ब्राझिलिया, 23 डिसेंबर : तीन वर्षांपासून बेघर असलेल्या आणि कुठेही कचरा गोळा करत फिरणाऱ्या व्यक्तीनं केवळ दाढी आणि कटींग केल्यामुळे त्याचं संपूर्ण आयुष्य बदललं. ही बेघर व्यक्ती जवळच्याच एका सलूनमध्ये गेली आणि त्यानं केस कापून घेतले, स्वच्छ दाढी केली. त्यानंतर कटिंग सलूनमधल्या एका व्यक्तीनं त्याच्या बदललेल्या लुकचा फोटो इंस्टाग्रामवर (Instagram) पोस्ट केली. हा मेक ओव्हर फोटो प्रचंड व्हायरल झाला. इकडून तिकडून फिरत हा फोटो त्या व्यक्तीच्या कुटुंबीयांपर्यंत पोहोचला. त्यामुळे तो तब्बल दहा वर्षांनंतर तो आपल्या कुटुंबाला भेटू शकला आहे.
45 वर्ष वय असणाऱ्या या व्यक्तीचं नाव योआओ कोहिलो गुमारेयास (João Coelho Guimarães) असं आहे. तो गेल्या तीन वर्षांपासून ब्राझीलच्या गोयानिया या शहरात राहत होता. त्याच्या कुटुंबियांना वाटत होतं की योाआओचा मृत्यू झाला असावा. कारण तो विमनस्क अवस्थेत घराबाहेर पडला होता. त्याची मनस्थिती बरी नव्हती. त्याला शोधण्याचे अनेक प्रयत्न कुटुंबीयांनी केले पण तो सापडला नाही. त्यामुळे तो परत भेटेल ही आशा त्याच्या कुटुंबियांनी सोडून दिली होती. पण या व्हायरल झालेल्या इन्स्टाग्राम पोस्टमुळे तो पुन्हा सापडला.
ब्राझीलमधील एलेजान्ड्रो लोबो या दुकानाच्या मालकाशी साधलेल्या संभाषणात त्यांनी सांगितलं की, ही व्यक्ती अनेकदा पुरुषांच्या कपड्यांच्या दुकानाच्या आणि या कटिंग सलूनच्या आसपास भटकत असायची. कधीकधी तो तिथून कचरा गोळा करत जायचा. एक दिवस तो या दुकानात आला पण त्यानं कोणतीही मागणी केली नाही. त्यानंतर दुकानातील काही लोकांनी त्याला भूक लागली आहे का? अशी विचारणा केली. पण त्याने भूक नाही, असं सांगितलं. 'एखादं रेजर आहे का? मला दाढी करायची आहे', असं त्याने विचारलं.
'त्यानंतरच आम्हालाच वाटलं की यामध्ये काही तरी ट्रान्सफॉरमेशन करायला हवं. या कामासाठी आम्हाला जवळपास दोन तास लागले. पण आम्ही हे केलं. ख्रिसमसच्या काळात या छोट्याशा बदलामुळं या व्यक्तीचं आयुष्य बदललं आहे. त्यामुळे आम्हाला देखील खूप आनंद झाला आहे', असं लोबो सांगतात. लोबो यांनी पुढं असंही सांगितलं की, कोहिल्होचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर त्याची आई आणि मुलीने फोन केला. गेल्या काही वर्षांपासून त्याचा मृत्यू झाला असावा असं गृहीत धरून त्याच कुटुंब जगत होतं. हा फोटो पाहून त्यांनी आमच्याशी संपर्क साधला, कारण कोहिल्होकडे ना स्वतःचा फोन नंबर आहे ना पत्ता. यामुळं आता त्याला त्याचं कुटुंब परत मिळालं आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Instagram, Photo viral