मराठी बातम्या /बातम्या /लाइफस्टाइल /

दहा वर्षांचा मुलगा चित्रकलेच्या माध्यमातून कमावतोय कोट्यवधी रुपये...

दहा वर्षांचा मुलगा चित्रकलेच्या माध्यमातून कमावतोय कोट्यवधी रुपये...

दहा वर्षांचा चित्रकार आंद्रेस वॅलेंसिया

दहा वर्षांचा चित्रकार आंद्रेस वॅलेंसिया

सध्या अमेरिकेतला दहा वर्षाचा एक चित्रकार त्याच्या खास पेंटिंग्जमुळे विशेष चर्चेत आहे. या मुलाची चित्रं पाहून त्याला लिटल पिकासो असं संबोधलं जात आहे.

  • Trending Desk
  • Last Updated :
  • Mumbai, India

कोणत्याही कलेचा आविष्कार ती कला साकारणाऱ्या कलाकाराप्रमाणेच इतर लोकांनाही आनंद देणारा असतो. चित्रकला त्यापैकीच एक होय. अनेक चित्रकारांसाठी ही कला समाधान, आनंदासोबतच उत्पन्नाचं साधनदेखील असते. सध्या अमेरिकेतला दहा वर्षाचा एक चित्रकार त्याच्या खास पेंटिंग्जमुळे विशेष चर्चेत आहे. या मुलाची चित्रं पाहून त्याला लिटल पिकासो असं संबोधलं जात आहे. या मुलाचं एक पेंटिंग नुकतंच 1.88 कोटी रुपयांना विकलं गेलं आहे. याशिवाय त्याच्या अनेक पेंटिंग्जची विक्री कोट्यवधी रुपयांना झाली आहे.

चित्रकलेच्या दुनियेत सध्या 10 वर्षांचा आंद्रेस वॅलेंसिया दमदार यश मिळवतोय. विशेष म्हणजे आंद्रेस सध्या इयत्ता पाचवीत आहे; पण त्याच्या पेंटिंग्जची विक्री कोट्यवधी रुपयांना झाली आहे. त्याचं एक पेंटिंग 1.88 कोटी रुपयांना विकलं गेलं आहे. या वर्षी जून महिन्यात त्याने प्रदर्शन भरवलं होतं. या प्रदर्शनात त्याची 35 पेंटिंग्ज विकली गेली. या सर्व पेंटिंग्जची किंमत 40 लाख ते 1.3 कोटी रुपयांदरम्यान होती. `न्यूयॉर्क टाइम्स`च्या वृत्तानुसार, हॉंगकॉंगमधल्या फिलिप्स डे प्युरीमध्ये त्याचं एक पेंटिंग 1.3 कोटी रुपयांना विकलं गेलं. तसंच इटलीमध्ये एका पेंटिंगची विक्री 1.88 कोटी रुपयांना झाली होती.

आंद्रेस यानं वयाच्या चौथ्या वर्षापासून अमेरिकेत सॅन दिएगोमधल्या त्याच्या घरात पेंटिंग काढण्यास प्रारंभ केला. आंद्रेसची आई एल्सा वॅलेंसिया 48 वर्षांची असून ती ज्वेलरी डिझायनर आहे. आंद्रेस तासनतास त्याच्या खोलीत बसून `रेटिना` नावाच्या ग्राफिटी आर्टिस्टचं पेंटिंग कॉपी करतो, ही गोष्ट त्याच्या पालकांच्या लक्षात आली. रेटिना हे आंद्रेसच्या वडिलांचे क्लायंट होते. आंद्रेसच्या आई-वडिलांनी त्याच्या कलेला प्रोत्साहन दिलं. त्यामुळे एक कलाकार म्हणून त्याचा आत्मविश्वास वाढत गेला. त्या वेळी चेस नावाच्या व्यक्तीनं या मुलाचं टॅलेंट जगासमोर आणण्याचा सल्ला आंद्रेसच्या आई-वडिलांना दिला.

हेही वाचा - तुम्ही आवडीने खात असलेले हे 5 पदार्थ आहेत अतिशय घातक; वाढवतात हृदयविकाराचा धोका

चेस यांनी आर्ट मियामीचे संचालक निक कॉर्निलॉफ यांच्याशी संपर्क साधून त्यांना आंद्रेसविषयी माहिती दिली. या छोट्या कलाकाराचं वय जाणून घेतल्यावर त्यांच्या मनात संभ्रम निर्माण झाला. त्यानंतर त्यांनी एका मोठ्या प्रदर्शनाचं आयोजन केलं होतं. प्रदर्शनात येणाऱ्यांना त्यांनी आंद्रेसच्या वयाविषयी सांगितलं नाही. अनेक व्हीआयपी प्रदर्शन पाहण्यासाठी आले आणि त्यांनी आंद्रेसचं पेंटिंग खरेदी केलं तेव्हा निक यांनी या दहा वर्षांच्या मुलाची कहाणी सर्वांना सांगितली. तुम्ही ज्याचं पेंटिंग खरेदी केलंय ते पेंटिंग त्यानं वयाच्या आठव्या वर्षी काढलं आहे, असं निकने सांगताच त्यांना आश्चर्याचा धक्का बसला. त्यानंतर अभिनेत्री सोफिया वर्गेरा आणि अभिनेता चॅनिंग टाटम यांनी आंद्रेसचं पेंटिंग खरेदी केलं.

आंद्रेसची लोकप्रियता दिवसेंदिवस वाढत आहे. बीटीएस सिंगर व्ही याने नुकतंच आंद्रेसचं एक पेंटिंग इन्स्टाग्रामवरून आपल्या कोट्यवधी फॉलोअर्सशी शेअर केलं आहे. कमी वयातच आंद्रेसने प्रसिद्ध आर्ट गॅलरीजमध्ये आपल्या कलेच्या जोरावर नाव कमावलं आहे. आंद्रेसविषयी द मियामी हेरॉल्ड, द न्यूयॉर्क पोस्ट, फोर्ब्ज, द टाइम्स ऑफ लंडनमध्ये लेख प्रकाशित झाले आहेत. याशिवाय `एबीसी`च्या `द वर्ल्ड न्यूज टुनाइट`मध्येही आंद्रेस सहभागी झाला होता.

हेही वाचा - Benefits of Ghee : बिनधास्त खा 'हे' तूप, अजिबात वाढणार नाही वजन

आंद्रेसची पेंटिंग्ज कोट्यवधी रुपयांना विकली जात आहेत. आंद्रेसनं आपल्या उत्पन्नातला एक भाग दान केला आहे. `आंद्रेसची जी काही कमाई आहे, त्यापैकी अडीच कोटी रुपये amfAR या एड्स चॅरिटी ग्रुप आणि मुलांसाठी दान केले आहेत,` असं त्याच्या आईनं सांगितलं.

`माझा मुलगा आर्टिस्ट आहे; पण तो अजून लहान मुलगा आहे सेलेब्रिटी नव्हे, ही गोष्ट ध्यानात घेतली पाहिजे. तो इयत्ता पाचवीत असून त्यालाही गणिताचा गृहपाठ करावा लागतो,` असं आंद्रेसची आई एल्सानं सांगितलं.

First published:

Tags: Lifestyle