Life in लोकल- मी आजही तिची त्याच प्लॅटफॉर्मवर वाट पाहतो (भाग १)

Life in लोकल- मी आजही तिची त्याच प्लॅटफॉर्मवर वाट पाहतो (भाग १)

तुम्ही मुलं ना फटू असता. तुमच्यात काही हिंम्मत नाही तर ते मान्य करायचं ना… हातून काही होत नाही आणि उगाच फक्त मोठ मोठी वचनं द्यायची.

  • Share this:

मुंबई, १ एप्रिल- तुम्ही मुलं ना फटू असता. तुमच्यात काही हिंम्मत नाही तर ते मान्य करायचं ना… हातून काही होत नाही आणि उगाच फक्त मोठ मोठी वचनं द्यायची. तिच्या या बोलण्यावर मी नेहमी हेच बोलायचो की, तुझ्यात दम आहे तर तू मान्य कर ना... शब्दागणिक तिचा श्वास वाढत होता आणि नाक फुलत होतं. डोळ्यातली चमक मात्र कायम होती.

मला काहीच कळत नव्हतं की तिला बोलू तरी कसं. आपल्याला ते जमणार आहे का? उगाच कशाला तिला आस लावा? जे चाललंय ते चांगलंच सुरू आहे. पाच वर्षांपासून नाही सांगितलं तेच बरं आहे. माझ्या मनात विचारांचं काहूर माजलं होतं. काय करावं काहीच सुचत नव्हतं.

मुंबईतील ट्राफिकमधून वाट काढत दोघंही अखेर दादरच्या प्लॅटफॉर्म नंबर तीनवर पोहोचलो. दोघांच्याही मनात चलबिचल सुरु होती. तिनं निर्भिडपणे पुढाकार घेतला. पण, माझ्यात ती हिंम्मत काही केल्या येतच नव्हती. आमचं प्रेम पुढं जाणार नाही याची मला पहिल्या दिवसापासून खात्री होती. त्यामुळेच मी शांत रहाणं पसंत केलं. तेवढ्यात तिची गाडी काही मिनिटांत येत असल्याची अनाउन्समेन्ट झाली. मी तिच्याकडे पाहीलं, थोडावेळ कोणीच काही बोललं नाही. नंतर मीच तिला म्हणालो, 'याच ट्रेनने जा, नाही तर नंतर गर्दी मिळेल.'

लोकल यायला अजून काही मिनिटांचा अवधी होता. दोघं एकमेकांकडे केवळ पाहत होते. नजरेत प्रेम होतं. पण, त्याच्या ओठावर ते काही येत नव्हतं. जवळपास दोन तीन मिनिटांनी ट्रेन आली आणि लेडीज डब्ब्यात चढायला घाई झाली. 'नीट जा!' मी वर वरचं म्हणालो. त्यावर तिने 'मी पाहून माझं काय ते तू नको सांगूस,' असं कानशिलात लगावणारं उत्तर दिलं. नेहमीप्रमाणे लोकल सुटेपर्यंत मी थांबलो. पण आज कधी नव्हे ते ती आत न जाता मध्येच थांबली. दोन स्टेशननंतर उतरायचं पण होतं आणि त्याला पाहायचं देखील होतं.

दोघांच्या नजरा पुन्हा भिडल्या. नजरेत प्रेम तर होतं पण व्यक्त करायला त्याच्याजवळ हिंम्मत नव्हती. ९.३१ च्या बदलापूर लोकलनं त्यांच्या मैत्रीची आणि हळूहळू त्यांच्या प्रेमाची सुरूवात झाली होती.

फारसं भेटणं होत नसलं तरी फोनवर बोलणं व्हायचं. नाश्ता, जेवण, काय चाललंय सर्व चौकशी सुरू होती. दिवसांमागून दिवस लोटले. अखेर मी एसएमएसनं प्रेमाची कबुली दिली. त्यासोबत धोक्याची घंटा देखील. दोघांनी देखील अत्यंत विचारपूर्वक घेतलेला निर्णय होता. दोघांच्या घरची परिस्थिती जवळपास सारखीच होती. पण या चक्रव्युहातून माझी काही सुटका नव्हती. पण काहीतरी होईल या आशेवर दोघांनी प्रेम स्वीकारलं. नाही पुढे गेलो तरी जगलो ते दिवस आपले असाच काहीसा अलिखित नियम आम्ही केला होता. उद्या काय होईल याची काहीही कल्पना दोघांना नव्हती. पण, प्रेम मात्र निस्वार्थी होतं.

ती सतत कामात असायची. पण, माझ्यासाठी वेळ काढत होती. तर मी नोकरीच्या शोधात होतो. जोडीला काहीतरी छोटं मोठं सुरू होतं. आम्ही देवाच्या भरवशावर सुखी संसाराची स्वप्न देखील पाहिली होती. कारण उद्या काय होणार हे आम्हाला ठावूक नव्हतं. आपली फरफट होतेय तशी हिची नको म्हणून प्रेम कबुल करायला मी घाबरत होतो. पण, आज मात्र मी हिंम्मत दाखवली. पण उद्याचं काय? तोच प्रश्न मला पडला होता.

- मधुरा नेरुरकर

First published: April 2, 2019, 9:48 AM IST
Tags:

ताज्या बातम्या