ट्रेनमधील वातानुकूलित डब्यातून प्रवास करताना अनेकदा खराब एसीचा तुम्हालाही अनुभव आला असेल. बऱ्याचदा आपण याकडे दुर्लक्ष करुन त्रास सहन करतो. मात्र, एका जागरुक वृद्ध व्यक्तीने हिच गोष्ट गांभीर्याने घेत, व्यवस्थेला चांगलेच वठणीवर आणलं आहे. प्रवासादरम्यान एसी खराब असल्याविरोधात तक्रार केल्यानंतर आता त्यांना 50 हजार रुपये नुकसान भरपाई मिळणार आहे. जिल्हा ग्राहक आयोगाने ही भरपाई देण्याचे आदेश रेल्वे मंत्रालयाला दिले आहेत. 2017 मध्ये अलाहाबाद-मुंबई दुरांतो ट्रेनच्या फर्स्ट क्लासमध्ये ते प्रवास करत होते. यावेळी त्यांनी एसी खराब झाल्याची तक्रार केली होती. खराब एसीमुळे त्यांना 42 अंश सेल्सिअस इतका उडाका सहन करावा लागला असल्याचे त्यांनी तक्रारीत म्हटले होते.
कुणाची फसवणूक, कुणाचा छळ, कुणाला मानसिक त्रास, कुणाच्या वैयक्तित आयुष्यात ढवळाढवळ, कुणाच्या हक्कांवर गदा, प्रॉपर्टीचे वाद, कौटुंबिक कलह.. कुठल्याही विषयासंदर्भात कायदा काय सांगतो? शहाण्याने कोर्टाची पायरी चढू नये म्हणतात, पण अनेकांनी ती चढून आपला हक्क मिळवला आहे. या कायद्याच्या गोष्टी सोप्या करून सांगणारी नवी सीरिज #कायद्याचंबोला. कायद्याच्या अभ्यासक वकिलांकडूनच तुम्हाला मिळेल अगदी खात्रीशीर माहिती. तुम्हालाही कुठल्या विषयी कायदेशीर शंका असतील तर Rahul.Punde@nw18.com या मेलवर आम्हाला सांगा.
TOI च्या अहवालानुसार, आयोगाने म्हटले आहे की तक्रारकर्त्याला गंभीर गैरसोयीचा सामना करावा लागला, तसेच ताज्या हवेसाठी कोणतीही पर्यायी सुविधा नव्हती. यामुळे त्यांचा श्वास गुदमरला आणि संपूर्ण प्रवासात गैरसोय झाली. जी तक्रारदाराच्या सेवेतील घोर कमतरता आहे. आरामदायी आणि सुरक्षित प्रवासासाठी त्यांनी महागडे प्रथम श्रेणीचे तिकीट घेतले होते. आयोगाने पुढे सांगितले की, एसी चालत नसल्यामुळे तक्रारदार शिवशंकर शुक्ला यांना रेल्वेने 1,190 रुपयांचे तिकीट भाडे परत केले होते. रेल्वेने आपली चूक मान्य केल्याचे रेल्वेनेच सिद्ध केले. घटनेच्या वेळी शिवशंकर शुक्ला यांचे वय 60 वर्षे होते.
शुक्ला मे 2019 मध्ये दक्षिण मुंबई जिल्हा ग्राहक विवाद निवारण आयोगाकडे तक्रार घेऊन गेले होते. 3 जून 2017 रोजी संध्याकाळी अलाहाबाद जंक्शन ते मुंबई या प्रवासादरम्यान एअर कंडिशनर काम करत नसल्याचे त्यांनी तक्रारीत म्हटले आहे. शुक्ला यांनी ही बाब तिकीट कंडक्टरच्या निदर्शनास आणून दिली होती. त्यांनी तक्रारीत पुढे म्हटले आहे की, एसी टेक्नीशियनने एसी सिस्टीम दुरुस्त करण्यासाठी आवश्यक पावले उचलली. पण, त्यात कोणतीही सुधारणा झाली नाही. एसी काम करत नसल्यामुळे दिवस जसजसा पुढे सरकत गेला, तसतशी डब्याची अवस्था बिकट होत गेली. दुसऱ्या दिवशी दुपारी एलटीटी टर्मिनसवर ट्रेन येईपर्यंत ही स्थिती कायम राहिली, असे तक्रारीत म्हटले आहे.
कोणत्याही सेवेसाठी तुम्ही शुल्क आकारले असेल तर त्याचा पूर्णपणे आनंद घेणे तुमचा अधिकार आहे. अशा स्थितीत जर तुम्हाला तो मिळत नसेल तर तुम्ही त्याविरोधात न्याय मागू शकता.
वाचा - बायकोचे अधिकार मिळेना? पोलिसांचा तक्रार घेण्यास नकार, वकील परवडेना, काय आहे Law
ग्राहकांना त्यांचा हक्क मिळावा यासाठी भारतात ग्राहक संरक्षण कायदा बनविला गेला आहे. ग्राहकांना त्यांचा हक्क मिळावा यासाठी हा कायदा अंमलात आला आहे. या कायद्यांतर्गत कोणताही ग्राहक कोणत्याही प्रकारच्या अन्यायकारक व्यापाराची तक्रार करू शकतो, ज्यासाठी त्यांना पूर्ण अधिकार देण्यात आले आहेत.
महाराष्ट्रातील ग्राहकांना तक्रार करायची असल्यास प्रक्रिया कशी?
महाराष्ट्रात ग्राहक, संस्था नोंदणी अधिनियम, 1860 किंवा कंपनी अधिनियम, 1956 किंवा त्या त्या काळापुरत्या अमंलात असलेल्या अन्य कोणत्याही कायदयान्वये नोंदणी करण्यात आलेली कोणतीही ग्राहक स्वेच्छा संघटना, केंद्र सरकार राज्य शासने किंवा संघराज्य क्षेत्र प्रशासने, एका ग्राहकास अधिक ग्राहकांच्या वतीने एकाच कारणासाठी तक्रार करता येते. तक्रारकर्ता ग्राहक स्वतः किंवा त्याचा अधिकृत प्रतिनीधी तक्रार दाखल करु शकतो.
तक्रारीत काय असावं?
ग्राहकाचं व्यापाऱ्याकडून कशा प्रकारे नुकसान झालं. खरेदी केलेल्या वस्तूतील दोष, सेवांमध्ये आढळलेल्या उणिवा, व्यापाऱ्यानं अधिक घेतलेली रक्कम याचा उल्लेख ग्राहक तक्रार निवारण आयोगाकडं करायच्या तक्रारीत करता येते.
तक्रार कुठे करायची?
ग्राहक संरक्षण कायद्यांतर्गत नुकसानभरपाई किती आहे त्यावरुन तक्रार कुठे करायची हे ठरवलं जाते. 20 लाखापर्यंत असल्यास संबंधित जिल्हा ग्राहक तक्रार निवारण मंच, 20 लाख ते 100 लाख रुपयापर्यंत राज्य ग्राहक तक्रार निवारण आयोग, 100 लाख रुपयांहून अधिक राष्ट्रीय ग्राहक तक्रार निवारण आयोग, दिल्ली यांच्याकडे तक्रार करता येते. ग्राहकानं तो घेत असलेल्या सेवा आणि वस्तूमध्ये दोष, उणिवा आढळल्यास दोन वर्षांच्या कालवधीमध्ये तक्रार करता येते.
वाचा - महागडे वकील परवडत नाहीत; एकही पैसा खर्च न करता जलद न्याय मिळवण्याचा मार्ग
तक्रार कशी दाखल करायची?
ग्राहकांना तक्रार नोंदवायची असल्यास त्यासाठीची प्रक्रिया सोपी आहे. जिल्हा ग्राहक तक्रार निवारण मंच, राज्य तक्रार निवारण आयोग आणि राष्ट्रीय ग्राहक तक्रार निवारण मंचाकडे लेखी तक्रार प्रत्यक्ष किंवा टपालानं करता येते. ऑनलाईन पद्धतीनं तक्रार करायची असल्यास https://edaakhil.nic.in/edaakhil/ या वेबसाईटवर देखील तक्रार करता येते.
तक्रारीचं शुल्क
ग्राहकमंचाकडं तक्रार करायची असल्यास शुल्क देखील भरावं लागतं. 1 ते 5 लाख रुपयांपर्यंतची नुकसानभरपाई हवी असल्यास त्याबाबतचं शुल्क भरावं लागत नाही. 5 लाख ते 10 लाखापर्यंत 200 रुपये आहे. तर 10 लाख ते 20 लाखांपर्यंत 400 रुपये फी भरावी लागते. राज्य ग्राहक तक्रार निवारण मंचाकडे 20 लाख ते 50 लाख रुपयांसाठी 2 हजार रुपये तर 50 लाख ते 1 कोटींपर्यंत 4 हजार तर राष्ट्रीय मंचाकडे तक्रार करायची असल्यास 1 कोटींपेक्षा अधिक रक्कम असल्यास 5 हजार रुपये शुल्क भरावं लागते.(कायदे वेळोवेळी बदलत असतात. वरील माहिती ही सध्याच्या कायद्यानुसार आहे. त्यामुळे कोणतीही कायदेशीर कारवाई करण्याअगोदर कायदेतज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.)
(लेखिका कायद्याच्या अभ्यासक असून पुण्यात कायदेशीर सल्लागार आणि पुणे जिल्हा न्यायालयात वकील म्हणूनही कार्यरत आहेत.)
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Consumer, Indian railway, Legal