News18 Lokmat

Love Story : नेहमी प्रेमी बदलणारी प्रोतिमा शेवटी बनली संन्यासी

प्रोतिमाचं कौटुंबिक आयुष्य बंडखोरीनं सुरू झालं आणि संन्यासी म्हणून संपलं. पण या दोघांच्या मध्ये बरंच काही घडलं.

News18 Lokmat | Updated On: Apr 3, 2019 07:51 PM IST

Love Story : नेहमी प्रेमी बदलणारी प्रोतिमा शेवटी बनली संन्यासी

मुंबई, 03 एप्रिल : खुशवंत सिंग यांनी एकदा आपल्या काॅलममध्ये लिहिलं होतं, ' प्रोतिमानं आपल्या आयुष्यात कुठल्याच पुरुषाला नाही म्हटलं नाही. तिला आयुष्यात कधी पश्चात्ताप झालेला नाही. ती आपल्या जीवनाबद्दल सगळ्यांना सगळं सांगायची.' प्रोतिमाचं कौटुंबिक आयुष्य बंडखोरीनं सुरू झालं आणि संन्यासी म्हणून संपलं. पण या दोघांच्या मध्ये बरंच काही घडलं.

प्रोतिमाच्या वडिलांनीही छोटीशी बंडखोरी केली होती. ते दिल्लीतल्या बनिया कुटुंबतले. त्यांनी एका सावळ्या बंगाली स्त्रीशी लग्न केलं. त्यामुळे त्यांना घरातून बाहेर काढलं गेलं. त्यानंतर ते गोवा, मुंबई अशा बऱ्याच ठिकाणी व्यवसायासाठी फिरले. पण फारसं काही नीट चाललं नाही.

प्रोतिमा तीन बहिणी आणि एक भाऊ यांच्यातली दोन नंबरची मुलगी होती. वडील प्रचंड कडक, तर प्रोतिमा तितकीच बंडखोर. जीवनात तिनं कधी कुठलंच गुपित ठेवलं नाही. तिचा मुलगा सिद्धार्थबद्दलही ती म्हणायची की तो कबीर बेदीचा मुलगा आहे की जर्मन प्रेमीचा हे नक्की कळत नाही. सिद्धार्थला पुढे स्क्रिझोफेनिया झाला आणि त्यानं आत्महत्या केली.


बंडखोर प्रोतिमा

Loading...

60च्या दशकात हरणासारखे मोठे डोळे असलेल्या प्रोतिमानं कायमचं घर सोडलं. मुंबईत माॅडेलिंग करू लागली. तेव्हा ती होती 17-18 वर्षांची. जुहू बिचवर ती नग्न होऊन धावली होती आणि चर्चेत आली होती. त्यावेळी बातमी आली की ती कबीर बेदीबरोबर राहतेय. त्या काळात लिव्ह इन रिलेशनमध्ये राहणं हा बोल्ड निर्णय होता.  19 वर्षांची असताना प्रोतिमा गरोदर झाली. त्यामुळे दोघांनी लग्न करण्याचा निर्णय घेतला. तेव्हा पूजाचा जन्म झाला. लग्न आणि मुलांचा जन्म झाल्यानंतर ना कबीर बदलला, ना प्रोतिमा.

कबीरसोबत प्रोतिमा

कबीर ग्रीक गाॅडप्रमाणे होता. तो खूप देखणा दिसायचा. प्रोतिमानं आपल्या टाइमपास पुस्तकात लिहिलंय की कबीरनं सुरुवातीला प्रोतिमाकडे दुर्लक्षच केलं होतं. पण एका पार्टीत दारूच्या कैफात दोघं जवळ आले आणि कबीर प्रोतिमाच्या प्रेमात वेडाच झाला. प्रोतिमा कबीरच्या घरी राहायला लागली. दोघांना लग्न करायचंही नव्हतं. पण पूजाच्या वेळी प्रोतिमा गरोदर राहिली तेव्हा कबीरनं लग्नाचा निर्णय घेतला.

प्रोतिमाच्या जीवनात आला जर्मन प्रेमी

कबीर तेव्हा स्ट्रगलर अभिनेता होता. प्रोतिमा प्रसिद्ध माॅडेल बनली होती. त्याच वेळी कबीर सिनेमात स्थिरावू लागला. झीनत अमान ते परवीन बाबीपर्यंत सगळ्यांची नावं कबीरशी जोडली जायला लागली. घरात भांडणं सुरू झाली. कबीर महिनोन् महिने शूटिंगसाठी घराबाहेर राहायचा. पूजा त्यावेळी 8 महिन्यांची होती. प्रोतिमाच्या आयुष्यात शेजारी राहणारा जर्मन पुरुष आला.

होळीचं मिळालं निमित्त

या जर्मन पुरुषाचं नाव होतं सिगफ्रेड किएंजेल. ते होतं 1971. होळीच्या दिवशी दोघांना जवळ यायची संधी मिळाली. प्रोतिमा, कडेवर पूजा आणि सिगफ्रेड असे एकत्र सगळीकडे दिसायला लागले. फ्रेड पूजाला अनेकदा पाठंगुळी घ्यायचा. सगळं सुरळीत सुरू असताना कबीर बेदी शूटिंग संपून घरी आला. तेव्हा प्रोतिमा लिहितेय की मला वाटलं आमच्या आयुष्यात हा कोण आलाय. पुढे प्रोतिमाला कबीरनं मनवलं. मग तिनं फ्रेडला गुडबाय केलं.


पंडित जसराज यांच्या सोबत रोमान्स

कबीरबरोबरचं नातं तुटल्यावर प्रोतिमा ओडिसी नृत्य शिकायला लागली. त्यावेळी पंडित जसराज गीत गोविंदाच्या बॅले नृत्यात व्यग्र होते. दोघं भेटले. त्यांचा रोमान्स 5 वर्ष चालला. या काळात प्रोतिमा पूर्ण बदलली. ती साडी, गजरा, मोठी टिकली अशी वेषभूषा करायला लागली. पण जसराज विवाहित होते. ते प्रोतिमाबद्दल पझेझिव्ह राहायला लागले. हळूहळू दोघांचे संबंध तुटले.

रजनी पटेलांची बनली साथीदार

जेव्हा प्रोतिमा रजनी पटेलांच्या आयुष्यात आली तेव्हा ते कॅन्सशी लढत होते. काँग्रेस नेता रजनी पटेल  यांच्या सोबत प्रोतिमा खूश होती. ती म्हणायची, मला खरंखुरं प्रेम इथे मिळालं. रजनी पटेल हाॅस्पिटलमध्ये असतानाही ते प्रोतिमाला लव्ह लेटर लिहायचे. काही दिवसांनी त्यांच्या पत्नीला या अफेअरबद्दल कळलं. तेव्हा प्रोतिमाला दूर राहावं लागलं. रजनी पटेल यांच्या निधनानंतर त्यांच्या अंत्ययात्रेला प्रोतिमा गेली होती. तेव्हा पटेलांच्या घरातल्यांनी तिची उपेक्षाच केली.

वसंत साठेंबरोबरही जोडलं गेलं नाव

प्रोतिमानं आपल्या पुस्तकात लिहिलंय की एकदा वसंत साठे तिचं चुंबन घेऊ इच्छित होते, पण तिनं नकार दिला. त्या दोघांची खूप चांगली मैत्री होती, असं ती लिहिते.

प्रोतिमानं आयुष्यात खूप चढउतार पाहिले. आयुष्याच्या शेवटच्या काळात तिनं स्वत:ला नृत्यात झोकून दिलं. प्रोतिमा कैलास मानस सरोवराच्या यात्रेला गेली होती. 18 आॅगस्ट 1998 रोजी मानस सरोवर इथे झालेल्या भूस्खलनात प्रोतिमा बेदीचा मृत्य झाला. एका झंझावाताचा अंत झाला.

- संजय श्रीवास्तव

( अनुवाद - सोनाली देशपांडे )

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Apr 3, 2019 07:51 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...