मुंबई, 19 नोव्हेंबर: सतत व्हिडीओ गेम (VIDEO Games) खेळल्याने मनावर नकारात्मक परिणाम होतो आणि मानसिक आजार होऊ शकतात असं सांगितलं जातं. पण नुकत्याच झालेल्या एका अभ्यासाने वेगळंच वास्तव सर्वांसमोर मांडलं आहे. व्हिडीओ गेम हा खेळ म्हणून खेळला तर त्याचा माणसाच्या मनावर सकारात्मक परिणाम होऊ शकतो असं ऑक्सफर्ड विद्यापीठातील संशोधकांनी केलेल्या अभ्यासातून दिसून आलं आहे. त्यामुळे कुणी तुम्हाला व्हिडीओ गेम न खेळण्याबद्दल तत्त्वज्ञान सांगायला लागलं तर तुम्ही हा विज्ञानावर आधारित पुरावा त्यांच्यासमोर मांडू शकता.
कोरोनापासून बचावासाठी जगभरातील बहुतांश देशांमध्ये लॉकडाऊन घोषित करण्यात आला. त्यामुळे घरात बसून अनेकांनी व्हिडीओ गेम खेळणं पसंत केलं. याबाबत संशोधकांनी एक कालसुसंगत अभ्यास करायचं ठरवलं. व्हिडीओ गेम खेळणाऱ्यांकडून त्यांच्या खेळण्याचा वेळ न जाणून घेता या उद्योगातील 2 महत्वाच्या कंपन्या अर्थात 'इलेक्ट्रॉनिक आर्ट्स' आणि 'निनटेंडो' यांच्याकडून अभ्यासकांनी ही माहिती घेतली. अशा पद्धतीचा हा पहिलाच अभ्यास आहे. संशोधकांनी जगातील सर्वांत प्रसिद्ध असलेल्या "Plants Vs Zombies: The Battle for Neighborville" आणि "Animal Crossing: New Horizons," हे गेम खेळणाऱ्यांच्या वागणुकीचा अभ्यास केला आणि त्यानंतर या गेमर्सना सर्व्हेतील प्रश्नावलीची उत्तरं देण्यास सांगितलं.
या अभ्यासाच्या निष्कर्षांनी सर्वांनाच अचंबित केलं. खेळणाऱ्यांवर व्हिडिओ गेमचा विपरित परिणाम होणं दूरच पण सकारात्मक परिणाम दिसून आला. त्या गेमर्सच्या मनावर सकारात्मक परिणाम झाला जो त्यांच्या मानसिक आरोग्यासाठी हितकारक ठरणारा होता असं संशोधकांना लक्षात आलं. गेम खेळताना त्यांना मिळालेल्या आनंदापेक्षाही तो खेळण्यामुळे त्यांच्या मानसिक आरोग्यावर अधिक चांगला परिणाम होऊन त्याच्या मनात सकारात्मक उर्जा विकसित झाली. संशोधकांना असं लक्षात आलं की, गेममुळे निर्माण झालेल्या मैत्रीमुळे त्यांच्या मनात चांगल्या भावना उत्पन्न झाल्या.
या अभ्यासातील प्रमुख संशोधक प्रा. अँड्र्यू प्राझ्बिलॅस्की म्हणाले, ‘आमच्या संशोधनातून असं सिद्ध झालं आहे की, व्हिडीओ गेम आरोग्यासाठी वाईट असतातच असं काही नाही. माणसाच्या मानसिक आरोग्यावर परिणाम करणारे अनेक महत्त्वाचे घटक असतात. खरं तर खेळामुळे मनात सकारात्मकता येते. आणि व्हिडीओ गेम खेळल्याने ती सकारात्मकता गेमर्सना मिळते.' याबद्दल गेमर्समध्ये मतभेद आहेत पण त्यावर विशेष लक्ष देणं गरजेचं नाही. संशोधकांनी हे स्पष्ट केलं आहे की, एक खेळ म्हणून व्हिडीओ गेम एंजॉय करणाऱ्यांना सकारात्मक उर्जा मिळू शकते पण आपल्या आयुष्यातील अडचणींपासून पळ काढण्यासाठी व्हिडिओ गेम खेळणाऱ्यांच्या मानसिक अपेक्षा पूर्ण होणार नाहीत.