EXPLAINER - कोरोना लस घेतली म्हणजे तुम्ही COVID 19 पासून पूर्णपणे सुरक्षित असणार का?

EXPLAINER - कोरोना लस घेतली म्हणजे तुम्ही COVID 19 पासून पूर्णपणे सुरक्षित असणार का?

यूकेमध्ये Pfizer-Biontech covid 19 vaccine कोरोना लशीच्या आपत्कालीन वापराला मंजुरी देण्यात आली आहे. शिवाय आणखी काही लशींबाबतही आता उत्सुकता वाढली आहे. पण लस घेतल्यानंतर त्यापासून मिळणारी सुरक्षा आणि त्याचा परिणाम किती काळ टिकेल असे बरेच प्रश्न आता निर्माण झाले आहेत.

  • Share this:

मुंबई, 03 नोव्हेंबर : COVID -19 ची लस (COVID -19 vaccine) आता आपल्यापासून जास्त दूर नाही. कमीत कमी तीन लशींच्या (corona vaccine) चाचण्या खूपच सकारात्मक आल्या आहेत आणि त्या 90 टक्‍क्‍यांपर्यंत परिणामकारक असल्याचा दावा केला जातो आहे. मात्र आता हा प्रश्न निर्माण झाला आहे की, एखाद्या व्यक्तीला लस (coronavirus vaccine) दिल्यानंतर किती काळापर्यंत त्याला कोरोना संक्रमण होणार नाही? म्हणजेच किती काळासाठी ही लस एखाद्याच्या शरीरामध्ये आपला प्रभाव राखेल?

याशिवाय लशीच्या निर्मितीकडे जगाची पावलं पडत असतानादेखील जागतिक आरोग्य संघटना तसंच इतर आरोग्य संघटना आणि वैज्ञानिक तज्ज्ञ यांनी फक्त लस येईपर्यंतच नाही तर लस आल्यानंतरदेखील आपल्याला काळजी घ्यावी लागणार आहे, असं म्हटलं आहे. त्यामुळे लशीबाबत अनेक प्रश्न उपस्थित आहेत.

सर्वसामान्य लोकांच्या मनातही बरेच प्रश्न आहेत. तुमच्या मनातील अशाच काही प्रश्नांची उत्तरं.

प्रश्न : लस किती वेळापर्यंत शरीरात प्रभावी राहील?

उत्तर : कोविड 19 च्या ज्या लशी सुरक्षित ठरल्या त्यातील जी सर्वात प्रगत लस आहे तीसुद्धा काही महिन्यांसाठी किंवा शरीरानुसार काही वर्षांसाठी उपयोगी राहणार आहे. वॉल स्ट्रीट जर्नलनं काही तज्ज्ञांच्या हवाल्याने हे स्पष्ट केलं आहे की एकदा लस घेतल्यानंतर तुम्ही संक्रमणापासून आयुष्यभरासाठी सुरक्षित नाही राहू शकत.

हे वाचा - Good News: कोरोनाच्या संदर्भात आल्या दोन मोठ्या बातम्या; 2020 अखेरीस दिलासा

विज्ञानाच्या इतिहासात आतापर्यंत अशा काही लशी बनल्या आहेत ज्या एकदा घेतल्यानंतर आयुष्यभर सुरक्षा मिळतं. उदाहरणार्थ गोवरची लस. श्वाससंबंधी दुसरे व्हायरस आणि अँटीबॉडी यांच्या परिणामकारकतेचा जो नवीन डेटा समोर आला आहे, त्यानुसारच तज्ज्ञांचं म्हणणं आहे की कोविड 19 च्या लशीपासून अशी आशा बाळगली जाऊ शकत नाही.

प्रश्न : लस घेतल्यामुळे कोविड होऊ शकतो का?

उत्तर : याचं उत्तर आहे नाही. वास्तविक पाहता या प्रश्नाचा आशय असा आहे की, लस घेतल्यानंतरदेखील कोरोना होऊ शकतो का? तर लस घेतल्यानंतर त्याचा परिणाम शरीरावर व्हायला काही काळ जाऊ द्यावा लागेल त्यामुळे लस घेतल्यावर लगेच किंवा त्यानंतर काही दिवसांनी तुम्ही संक्रमित होऊ शकता.

प्रश्न : लस घेतल्यानंतर कोविड टेस्ट पॉझिटिव्ह येऊ शकते का?

उत्तर : चाचणीमध्ये लस दिल्यानंतर टेस्ट पॉझिटिव्ह आलेली दिसून आली नाही. मात्र जर का तुम्ही अँटीबॉडी टेस्ट केली तर ती पॉझिटीव्ह येऊ शकते, कारण तुमच्या शरीरामध्ये रोगप्रतिकारकता निर्माण झालेली असणार आहे, कारण तोच या लशीचा उद्देश आहे.कोविड लस घेतल्यानंतर अँटीबॉडी टेस्ट कशाप्रकारे प्रभावित होऊ शकते, याबाबत तज्ज्ञ याविषयी निरीक्षण करत आहेत.

प्रश्न : ज्यांना कोविड होऊन गेला आहे, त्याच्यासाठीदेखील लस परिणामकारक असेल का?

उत्तर: संक्रमण परत होत असल्यामुळे तज्ज्ञांचं असं म्हणणं आहे की, लस सर्वांनीच घ्यायला हवी. अमेरिकच्या सीडीसी (CDC) नुसार तज्ज्ञांना अजून हे स्पष्ट झालेलं नाहीय की लस घेतल्यानंतर किती काळापर्यंत परत संक्रमण होणार नाही. नैसर्गिक रोगप्रतिकारक क्षमता ही व्यक्तीनुसार बदलत असते आणि तीदेखील आयुष्यभरासाठी नसते. लशीमुळे किती काळापर्यंत रोगप्रतिकारक क्षमता राहू शकते याचा अभ्यास सध्या चालू आहे.

प्रश्न : लस किती काळापर्यंत प्रभावी ठरेल हे कधीपर्यंत समजू शकेल?

उत्तर : कोविड 19 हा रोग जगभरात पसरून अजून एक वर्ष देखील झालेलं नाही. त्यामुळे याविषयीचा अतिशय मर्यादित डेटा उपलब्ध आहे. लस आल्यानंतरच अधिक आणि योग्य डेटा मिळेल, तेव्हा समजू शकेल की लशीमुळे किती वेळापर्यंत रोगप्रतिकारक क्षमता तयार होऊ शकेल. नैसर्गिक रोगप्रतिकारक क्षमता आणि लशीमुळे निर्माण होणारी रोगप्रतिकारक्षमता दोन्हीही महत्त्वाच्या आहेत आणि त्यांचा अभ्यास चालू आहे.

प्रश्न : लस आल्यानंतरदेखील काळजी घेणं का आवश्यक आहे

उत्तरआतापर्यंत कोणतीही लस 100% प्रभावी ठरलेली नाही आणि एवढ्या मोठ्या प्रमाणात लस मिळायला खूप वेळ लागेल. शिवाय व्यक्तीनुसार रोगप्रतिकारक क्षमता वेगळी असल्यामुळे प्रत्येकाच्या शरीरानुसार लशीचा प्रभाव ठरेल. त्यामुळेच तज्ज्ञांचं असं म्हणणं आहे की, आपण मास्क घालणं, हात धुणं, स्वछता ठेवणं आणि सामाजिक अंतर पाळणं या नियमांचं पालन केल पाहिजे.

हे वाचा - Covid 19 Pfizer-BioNTech vaccine : यूकेत आपात्कालीन वापराला मंजुरी; भारताचं काय?

जागतिक आरोग्य संघटनेच्या भारतीय टीमने असं म्हणलं आहे की, लशीसंबधी जागरूकता कारण्यासोबतच लोकांना लस आल्यानंतर देखील काळजी घेण्याच्या गरजेबद्दल सांगितलं जाईल. यावरून हे स्पष्ट आहे की, लशीमुळे सकारात्मक होणं जरी चांगलं असलं तरी आपण निष्काळजी होणं हे खूप घातक ठरू शकतं.

Published by: Priya Lad
First published: December 3, 2020, 7:50 AM IST

ताज्या बातम्या