मुंबई, 21 जून - कर्नाटकमधील मैसूरपासून 60 कि.मी. अंतरावर मेलकोटे हे निसर्गसंपन्न गाव आहे. पौराणिक स्थळ म्हणून परिचित असलेलं हे सुंदर गावा पर्यटनासाठी एकदम बेस्ट आहे. समुद्रसपाटीपासून तीन हजार फुट उंचावर असलेल्या या हिल स्टेशनचा अजून व्हावा तितका परिचय पर्यटकांना झालेला नाही.
मेळूकोटे या कन्नड भाषेतल्या शब्दाचा अर्थ श्रेष्ठ दुर्ग असा होतो. पण शब्दाचा अपभ्रंश झाल्यामुळे हे गाव आता मेलकोटे या नावाने ओळखलं जातं. भुलभुलैय्या या हिंदी चित्रपटाचं शुटींग याच गावात झालं होतं अशी माहिती आहे.
पावसाळ्यात फिरायला जाण्यासाठी बेस्ट आहेत 'ही' 5 डेस्टिनेशन्स
या गावातला मुख्य रस्त्याचं एक खास वैशिष्ट्य आहे. 'राजबिथी' म्हणजेच राजपथ या नावाने ओळखल्या जाणाऱ्या या मार्गाच्या कडेला पुरोहितांची 150 वर्षे पुरातन घरे आहेत. आणखी एक खास वैशिष्ट म्हणजे या गावात 108 तलाव असून, प्रत्येक तलावाचं वेगवेगळं महत्त्व आहे.
उंच पर्वतरांगांच्या कुशीत वसलेलं हे गाव नारळाच्या झाडांनी वेढलेलं आहे. तसंच या भागात मोठ्या प्रमाणात आमराया आणि काजूच्या बागा आहेत. गावात प्रवेश करताच स्वच्छ आणि मनाला प्रफुल्लीत करणारा गार वाऱ्याचा स्पर्श अंगाला होतो. गावात महाल, जुन्या इमारती आणि मोठे अंगण असलेली घरं आहेत. या गावातील कल्याणी या मोठ्या तलावाकाठी लग्न आणि इतर मंगल कार्ये साजरे होतात. त्यासाठी इथे सुंदर कलाकृती असलेला 900 वर्षांपूर्वीचा मांडव आहे. तिर्थक्षेत्र म्हणून ओळख असलेल्या या गावाच्या टेकडीवर नरसिंहाचं मंदिर आहे. ज्यात योगमुद्रा आसनात बसलेली अतिशय प्राचिन नरसिंहाची मूर्ती आहे. जवळपास 600 पायऱ्या चढून या मंदिरात जावं लागतं.
भारतातही करता येणार स्कीइंग; टूरिझमच्या नव्या जागा शोधण्यासाठी विदेशी तज्ज्ञ पोह
तसंच रामानुजन यांनी 12 व्या शतकात याठिकाणी बांधलेल्या नारायण मंदिरात भगवान संपथकुमाराची 900 वर्ष पुरातन मूर्ती आहे. रामानुजन हे या गावात काही काळ वास्तव्यास होते. त्याच काळात या गावात मंदिरे आणि तलावं बांधली गेली.
भगवान श्रीराम वनवासात असताना सीता आणि लक्ष्मणासह काही काळ येथे राहिले होते असं गावातील लोकं सांगतात. तेव्हा सीतेची तहान भागविण्यासाठी रामाने बाण मारून पहाडातून पाणी काढलं होतं ते आजही वाहत आहे अशी अख्यायिका आहे. अशा या निसर्गसंपन्न आणि ऐतिहासिक ठिकाणाला भेट देणाऱ्या पर्यटकांसाठी इथे राहण्याची उत्तम व्यवस्था असून, तिथे दाक्षिणात्या खाद्यपदार्थांचा तुम्हाला मनसोक्त आस्वाद घेता येईल.