भारतातील तिसरी कोरोना लस आहे तरी कशी? जाणून घ्या Sputnik V बाबत सर्व काही

भारतातील तिसरी कोरोना लस आहे तरी कशी? जाणून घ्या Sputnik V बाबत सर्व काही

Sputnik V कोरोना लशीबाबत तुमच्या सर्व प्रश्नांची उत्तरं तुम्हाला इथं मिळतील.

  • Share this:

नवी दिल्ली, 14 एप्रिल : रशियाने विकसित केलेल्या स्पुतनिक V (Sputnik V)या कोरोनाप्रतिबंधक लशीच्या भारतातल्या आपत्कालीन वापराला द ड्रग कंट्रोलर ऑफ इंडिया (DGCI) अर्थात भारतीय औषध नियामक प्राधिकरणाने मंगळवारी (12एप्रिल) मंजुरी दिली. भारतात वापरण्यास मंजुरी मिळालेली ही तिसरी कोरोना लस आहे. यापूर्वी ऑक्सफर्ड विद्यापीठ आणि अॅस्ट्राझेनेका कंपनी यांनी विकसित केलेली आणि पुण्यातल्या सीरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडियाने उत्पादित केलेली कोविशिल्ड (Covishield)आणि भारत बायोटेकनं विकसित केलेली कोव्हॅक्सिन (Covaxin) या दोन लशींच्या आपत्कालीन वापरास भारतात परवानगी देण्यात आली आहे.

स्पुतनिक V लशीच्या वापरास मंजुरी देणारा भारत हा 60 वा देश ठरला आहे. रशियन डायरेक्ट इन्व्हेस्टमेंट फंडाने (RDIF) दिलेल्या माहितीनुसार, एप्रिल अखेरीपर्यंत किंवा मेच्या पहिल्या आठवड्यापर्यंत स्पुतनिक V ही लस भारतात उपलब्ध केली जाणार आहे. या लशीबाबत तुमच्या मनातील प्रत्येक प्रश्नाचं निरसन आता करूया.

-लस कोणी विकसित केली?

-रशियाच्या राजधानीचं शहर असलेल्या मॉस्कोमधल्या (Moscow) गामालेय नॅशनल रिसर्च इन्स्टिट्यूट ऑफ एपिडेमिऑलॉजी अँड मायक्रोबायोलॉजी या संस्थेने स्पुतनिक V ही लस विकसित केली आहे. रशियात ऑगस्ट 2020 मध्ये गॅम-कोविड-व्हॅक(Gam-Covid Vac) या नावाने तिची नोंदणी झाली आहे.

हे वाचा - अनोख्या मायक्रोचिपचा शोध, रक्तातून फिल्टर करुन बाहेर काढणार कोरोना विषाणू

मानवात सर्दीसाठी (Adenovirus) कारणीभूत असलेल्या दोन विषाणूंचा वापर या लशीत करण्यात आला आहे.

-साठवण्याचं तापमान?

-स्पुतनिक V ही लस दोन ते आठ अंश सेल्सिअस तापमानाला साठवून ठेवावी लागते. याचाच अर्थ असा की नेहमीच्यारे फ्रिजरेटरमध्ये ती साठवता येऊ शकते. तिच्यासाठी अतिरिक्त कोल्ड-चेन इन्फ्रास्ट्रक्चरची आवश्यकता नाही.

-किती डोस आवश्यक?

-कोव्हॅक्सिन आणि कोविशिल्ड या लशींप्रमाणेच स्पुतनिक V या लशीचेही दोन डोस घेणं आवश्यक आहे. फक्त या लशीच्या दोन डोसमध्ये 21दिवसांचं अंतर असणं आवश्यक आहे.

-किती प्रभावी?

-स्पुतनिक V ही लस कोरोनाप्रतिबंधासाठी 91.5 टक्के प्रभावी असल्याचं आढळलं आहे. मॉडर्ना (Moderna) आणि फायझर-बायोएनटेक (Pfizer-BioNTech) या कंपन्यांच्या लशींनंतर सर्वाधिक प्रभावी लस म्हणून स्पुतनिक V या लशीचा नंबर लागतो. भारतात या लशीला आपत्कालीन वापरासाठी परवानगी मिळण्याआधीही चाचण्या घेण्यात आल्या होत्या.

-या लशीचे साइड इफेक्ट्स आहेत का?

- TASS या रशियाच्या सरकारी वृत्तसंस्थेने सहा एप्रिल रोजी आरोग्यमंत्री मिखाईल मुराश्को यांना याबद्दल विचारलं होतं. त्यांनी दिलेल्या माहितीनुसार, स्पुतनिक V लस दिलेल्यापैकी केवळ 0.1ट क्के जणांत साइडइफेक्ट नोंदवले गेले आहेत.

हे वाचा - कोरोना लसीकरणात भारताचं मोठं पाऊल; विदेशी कोरोना लशींना मिळणार Fast Track मंजुरी

'युनिव्हर्सिटी ऑफ रीडिंग'चे प्रा.इयान जोन्स आणि ब्रिटनमधल्या'लंडन स्कूल ऑफ हायजीन अँड ट्रॉपिकलमेडिसीन'मधले प्रा. पॉली रॉय यांनी लॅन्सेट या जगप्रसिद्ध वैद्यकीय नियतकालिकेत ऑगस्ट 2020 मध्ये स्पुतनिक V या लशीबद्दलचा लेख लिहिला होता. 'स्पुतनिक V लस विकसित करताना प्रचंड घाई करण्यात आली, तसंच प्रक्रियेत पारदर्शकतेचा अभाव होता, अशा प्रकारची टीका त्यावर करण्यात आली. पण ही लस प्रभावी असल्याचं शास्त्रीय तत्त्वाद्वारे स्पष्ट झालं आहे. त्यामुळे कोविड नियंत्रणासाठी ही लसही उपयोगी ठरू शकेल,' असं त्यांनी लिहिलं होतं.

-लशीची किंमत?

-स्पुतनिक V ही लस भारतात किती रुपयांना विकली जाणार हे अद्याप स्पष्ट झालेलं नाही. मात्र आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत तिची किंमत 10 डॉलर म्हणजे सुमारे 750 रुपये एवढी आहे.

-भारतात या लशीचं उत्पादन कोण करत आहे?

-स्पुतनिक V लशीच्या ब्रिज क्लिनिकल ट्रायल्स भारतात घेण्यासाठी डॉ. रेड्डीज लॅबोरेटरीने (Dr. Reddy's Laboratory) रशियन डायरेक्ट इन्व्हेस्टमेंट फंडाशी करार केला होता. ती कंपनी या लशीचे 25कोटी डोसेस भारतात देणार असल्याचं वृत्त आहे. ग्लॅंड फार्मा, हेटेरो बायोफार्मा, स्टेलिस बायोफार्मा, व्हरचौ बायोटेक आणि पॅनाशिया बायोटेक या कंपन्यांशी RDIF ने उत्पादनाचे करार केले आहेत. या कंपन्या 85कोटींहून अधिक डोसेसची भारतात निर्मिती करणार आहेत.

First published: April 14, 2021, 12:05 PM IST

ताज्या बातम्या