नवी दिल्ली, 22 जानेवारी : कोणे एके काळी उत्तर प्रदेशातल्या (Uttar Pradesh) बुंदेलखंड (Bundelkhand) प्रदेशात पिण्याच्या पाण्यासाठीही वणवण करावी लागत होती. तिथे पिण्याचं पाणीही रेल्वेच्या माध्यमातून पोहोचवलं जात होतं. अन्य वापरासाठी आवश्यक पाण्याचा पुरवठा टँकर्सद्वारे केला जात होता; पण आज तो प्रदेश सुफलाम् होण्याच्या मार्गावर आहे. बुंदेलखंडात आता स्ट्रॉबेरीचं (Strawberry) उत्पादन केलं जाऊ लागलं आहे. इथल्या स्ट्रॉबेरीला नवी ओळख मिळवून देण्यासाठी, तसंच बाजारपेठ उपलब्ध करून देण्यासाठी स्ट्रॉबेरी महोत्सवाचं (Strawberry Festival) आयोजन करण्यात आलं आहे.
बुंदेलखंड ही शौर्य आणि संस्कारांची भूमी मानली जाते. ही भूमी आता स्ट्रॉबेरीसाठीही ओळखली जाऊ लागली आहे. शेतकऱ्यांच्या कष्टांमुळेच ही ओळख मिळाली असल्याचं उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी म्हटलं आहे. या भागात स्ट्रॉबेरीची शेती होणं हे एखाद्या चमत्कारापेक्षा कमी नाही, असं मुख्यमंत्र्यांचं म्हणणं आहे. इथे पाणी उपलब्ध होऊ लागल्यामुळे इथून होत असलेलं लोकांचं स्थलांतर कमी होईल. स्ट्रॉबेरीची शेती करणाऱ्या शेतकऱ्यांचं मुख्यमंत्र्यांनी मनापासून अभिनंदन केलं. स्ट्रॉबेरीच्या शेतीला प्रोत्साहन देण्यासाठी ज्याप्रमाणे स्ट्रॉबेरी महोत्सव आयोजित करण्यात आला आहे, त्याप्रमाणे सिद्धार्थनगरमध्ये काळं मीठ आणि चंदोली, बाराबंकी, कौशांबी व प्रयागराज इथल्या स्थानिक उत्पादनांना प्रोत्साहन देण्यासाठीही महोत्सव आयोजित करायला हवेत, असं योगी आदित्यनाथ म्हणाले. हे देखील वाचा - Aadhar Card शिवाय देखील मिळेल LPG Cylinder वर सबसिडी, करा हे काम पूर्ण झाशीचे (Jhansi) जिल्हाधिकारी आंद्रा वामसी यांच्या म्हणण्यानुसार बुंदेलखंडाची जमीन कधी फलोत्पादनासाठी ओळखली गेली नाही. झाशी जिल्ह्याचा हा प्रदेश डाळी, तेलबिया, आलं आदींच्या उत्पादनासाठी ओळखला जातो. असं असताना पहिल्यांदाच दोन शेतकरी कुटुंबांनी कोणत्याही सरकारी मदतीशिवाय स्ट्रॉबेरीसारख्या वेगळ्या पिकाचा प्रयोग यशस्वी केला. ठिबक सिंचन (Drip Irrigation) आणि तुषार सिंचनासारख्या पद्धती वापरून या कुटुंबांनी स्ट्रॉबेरी शेती यशस्वी केली. झाशी आणि बुंदेलखंडातही स्ट्रॉबेरी होऊ शकते, हे त्यांनी दाखवून दिलं. या पार्श्वभूमीवर, झाशीत स्ट्रॉबेरी शेतीला प्रोत्साहन दिलं गेलं, तर शेतकऱ्यांना उत्पन्नाचं नवं साधन मिळू शकेल, असा विचार केला जात आहे. म्हणून झाशीमध्ये स्ट्रॉबेरी महोत्सव आयोजित करण्यात आला आहे. स्ट्रॉबेरीची शेती कशी करायची आणि ती कशी फायदेशीर ठरू शकेल, याबद्दल या महोत्सवात मार्गदर्शन केलं जाणार आहे. लोकांनी आपल्या अंगणात स्ट्रॉबेरीचं झाड लावावं, यासाठी जिल्हा प्रशासन नागरिकांना स्ट्रॉबेरीची रोपंही पुरवणार आहे.मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.