आपले वाचक मच्छिंद्र यांनी एक फ्लॅट खरेदीचा व्यवहार केला आहे. यासाठी त्यांनी अगोदर विक्री करार केला. त्यानंतर प्लॅटची संपूर्ण रक्कम मालकाच्या हवाली केली. मात्र, त्यानंतर मालक रजिस्ट्री म्हणजे कराराची नोंदणी करण्यास टाळाटाळ करत आहे. अशा परिस्थितीत आपली फसवणूक झाली का? आपले पैसे वाया जातील का? अशा भीती मच्छिंद्र यांच्या मनात निर्माण झाली आहे.
कुणाची फसवणूक, कुणाचा छळ, कुणाला मानसिक त्रास, कुणाच्या वैयक्तित आयुष्यात ढवळाढवळ, कुणाच्या हक्कांवर गदा, प्रॉपर्टीचे वाद, कौटुंबिक कलह.. कुठल्याही विषयासंदर्भात कायदा काय सांगतो? शहाण्याने कोर्टाची पायरी चढू नये म्हणतात, पण अनेकांनी ती चढून आपला हक्क मिळवला आहे. या कायद्याच्या गोष्टी सोप्या करून सांगणारी नवी सीरिज #कायद्याचंबोला. कायद्याच्या अभ्यासक वकिलांकडूनच तुम्हाला मिळेल अगदी खात्रीशीर माहिती. तुम्हालाही कुठल्या विषयी कायदेशीर शंका असतील तर Rahul.Punde@nw18.com या मेलवर आम्हाला सांगा.
लोक त्यांच्या आयुष्यभराची कमाई मालमत्ता खरेदी करण्यासाठी गुंतवतात. मात्र, अनेकदा मालमत्तेची खरेदी करताना विक्रेत्याकडून अडवणूक केल्याच्या घटना घडल्या आहेत. मालमत्तेचा संपूर्ण व्यवहार झाल्यानंतरही अनेकदा मालमत्ता विकणारी व्यक्ती रजिस्ट्री करण्यास टाळाटाळ करत असल्याचे दिसून येते. या समस्येचा सामना करण्यासाठी कायदेशीर तरतुदी आहेत.
दिवाणी आणि फौजदारी खटल्यांसाठी तरतूद
मालमत्ता विकणाऱ्या व्यक्तीची जबाबदारी आहे की खरेदीदाराकडून संपूर्ण रक्कम घेतल्यानंतर मालमत्तेवर लिखित मालकी हक्क खरेदीदाराला देणे म्हणजेच मालमत्तेची नोंदणी करणे होय. परंतु, मालमत्तेचा विक्रेता पैसे घेऊनही मालमत्तेची नोंदणी करण्यास टाळाटाळ करत असेल किंवा खोटी आश्वासने देऊन टाळाटाळ करत असेल, तर तो कायदेशीर गुन्ह्याच्या कक्षेत येतो. अशी प्रकरणे दिवाणी आणि फौजदारी अशा दोन्ही प्रकरणांतून निकाली काढली जातात. अशा प्रकरणांना सामोरे जाण्यासाठी, भारतीय दंड संहिता, 1860 मध्ये योग्य व्यवस्था करण्यात आली आहे. यासाठी आयपीसी कलम 406 आणि 420 द्वारे शिक्षा दिली जाऊ शकते.
वाचा - प्लॉट असो की शेत खरेदी-विक्री रजिस्ट्रीशिवाय अपूर्णच; काय आहे प्रकार?
आयपीसी कलम 406
या कलमांतर्गत, जर एखाद्याचा पैसा किंवा मालमत्ता चुकीच्या पद्धतीने किंवा फसवणूक करून हडप केली गेली असेल किंवा गंडा घातला गेला असेल तर तो गुन्हा आहे. या अंतर्गत दोषी व्यक्तीला 3 वर्षांची शिक्षा होऊ शकते.
आयपीसी कलम 420
अनेकदा बनावटगिरी, खोटे बोलणे, फसवणूक किंवा इतर तत्सम पद्धतींनी एखाद्याची मालमत्ता किंवा पैसा बळकावला गेल्यास या कलमाखाली शिक्षा दिली जाते. मालमत्तेच्या मालकाने पैसे घेऊनही रजिस्ट्री न केल्यास पीडित व्यक्ती या कलमाखाली गुन्हा दाखल करू शकते. या कलमान्वये गुन्हा दाखल झाल्यानंतरही त्या व्यक्तीला कठोर शिक्षेची तरतूद आहे.
वाचा - जमीन असो की फ्लॅट, खरेदीत फसवणूक टाळण्यासाठी या गोष्टी तपासा
कायदेशीर तज्ज्ञांचा सल्ला घ्या
पैसे देऊनही मालमत्तेची नोंदणी न झाल्यास, व्यावसायिक वकिलाचा सल्ला घेणे चांगले होईल. त्यामुळे कायदेशीर गुंतागुंत हाताळण्यास मदत होईल आणि तुमची बाजूही भक्कम होईल.(कायदे वेळोवेळी बदलत असतात. वरील माहिती ही सध्याच्या कायद्यानुसार आहे. त्यामुळे कोणतीही कायदेशीर कारवाई करण्याअगोदर कायदेतज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.)
(लेखिका कायद्याच्या अभ्यासक असून पुण्यात कायदेशीर सल्लागार आणि पुणे जिल्हा न्यायालयात वकील म्हणूनही कार्यरत आहेत.)
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.