहण आहे आणि ते छायाकल्प म्हणजे penumbral चंद्रग्रहण आहे. या ग्रहणाचा कालावधी आहे 4 तासांचा. उद्या पौष शाकंभरी पौर्णिमा आहे आणि पौर्णिमेच्या रात्रीच खगोलप्रेमींना या चंद्रग्रहणाचा आनंद घेता येणार आहे. हे ग्रहण संपूर्ण भारतातून दिसणार असल्याचं ज्येष्ठ पंचांगकर्ते आणि खगोल अभ्यासक दा. कृ. सोमण यांनी सांगितलं. छायाकल्प ग्रहण म्हणजे काय? ज्यावेळी चंद्रबिंब पृथ्वीच्या दाट छायेभोवती असणाऱ्या विरळ छायेमध्ये येतं त्यावेळी छायाकल्प (penumbral) म्हणजेच मांद्य चंद्रग्रहण दिसतं. 4 तास चालणारं हे ग्रहण रात्री 10 वाजून 38 मिनिटांनी सुरु होईल आणि रात्री 2 वाजून 42 मिनिटांनी संपेल. हा कालावधी एकूण 4 तास 5 मिनिटं इतका असणार आहे. याआधी 11 फ्रेब्रुवारी 2017 ला अशा प्रकारचं चंद्रग्रहण झालं होतं. 2020 या नव्या वर्षात खगोलप्रेमींना एकूण 6 ग्रहणांचा अनुभव घेता येणार आहे. या 6 ग्रहणांपैकी 4 चंद्रग्रहणं आणि 2 सूर्यग्रहणं असणार आहेत. कसा असेल छायाकल्प चंद्रग्रहणाचा प्रवास? 10 जानेवारीला शुक्रवारी रात्री 10 वाजून 38 मिनिटांनी चंद्रबिंब पृथ्वीच्या विरळ छायेमध्ये येण्यास सुरूवात होईल. त्यानंतर रात्री 12 वाजून 40 मिनिटांनी जास्तीत जास्त म्हणजे 89 टक्के चंद्रबिंब पृथ्वीच्या विरळ छायेमध्ये येईल. उत्तररात्री 2 वाजून 42 मिनिटांनी संपूर्ण चंद्रबिंब पृथ्वीच्या विरळ छायेतून बाहेर पडेल. छायाकल्प चंद्रग्रहण साध्या डोळ्यांनी पाहता येणार असल्याची माहितीही सोमण यांनी दिली आहे. कोणकोणत्या भागात चंद्रग्रहण दिसणार छायाकल्प चंद्रग्रहणात चंद्रबिंब कमी तेजस्वी दिसेल. उद्याचं ग्रहण संपूर्ण भारतात दिसणार आहे. शिवाय उत्तर अमेरिकेच्या वायव्य भागातही दिसेल. आशिया, ऑस्ट्रेलिया, युरोप आणि दक्षिण अमेरिकेच्या पूर्व भागातही उद्याचं छायाकल्प चंद्रग्रहण दिसणार आहे. जगभरात ग्रहणाकडे निसर्गाचा चमत्कार म्हणून पाहणारे बरेच जण आहेत पण सोबतच अनेक लोकांच्या मनात ग्रहणाविषयी अंधश्रद्धाही आहेत. विशेषत: गर्भवती महिलांना ग्रहणकाळात विशेष काळजी घ्यायला सांगितली जाते अनेक जण धार्मिक विधीही करतात. ग्रहण काळात केलेले पदार्थ खायचे नाहीत अशीही बऱ्याच जणांची अंधश्रद्धा असते. गर्भवती महिला ग्रहण काळात घरातून बाहेर पडल्या तर त्याचा थेट परिणाम बाळावर होतो यावरही अनेकांचा विश्वास आहे, पण याला कुठलाही शास्त्रीय आधार नाही. लोक ग्रहणाविषयी असलेल्या अंधश्रद्धेला आणि चुकीच्या प्रथांना बळी पडून ग्रहणकाळात विविध विधी करण्यावर विश्वास ठेवतात. ग्रहणानंतर स्नानाला महत्त्व दिलं जातं. तर अनेकजण ग्रहण काळानंतर दान करण्यावरही विश्वास ठेवतात. विज्ञानयुगामध्ये मात्र या अंधश्रद्धा मागे टाकण्याची आवश्यकता आहे. सूर्यग्रहण किंवा चंद्रग्रहणाकडे वैज्ञानिक दृष्टीने पाहिलं तर निसर्गाचा हा चमत्कार आपल्याला चांगल्या पद्धतीने अनुभवता येईल. अन्य बातम्या डाएट समज-गैरसमज : वजन कमी करायचं असेल तर जेवणार हा एक पदार्थ हवाच कंडोम्स आणि सेक्स टॉइजचे हे VIRAL PHOTO खरंच JNU गर्ल्स हॉस्टेलवर सापडले का? बाउंड्री बाहेर घेतला कॅच, तरी फलंदाज झाला बाद! पाहा क्रिकेटमधला वादग्रस्त VIDEO
    Published by:Manoj Khandekar
    First published:

    Tags: Lunar eclipse

    पुढील बातम्या