
जगातील सर्वात जुन्या शाकाहारी रेस्टॉरंटबद्दल बोलताना भारताचं नाव आपल्या मनात येत असेल, पण तसं नाहीय. जगातील सर्वात जुने रेस्टॉरंट झुरिच, स्वित्झर्लंड येथे आहे, जे 1898 पासून सुरू आहे. या पूर्णपणे शाकाहारी रेस्टॉरंटचे नाव हौस हिल्ट (Haus Hiltl) आहे, जे एकाच कुटुंबातील लोक पिढ्यानपिढ्या वारसा म्हणून चालवत आहेत. अगदी शुद्ध शाकाहारी शैलीमुळे त्याचे नाव गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये (guinness book of world record) नोंदवले गेले आहे. इथं भारतीय पद्धतीची थाली पद्धतही आहे.

सुमारे 120 वर्षांपूर्वी हिल्ट कुटुंबातील अॅम्ब्रोसियस हिल्ट (Ambrosius Hiltl) यांनी शहराला त्यांच्या कुटुंबातील शाकाहारी पाककृतींची ओळख करून देण्यासाठी याची सुरुवात केली होती. तेव्हा याचं नाव Vegetarierheim आणि Abstinence-Café असं होतं. इथल्या मेनूमध्ये फक्त बटाटे आणि इतर मूळ भाज्या असायच्या. तेव्हापासून या रेस्टॉरंटचे नाव अनेकदा बदलले आहे. मेनूमध्ये डिशेस देखील जोडल्या गेल्या. मात्र, इथली एक गोष्ट अजूनही बदलली नाही ते म्हणजे शाकाहारी जेवण.

मात्र, त्यावेळी युरोपमध्ये शाकाहार नगण्य होता आणि डुक्कर आणि गायींचे मांस प्रामुख्याने खाल्ले जात असे. जे फळे आणि हिरव्या भाज्या खायचे त्यांनी हिप्पी म्हणून पाहिले जात होते, म्हणजे अशी तरुण पिढी जी खाण्यासाठी भटकी आहे आणि ज्यांना प्रत्येक गोष्टीत प्रयोग करायचे आहेत. अशा परिस्थितीत हे रेस्टॉरंट सुरू झाल्यानंतर शहरात विविध गोष्टी घडल्या. शुद्ध हिरव्या पालेभाज्या देणारे हे रेस्टॉरंट अतिशय वाईट नजरेने पाहिले जात होते. हिल्ट कुटुंबाला मूर्ख आणि अगदी वेडे म्हणून हिणवले जाऊ लागले. या परिस्थितीतही कुटुंबाने रेस्टॉरंट बंद केले नाही आणि अखेरीस ते वेगळेपणामुळे प्रसिद्धीस आले.

शाकाहार आणि शाकाहारी जीवनशैलीचे फायदे समोर आल्यानंतर 1951 पासून या रेस्टॉरंटला प्रसिद्धी मिळू लागली. आता फक्त स्विस पदार्थच नाही तर आशियाई, भूमध्यसागरीय, भारतीय अशा सर्व प्रकारच्या शाकाहारी चवी इथे मिळतात. येथील सर्वात खास डिश Zürcher geschnetzeltes आहे, जी एक शाकाहारी स्विस डिश आहे.

Haus Hiltl हे पाच मजली रेस्टॉरंट आहे, जिथे जेवणासोबतच हजारो पुस्तके देखील उपलब्ध आहेत. ही सर्व पुस्तके जगभरातील शाकाहारी पदार्थांबद्दल माहिती देतात. Meat the Green हे या रेस्टॉरंटचे सर्वात लोकप्रिय वैशिष्ट्य आहे. झुरिचमधील बहुसंख्य लोक मांसाहारी असल्याने, रेस्टॉरंटच्या मालकाने शाकाहाराला प्रोत्साहन देण्यासाठी मीट द ग्रीन नावाचे एक कूकबुक लिहिले. असे सुमारे 60 मीट आणि फिश डिशेस लिहिले गेले आहेत, ज्यामध्ये प्रत्यक्षात मांस किंवा मासे नसतात. यामध्ये दूध आणि सोयापासून बनवलेल्या उत्पादनांचा वापर करण्यात आला आहे. येथे लोकांना शाकाहारी जेवण बनवण्याचे प्रशिक्षणही दिले जाते.

मांसाहाराला प्राधान्य देणाऱ्या देशात शाकाहारी रेस्टॉरंट का सुरू झाले याची कथाही खूप रंजक आहे. त्यावेळच्या हिल्ट कुटुंबाचे प्रमुख अॅम्ब्रोस हिल्ट यांना संधिवात झाल्याचे सांगितले जाते. 18 व्या शतकात, यावर कोणताही इलाज नव्हता, हळूहळू रुग्ण अंथरुणावरला खिळतो आणि लवकरच त्याचे आयुष्य संपत असे. तेव्हा एका स्थानिक डॉक्टरांनी रुग्णाला सांगितले की जर हा आजार आटोक्यात आणायचा असेल तर मांसाहार पूर्णपणे सोडून द्यावा लागेल. तेव्हा पालेभाज्यांचे फारसे पर्याय नव्हते. अशा परिस्थितीत हिल्टने स्वतः शाकाहारी आहाराचे प्रयोग सुरू केले. मग तो ऍब्स्टिनेन्स नावाच्या रेस्टॉरंटमध्ये जायचा, जिथे काही शाकाहारी गोष्टी मिळत होत्या. हिल्टने हे रेस्टॉरंट विकत घेतले आणि पूर्णपणे शाकाहारी जेवण देऊ लागले.

विशेष म्हणजे ज्या वर्षी हिल्टने रेस्टॉरंट विकत घेतले, त्याच वर्षी स्वित्झर्लंडमध्ये मांसमुक्त आहाराची मोहीम सुरू झाली. तेव्हापासून रेस्टॉरंटमध्ये जगभरातील शाकाहारी पदार्थ तयार केले जाऊ लागले. चव आणि वासामुळे येथे भारतीय खाद्यपदार्थांकडे विशेष लक्ष दिले जाते. देशाचे माजी पंतप्रधान मोरारजी देसाई स्वित्झर्लंड दौऱ्यावर असताना या रेस्टॉरंटमध्ये जेवण करायचे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर.
आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.