मराठी बातम्या /बातम्या /लाइफस्टाइल /

#कायद्याचंबोला : पोलिसांचा तक्रार घेण्यास नकार; कुठे मागावा न्याय? FIR नोंदवण्याची A टू Z माहिती

#कायद्याचंबोला : पोलिसांचा तक्रार घेण्यास नकार; कुठे मागावा न्याय? FIR नोंदवण्याची A टू Z माहिती

पोलिसांचा तक्रार घेण्यास नकार

पोलिसांचा तक्रार घेण्यास नकार

अनेकदा पोलीस ठाण्यात रिपोर्ट नोंदवण्यात अडचण येते. तक्रार घेण्यास टाळाटाळ केली जाते. अशा सामान्य माणसाला काय करावं? काहीच कळत नाही.

  • News18 Lokmat
  • Last Updated :
  • Mumbai, India

आपल्या अनेक वाचकांनी ई-मेलच्या माध्यमातून एक कॉमन प्रश्न विचारला आहे. पोलीस तक्रार घेत नाही. किंवा तक्रार नोंदवून कारवाई करत नाही. असा अनुभव कदाचित तुम्हालाही आला असेल. अशावेळी काय करावं? कुठे न्याय मागावा? याची माहिती नसते. मात्र, कायद्याने सामान्य माणसालाही काही अधिकार दिले आहेत. तुमची तक्रार पोलीस ठाण्यात नोंदवली जात नसेल तर अशा पोलिसांना तुम्ही कायदेशीर पद्धतीने धडा शिकवू शकता.

Kaydyach bola Legal

कुणाची फसवणूक, कुणाचा छळ, कुणाला मानसिक त्रास, कुणाच्या वैयक्तित आयुष्यात ढवळाढवळ, कुणाच्या हक्कांवर गदा, प्रॉपर्टीचे वाद, कौटुंबिक कलह.. कुठल्याही विषयासंदर्भात कायदा काय सांगतो? शहाण्याने कोर्टाची पायरी चढू नये म्हणतात, पण अनेकांनी ती चढून आपला हक्क मिळवला आहे. या कायद्याच्या गोष्टी सोप्या करून सांगणारी नवी सीरिज #कायद्याचंबोला. कायद्याच्या अभ्यासक वकिलांकडूनच तुम्हाला मिळेल अगदी खात्रीशीर माहिती. तुम्हालाही कुठल्या विषयी कायदेशीर शंका असतील तर Rahul.Punde@nw18.com या मेलवर आम्हाला सांगा.


अजूनही सामान्य माणूस पोलीस ठाण्याची पायरी चढण्यास कचरतो. एखाद्या गुन्ह्याची तक्रार करायची असल्यास त्याच्या मनात अनेक प्रश्न उपस्थित होतात. गेल्या काही वर्षांत देशातील पोलीस यंत्रणेत अनेक बदल झाले आहेत. काही प्रमाणात ही व्यवस्था बदलली आहे. पण, त्यानंतरही अनेकदा पोलीस एफआयआर नोंदवण्यास नकार देतात. भारतीय कायद्यानुसार, प्रत्येक सामान्य नागरिकाला असे काही अधिकार देण्यात आले आहेत, ज्याचा वापर करून तो एफआयआर न नोंदवल्यास तक्रार दाखल करू शकतो. जर पोलिसांनी तुमची एफआयआर नोंदवण्यास नकार दिला, तर तुमच्याकडे एफआयआर नोंदवण्याचे अनेक मार्ग आहेत.

FIR शिवाय कारवाई होत नाही

कोणताही गुन्हा किंवा कोणत्याही प्रकारचा अपघात घडला की सर्वप्रथम त्या घटनेची माहिती जवळच्या पोलीस स्टेशनला द्यावी लागते. याला आपण प्रथम माहिती अहवाल किंवा FIR म्हणतात. एफआयआर तो लिखित दस्तऐवज असतो, ज्याची माहिती मिळाल्यावर पोलीस नोंदवतात आणि त्यावरुन कारवाई करतात. तक्रार आल्यानंतर पोलीस रिपोर्ट तयार करतात. एफआयआर दाखल झाल्याशिवाय पोलीस कोणतीही कारवाई करू शकत नाहीत.

वाचा - खोटी FIR, कोर्ट मॅरेज, संमतीशिवाय घटस्फोट, लग्नाशिवाय एकत्र राहणे; काय आहे कायदा

कोणत्या पोलीस ठाण्यात तक्रार करावी?

सामान्यतः असे समजले जाते की ज्या पोलीस ठाण्याच्या हद्दीत गुन्हा किंवा घटना घडली आहे, त्या पोलीस ठाण्यात तक्रार केली पाहिजे. मात्र, तुम्ही आपल्या जवळच्या पोलीस स्टेशनमध्ये देखील तक्रार नोंदवू शकता, जी नंतर संबंधित पोलीस स्टेशनला पाठविली जाते. पीडित व्यक्ती ज्यांना घटनेची किंवा गुन्ह्याची माहिती आहे ते जवळच्या पोलीस ठाण्यात जाऊन संपूर्ण तपशीलासह पोलिसांना कळवू शकतात. दखलपात्र गुन्ह्यासाठी एफआयआर लिहिणे हे पोलिसांचे काम आहे. त्या पोलीस ठाण्याच्या हद्दीत गुन्हा घडला नसला तरी पोलीस त्याचा अहवाल एफआयआर रजिस्टरमध्ये नोंदवतात. अशा एफआयआरला झिरो एफआयआर म्हणतात. हा रिपोर्ट नोंदवल्यानंतर पोलीस पुढील कारवाईसाठी संबंधित पोलीस ठाण्यात पाठवतील. जर गुन्हा अदखलपात्र असेल, तर पोलीस ते त्यांच्या एफआयआर रजिस्टर ऐवजी त्यांच्या एनसीआर म्हणजेच अदखलपात्र गुन्हे रजिस्टरमध्ये नोंदवतील. या एनसीआर रजिस्टरमध्ये अदखलपात्र गुन्ह्यांची नोंद आहे.

तक्रार कशी नोंदवावी?

दखलपात्र गुन्ह्याची तक्रार पोलिसांकडे लेखी आणि तोंडी दोन्ही प्रकारे करता येते. पोलीस तक्रार करणाऱ्या व्यक्तीला तक्रार लेखी देण्यास भाग पाडू शकत नाही. तोंडीही तक्रारी करता येतात. नोंदवण्याची जबाबदारी पोलिसांच्या प्रभारी अधिकाऱ्याची असते. तक्रार लिहिल्यानंतर तक्रार करणाऱ्या व्यक्तीला ती वाचून दाखवावी. त्यावर तक्रारदाराची स्वाक्षरी असेल आणि तक्रारीची प्रत त्यांना मोफत दिली जाते. ही तरतूद फौजदारी प्रक्रिया संहिता 1973 (CrPC) च्या कलम 154 मध्ये देण्यात आली आहे. जर तुम्हाला त्याची प्रत मिळाली नसेल आणि त्यावर संबंधित कलमांसह गुन्ह्याचे वर्णन लिहिलेले नसेल, तर तुमचा रिपोर्ट नोंदवला गेला नाही हे समजून घ्या.

वाचा - तुमच्याविरुद्ध कोणी खोटी FIR दाखल केली तर? घाबरू नका रद्द करण्याचा हा आहे मार्ग

एफआयआर नोंदवल्यानंतर काय होतं?

एफआयआर नोंदवल्यानंतर ड्युटी ऑफिसर एएसआयला घटनास्थळी पाठवले जाते. सर्व साक्षीदारांची चौकशी करून त्यांचे जबाब नोंदवले जातात. सर्व प्रथम, शॉर्ट रिपोर्टच्या आधारे, पोलीस अहवाल नोंदवतात. सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार, पीडित व्यक्तीकडून एफआयआर नोंदवल्यानंतर एक आठवड्याच्या आत फर्स्ट इन्वेस्टिगेशन पूर्ण केले पाहिजे.

तक्रार घेण्यास पोलिसांनी नकार दिल्यास काय करावे?

जर तुमची तक्रार कोणत्याही पोलिस ठाण्यात ऐकली गेली नसेल, तर तुम्ही संबंधित जिल्ह्याच्या पोलीस अधीक्षकांकडे लेखी तक्रार करू शकता. तुम्‍हाला तुमचा रिपोर्ट लिहिण्‍यासाठी तुम्‍ही पोलीस स्‍टेशनमध्‍ये कोणत्या वेळी गेलात आणि तिथे काय उत्तर मिळालं याची संपूर्ण माहिती लिखित स्वरूपात द्यावी लागेल. यानंतर संबंधित पोलीस ठाण्यात प्रकरणाचा तपास करून तुमची तक्रार नोंदवण्याची जबाबदारी एसपींची आहे. यानंतरही तुमची तक्रार नोंदवली गेली नाही, तर तुम्ही पोलीस स्टेशन किंवा एसपी कार्यालयात दिलेल्या सर्व अर्जांची प्रत घेऊन वकिलामार्फत न्यायालयात दाद मागू शकता.(कायदे वेळोवेळी बदलत असतात. वरील माहिती ही सध्याच्या कायद्यानुसार आहे. त्यामुळे कोणतीही कायदेशीर कारवाई करण्याअगोदर कायदेतज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.)

(लेखिका कायद्याच्या अभ्यासक असून पुण्यात कायदेशीर सल्लागार आणि पुणे जिल्हा न्यायालयात वकील म्हणूनही कार्यरत आहेत.)

First published:

Tags: Law, Legal, Maharashtra police