मुंबई, 4 फेब्रुवारी: संसारात भांड्याला भांडं लागणारच, असं म्हटलं जातं. कुटुंबातील सदस्यांमध्ये अधूनमधून खटके उडत असतात. पती-पत्नीमध्येही अनेकदा वाद होतो. लग्न झाल्यापासून एकदाही भांडण झालं नाही, असं जोडपं सहजासहजी सापडणार नाही. पण तुम्हाला माहिती आहे का, पती-पत्नीमध्ये भांडण होणं, हे त्या दोघांच्या नात्यांसाठी चांगलं असतं.
पती-पत्नींमधील भांडणाकडे नात्यात सर्व काही ठीक नाही, अशा दृष्टिकोनातून अनेकजण पाहतात. पण तुम्हाला हे समजल्यावर आश्चर्य वाटेल की, नकारात्मक वाटणारी ही गोष्ट जोडप्यासाठी खरोखर फायदेशीर असते. पती-पत्नींमधील भांडण त्यांना एकमेकांपासून दूर नेण्याऐवजी जवळ आणतं हे कसं घडतं, ते जाणून घेऊ.
एकमेकांना समजून घेण्यास मदत
भांडताना माणसाच्या व्यक्तिमत्त्वाचं खरं स्वरूप समोर येतं. तो त्याच्या भावना बिनधास्तपणे व्यक्त करतो. भांडणामुळे जोडप्याला एकमेकांचा स्वभाव समजण्यास मदत होते. यासोबतच त्यांच्यातील मतभेदही समोर येतात. या मतभेदांवर एकत्र विचार करून मार्ग काढल्यास नातं अधिक मजबूत होतं.
नातं अधिक घट्ट होतं
जेव्हा जोडप्यामध्ये वाद होतो, आणि नंतर दोघं मिळून तो सोडवतात, तेव्हा त्यांच्यातील नातं अधिक घट्ट होतं. त्यांच्यामध्ये परस्पर विश्वास वाढतो. कारण जोडप्याला सर्वांत मोठी भीती असते की, भांडण झालं तर त्यांच्यात दुरावा निर्माण होईल. पण जेव्हा ते दोघेही पुढाकार घेऊन एकमेकांतील वाद सोडवतात, तेव्हा त्यांच्यातील आत्मविश्वास वाढतो.
हेही वाचा : सांभाळून रहा .. आपल्या मधुर बोलण्याने समोरच्यावर भुरळ पडतात या महिला ....
नात्यात कटुता येत नाही
भांडणांना नकारात्मकतेनं पाहिलं जातं, आणि ते नातेसंबंधात कटुता आणतात. पण जेव्हा एखादी गोष्ट मनात ठेवण्याऐवजी त्याबद्दल बोललं जातं, तेव्हा समस्या सुटण्यास मदत होते. नात्यात कटुता येत नाही.
मनातील गोष्टी समोर
रागावलेला माणूस उघडपणे आपला राग व्यक्त करतो. वैवाहिक जीवनात अनेकदा घरामध्ये शांतता राहावी, यासाठी पती-पत्नी मनातील गोष्टी सांगत नाहीत. मात्र, त्यामुळे नातं सुधारण्याऐवजी त्यात दरी निर्माण होते. जर तुम्हाला एखादी गोष्ट चांगली वाटत नसेल, तर ती तुमच्या जोडीदाराला उघडपणे सांगा. तरच तुम्ही एकमेकांना अधिक चांगल्या प्रकारे समजून घेऊ शकाल.
एकमेकांबद्दल काळजी
तुमच्या जोडीदारानं काहीतरी सांगितलं, आणि तुम्हाला ते आवडत नाही? याचा अर्थ असा की, तुमचा पार्टनर तुमच्याबद्दल काय विचार करतो, याची तुम्हाला काळजी आहे. जेव्हा एखाद्याच्या मतानं स्वतःला काही फरक पडत नाही, तेव्हाच कोणतीही प्रतिक्रिया दिली जात नाही. त्यामुळेच तुमचा जोडीदार तुमच्या बोलण्यावर किंवा कृतीवर कोणतीही प्रतिक्रिया देत नाही, तेव्हा काळजी अधिक असायला हवी.
दरम्यान, पती-पत्नींमधील भांडण हे दोघांमधील नातं आणखी घट्ट होण्यासाठी उपयोगी ठरतं. पण हे भांडण फार टोकाला जाणार नाही, याचीही काळजी दोघांनी घेतली पाहिजे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.