मुंबई, 31 मार्च : सध्या अनेक गोष्टींमध्ये तंत्रज्ञानाचा वापर केला जातो. आता सर्वच गोष्टी ऑनलाइन झाल्यामुळे मोबाइलचं महत्त्व वाढलं आहे. निरनिराळ्या गोष्टी मोबाइल अॅप्सच्या माध्यमातून घरबसल्या करणं शक्य झालं आहे. अर्थात याला वैद्यकीय क्षेत्रही अपवाद नाही. वैद्यकीय क्षेत्रात मोबाइल अॅप्सचा वापर वाढला आहे. या अॅप्समध्ये आता आणखी एका अॅपची भर पडली आहे. हे अॅप एआयवर आधारित आहे. डोळ्यांचा नेमका कोणता विकार झाला आहे, डोळ्यांचं आरोग्य कसं आहे हे आयफोनवरच्या या अॅपच्या माध्यमातून जाणून घेता येणार आहे.
तुम्हाला नऊ वर्षांची हाना रफिक ही मुलगी नक्कीच आठवत असेल. तिने सर्वांत कमी वयाची आयओएस अॅप डेव्हलपर होण्याचा मान मिळवला होता आणि या कारणामुळे ती चर्चेत आली होती. अॅपलचे सीईओ टीम कुक यांनीही हानाचं विशेष कौतुक केलं होतं. हानाची थोरली बहीण लीना रफिक ही एक स्वयंशिक्षित कोडर आहे. तिनं 'लहनास' नावाची एक वेबसाइट तयार केली असून, ही वेबसाइट मुलांना जनावरं, रंग आणि शब्दांविषयी माहिती देते. नुकतंच लीनानं 'ओग्लर आयस्कॅन' नावाचं एआयवर आधारित अॅप तयार केलं आहे. या आयफोन अॅपचा वापर करून अनोख्या स्कॅनिंग प्रक्रियेद्वारे डोळ्यांचे आजार आणि स्थितीविषयी जाणून घेता येऊ शकतं. अॅप स्टोअरवर हे अॅप सबमिट केल्यावर 11 वर्षांच्या लीनाने लिंक्डइनवर आपल्या यशाची माहिती देणारी पोस्ट शेअर केली आहे.
हेही वाचा - तुम्ही इतके तास झोप घेत नसाल तर व्हा सावध, संपूर्ण शरीराच्या धमन्या होऊ शकतात ब्लॉक
ती पोस्ट वाचून नेटकऱ्यांनी पॉझिटिव्ह प्रतिक्रिया दिल्या आहेत. नेटकऱ्यांनी लीनाचं विशेष अभिनंदन केलं आहे. तिच्या प्रभावी कामगिरीबद्दल कौतुकदेखील केलं आहे. कमेंटमध्ये एक युझर म्हणतो की, 'लीना, तू कौतुकास पात्र आहेस. वयाच्या 10व्या वर्षी तू हे मोठं काम केलं आहेस'. आणखी एका युझरने लीनाचं अभिनंदन करताना म्हटलं आहे की, 'डोळ्यांच्या संभाव्य आजारांचं आणि स्थितीचं निदान करू शकणारं एआय मोबाइल अॅप तयार करण्याच्या तुझ्या कर्तृत्वाबद्दल ऐकून खूप आनंद झाला'. एकीकडे नेटकरी तिचं कौतुक करत आहेत, तर दुसरीकडे काही युझर्सनी या अॅपच्या निष्कर्षांच्या अचूकतेविषयी प्रश्न उपस्थित केले आहेत.
लीनाने आर्कस, मेलॅनोमा, टेरिगियम आणि मोतिबिंदूसह संभाव्य नेत्रविकारांचं निदान करण्यासाठी एक प्रशिक्षित मॉडेलचा वापर केला आहे आणि हे अॅप कसं काम करतं त्याची सविस्तर माहिती लिंक्डइनवर पोस्ट केली आहे. या पोस्टमध्ये तिने हे अॅप विकसित करण्यामागची कहाणी शेअर केली आहे. `मी या अॅपच्या निर्मितीवर वयाच्या 10व्या वर्षापासून काम सुरू केलं होतं,` असं लीनानं पोस्टमध्ये म्हटलं आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.