मराठी बातम्या /बातम्या /लाइफस्टाइल /

अपुऱ्या झोपेमुळे होऊ शकतात 'हे' गंभीर आजार

अपुऱ्या झोपेमुळे होऊ शकतात 'हे' गंभीर आजार

झोप

झोप

प्रत्येक व्यक्तीनुसार त्याला आवश्यक असलेल्या झोपेचं प्रमाण बदलतं. अपुऱ्या झोपेमुळे होऊ शकतात गंभीर आजार. त्यामुळे काय काळजी घ्यायची जाणून घ्या.

  • Trending Desk
  • Last Updated :
  • Mumbai, India

मुंबई, 07 ऑक्टोबर:   शांत, सुखी झोप हे निरोगीपणाचं लक्षण असतं. झोप नीट न लागणं किंवा झोपेमध्ये अनियमितता असल्यास अनेक आजार मागे लागू शकतात. 'अमेरिकन अ‍ॅकॅडमी ऑफ स्लीप मेडिसिन'च्या (AASM) माहितीनुसार, अमेरिकेतल्या दर तीन व्यक्तींपैकी एका प्रौढ व्यक्तीला पुरेशी झोप मिळत नाही. झोपेमध्ये एखाद्या वेळी व्यत्यय आला, तर ते त्रासदायक असतं; मात्र ती झोप नंतर भरून काढता येऊ शकते; पण तसं वारंवार होऊ लागलं, तर व्यक्तीच्या कार्यक्षमतेवर दुष्परिणाम होतो. आरोग्याच्या समस्या उद्भवू शकतात. तसंच सुरळीत चाललेल्या आयुष्याची घडी विस्कटू शकते.

प्रत्येक व्यक्तीनुसार त्याला आवश्यक असलेल्या झोपेचं प्रमाण बदलतं. अमेरिकेच्या सेंटर्स फॉर डिसीज कंट्रोल अँड प्रिव्हेन्शनच्या  माहितीनुसार, प्रौढ व्यक्तीला दररोज 7 ते 9 तास झोपेची आवश्यकता असते. दररोज पुरेशी व शांत झोप न मिळाल्यास रोगप्रतिकारशक्ती कमी होणं, संभोगाची इच्छा कमी होणं, आकलनविषयक समस्या निर्माण होणं, वजनवाढ अशा आरोग्यविषयक तक्रारी सुरू होऊ शकतात. त्याशिवाय डायबेटीससारखे आजार होण्याचा धोकाही वाढतो. अनेक अपघात होण्यामागचं कारणही पुरेशी झोप न होणं हे असतं. चांगली झोप न लागण्याचे अनेक गंभीर परिणाम होऊ शकतात.

हेही वाचा - या व्हिटॅमिनच्या कमतरतेमुळं तरुणांच्या चेहऱ्यावर येतात पिंपल्स, ही आहेत इतर कारणे

मृत्यूचा धोका वाढतो

तज्ज्ञांच्या मते, चांगली व पुरेशी झोप घेणाऱ्यांच्या तुलनेत अपुरी झोप घेणाऱ्या किंवा झोपेत व्यत्यय येणाऱ्या व्यक्तींमध्ये मृत्यूचं प्रमाण जास्त असतं. रोज उशिरा झोपणं किंवा अपुरी झोप मिळणं यामुळे हृदयरोगाचा धोका वाढतो.

गंभीर आजार

झोपेच्या तक्रारी असणाऱ्यांना गंभीर आजार होऊ शकतात. उशिरा झोपेची सवय असणाऱ्या 90 टक्के लोकांमध्ये जीवघेणे विकार असू शकतात. डायबेटीस, स्ट्रोक, उच्च रक्तदाब, हृदयाच्या ठोक्यांमध्ये अनियमितता असणं, हार्ट अ‍ॅटॅक आदी विकार अपुऱ्या झोपेमुळे होऊ शकतात.

नैराश्य

पुरेशी झोप न मिळाल्यामुळे व्यक्तीमध्ये नैराश्याची लक्षणं दिसू लागतात. झोप न मिळाल्यामुळे नैराश्य वाढू शकतं. या दोन्हींचा परस्परसंबंध असल्यामुळे सतत अपुरी झोप घेण्यामुळे नैराश्य येऊ शकतं.

निर्णयक्षमतेवर परिणाम

पुरेशी झोप न मिळाल्यामुळे गोष्टी व्यवस्थित समजून घेऊन त्यावर योग्य निर्णय घेणं कठीण होतं. काही परिस्थितीत निर्णय घेण्याची क्षमता कमी होते.

वजनवाढ

कमी झोपणाऱ्या व्यक्ती लठ्ठ असण्याचं प्रमाण जास्त आहे, असं अनेक अभ्यासांमध्ये आढळून आलं आहे. WebMDच्या माहितीनुसार, झोप कमी झाल्यामुळे लेप्टिन संप्रेरकाची पातळी कमी होऊन जास्त खाल्लं जातं व त्याचा परिणाम वजन वाढण्यात होतो. झोप आल्यावर खाणं बंद करण्याचा संदेश मेंदूला देण्याचं काम हे संप्रेरक करतं. त्याचं प्रमाण कमी झाल्यानं जास्त खाल्लं जातं. तसंच झोप कमी झाल्यामुळे चयापचयाची क्रियाही मंदावते. त्यामुळेही वजनवाढ होते.

शरीर व मेंदूला आराम मिळण्यासाठी पुरेशी झोप गरजेची असते. यामुळे मन ताजतवानं होतं, मेंदू अधिक कार्यक्षम बनतो. त्यामुळे निरोगी आरोग्यासाठी शांत व पुरेशी झोप घेतली पाहिजे.

First published:

Tags: Lifestyle