मुंबई, 05 एप्रिल : 60च्या दशकात तामिळनाडूचे नवे मुख्यमंत्री मुथुवेल करुणानिधींना वेगळा आणि विचित्र प्रश्न विचारला गेला. ओलिवर रोडवरच्या त्या घरात त्यांच्या सोबत कोण राहतं? त्याचं भाडं ते सरकारकडून घेतायत. हा प्रश्न विचारणाऱ्या नजरेला नजर देऊन त्यांनी उत्तर दिलं, त्या घरात माझी मुलगी कनिमोझीची आई राहते. तेव्हापासून रजती अम्मल यांना त्यांची कायदेशीर पत्नी मानलं गेलं.
करुणानिधी यांचा दिनक्रम ठरलेला असायचा. ते रात्री सीजेआय काॅलनीतल्या बंगल्यात रजती अम्मलसोबत राहायचे आणि दिवसा गोपालपूर इथल्या घरी जायचे. तिथे त्यांची पत्नी दयालू अम्मल राहायची.
तामिळनाडूच्या राजकारणात अनेक पत्नी असण्याची परंपरा आहे. हिंदू कायद्यानुसार हे बेकायदेशीर आहे. पण तरीही करुणानिधींसाठी कधीच कसली अडचण झाली नाही. त्यांनी तीन लग्न केली. दोन रिती रिवाजाप्रमाणे आणि तिसरं वेगळ्या परंपरेनं.
करुणानिधी सर्वात महागडे पटकथाकार होते
करुणानिधींनी 20व्या वर्षापासून तामिळ सिनेमात स्क्रीप्ट लिहिणं सुरू केलं होतं. बघता बघता ते हिट लेखक झाले. त्या काळात महिन्याला त्यांना 10 हजार रुपये मिळत. त्यावेळी त्यांचा सगळा वेळ अभिनेता, अभिनेत्री आणि निर्मात्यांबरोबर जायचा. शिवाय राजकारणातही वेळ द्यायचे. ते अण्णादुराईंनाही भेटायचे. त्यांच्या आंदोलनाशी जोडले गेले होते.
उंच पद्मावतीच्या प्रेमात
पद्मावतींचे भाऊ दाक्षिणात्य सिनेमात प्रसिद्ध पार्श्वगायक होते. करुणानिधी आकर्षक, सुंदर पद्मावतींच्या प्रेमात आकंठ बुडाले होते. 1945-46मध्ये दोघांनी लग्न केलं. आयुष्य खूप छान चाललेलं. दोघांना एक मुलगा झाला. एम के मथु. पण पद्मावती आजारी पडल्या. 1948मध्ये त्यांचं निधन झालं. करुणानिधींसाठी तो मोठा धक्का होता. तेव्हा त्यांना वाटलं ते आता पूर्ण वेळ अण्णादुरईंसोबत काम करतील. पण तसं झालं नाही.
मग झालं दुसरं लग्न
चार वर्षांनी त्यांच्या आईवडिलांनी त्यांचं लग्न दयालू अम्मलसोबत करून दिलं. आता करुणानिधी अण्णादुराईंच्या आंदोलनात जास्त वेळ घालवायला लागले. दयालू आणि त्यांना तीन मुलगे आणि एक मुलगी झाली. करुणानिधी पूर्ण वेळ राजकारणात आले होते.
नाटकाच्या ग्रुपमधली आकर्षक तरुणी
60चं दशक होतं. तामिळनाडूमध्ये निवडणुकीचे वारे वहात होते. करुणानिधी आपल्या राजकीय गुरूंसोबत प्रचारात होते. त्यावेळी प्रचारासाठी एका नाटकाच्या ग्रुपची मदत घेतली जात होती. कवी कन्नडासनचा लोकप्रिय ग्रुप. यात होती रजती. तिचा अभिनय अप्रतिम होता. करुणानिधी रजतीकडे आकर्षित झाले.
प्रेमाच्या बातम्या पसरू लागल्या
दोघांच्या भेटी वाढल्या. त्याचा परिणाम त्यांच्या कुटुंबावर झाला. करुणानिधींना दयालू अम्मल यांना सोडायचं नव्हतं. पण रजतीलाही आयुष्यात सामील करून घ्यायचं होतं. यावेळी अण्णादुराईंनी मदत केली आणि मधला मार्ग निवडला.
हे वेगळं लग्न होतं
त्यांनी ना कोर्ट मॅरेज केलं, ना पुजाऱ्यांना बोलवून लग्न केलं. उलट पक्षातल्या अनेक वरिष्ठांच्या साक्षीनं त्यांनी आयुष्यभर एकमेकांची साथ देण्याची शपथ घेतली. त्यांचा आशीर्वाद घेतला.
ती होती 21ची आणि ते 42 वर्षांचे
दोघं एकत्र राहायला लागले. 1968मध्ये एका वर्षांनी कनिमोझीचा जन्म झाला. अनेकदा सार्वजनिक ठिकाणी दोन्ही पत्नी उपस्थित असायच्या. पण दोघींच्या मुलांमध्ये एक प्रकारचा तणाव अजूनही आहे. करुणानिधींच्या निधनाननंतर तो जास्त वाढला.
जयललिता जोपर्यंत जिवंत होत्या तोपर्यंत त्या नेहमीच करुणानिधींच्या लग्नावरून टोमणे मारायच्या.
-संजय श्रीवास्तव
( अनुवाद - सोनाली देशपांडे )