Home /News /lifestyle /

फॅशन नाही तर सामाजिक चळवळीतून फाटक्या जीन्सचा ट्रेंड; जाणून घ्या #rippedjeans मागील रंजक कथा

फॅशन नाही तर सामाजिक चळवळीतून फाटक्या जीन्सचा ट्रेंड; जाणून घ्या #rippedjeans मागील रंजक कथा

गेल्या काही वर्षांपासून तरुणाईच्या फॅशनमध्ये ज्यांची चलती आहे, अशा फाटक्या जीन्स बुधवारी (17 मार्च) अचानक चर्चेत आल्या. उत्तराखंडचे मुख्यमंत्री तीरथसिंह रावत यांनी या फाटक्या जीन्सच्या ट्रेंडवर टीका केली आणि हा वाईट प्रभाव असल्याचं त्यांनी म्हटलं.

पुढे वाचा ...
डेहराडून, 18 मार्च: गेल्या काही वर्षांपासून तरुणाईच्या फॅशनमध्ये ज्यांची चलती आहे, अशा फाटक्या जीन्स (Ripped Jeans) बुधवारी (17 मार्च) अचानक चर्चेत आल्या. उत्तराखंडचे मुख्यमंत्री तीरथसिंह रावत (Teerath Singh Rawat) यांनी या फाटक्या जीन्सच्या ट्रेंडवर टीका केली आणि हा वाईट प्रभाव असल्याचं त्यांनी म्हटलं. उत्तराखंड बालहक्क संरक्षण आयोगाने डेहराडूनमध्ये (Dehradun) आयोजित केलेल्या अँटी-सबस्टन्स अॅब्यूज वर्कशॉपमध्ये ते मंगळवारी बोलत होते. 'फाटक्या जीन्स परिधान करणं हे पालकांनी मुलांपुढे ठेवलेलं वाईट उदाहरण आहे. 'पाश्चिमात्य जग आपली योगाची परंपरा अंगीकारायला लागलं आहे, अंगभर कपडे घालायला लागलं आहे आणि भारतीय मात्र दिवसेंदिवस नग्नतेकडे चालले आहेत,' असं रावत म्हणाले. त्यावरून या फॅशनची बुधवारी चर्चा सुरू झाली.
गुडघ्यावर, तसंच अन्यत्र अनेक ठिकाणी फाडलेल्या/फाटलेल्या, त्यातून दोरे बाहेर पडलेल्या जीन्स घालणं हे तरुणांचं आणि खासकरून तरुणींचं अलीकडच्या काळातलं आवडतं फॅशन स्टेटमेंट आहे. सुरुवातीला त्यावर टीका झाली; मात्र नंतर ती फॅशन बऱ्यापैकी रूढ झाली. सेलेब्रिटीजही अशा जीन्स घालून मिरवताना दिसतात. एअरपोर्ट फॅशन म्हणूनही या फॅशनला संबोधलं जातं.
1870च्या दशकात उशिरा लोएब स्ट्रॉस (Loeb Strauss) नावाच्या जर्मन उद्योजकाने पहिल्यांदा जीन्स तयार केली. एवढ्या वर्षांत त्यामध्ये अनेक बदल, सुधारणा झाल्या, त्यामध्ये नवनव्या डिझाइन्स आणण्यात आल्या. ही ट्राउझर (Trouser) सुरुवातीला फक्त कामगार वर्गाला डोळ्यासमोर ठेवून विकसित करण्यात आली होती. भारतात तयार केलेल्या डायपासून (Dye) तयार केलेला गडद निळा रंग जीन्सना देण्यात आला होता. तसंच, त्याचं कापड टिकाऊ होतं. त्यामुळे जीन्सचं रंगरूप कामगार वर्गासाठी अधिक साजेसं होतं.
फाटक्या जीन्सची (Ripped Jeans) फॅशन मात्र बरीच नंतर म्हणजे 1970च्या दशकात आली. समाजाच्या प्रति राग व्यक्त करण्यासाठी तेव्हा जीन्स पँटवर ओरखडे ओढून ती फाडली जायची. तिच्याकडे राजकीय सामाजिक चळवळ म्हणून पाहिलं गेलं. मॅडोनासह (Madonna) अन्य काही सेलेब्रिटींनी हा ट्रेंड लोकप्रिय केला. त्यामुळे राजकीय यंत्रणेविरुद्ध व्यक्त केलेल्या रागातून अशा प्रकारे फॅशनचा उदय झाला. सुरुवातीला ही फॅशन करणाऱ्या व्यक्ती जीन्स घरच्या घरीच फाडत असत; पण एकंदर कल लक्षात घेऊन डेनिम कंपन्यांनी नंतर स्वतः फाटक्या जीन्स तयार करून पुरवायला सुरुवात केली आणि त्या ट्रेंडचं व्यापारीकरण केलं.
नंतर मधल्या काळात 2010पर्यंत या फाटक्या जीन्सचा ट्रेंड थोडा ओसरला होता. त्या काळात मंकीवॉश, बूटकट, डबल शेडेड जीन्स असे डेनिमचे विविध प्रकार बाजारात आले. 2010नंतर फाटक्या जीन्सना नवा साज चढवून 'डिस्ट्रेस्ड डेनिम्स' (Distressed Denims) अशा नावाने त्यांचं रिब्रँडिंग करण्यात आलं. डिझेल (Diesel), बामेन (Balmein) अशा ब्रँड्सनी डिस्ट्रेस्ड जीन्स कॅटवॉकद्वारे सादर केल्या. तिथून हलक्या पावलांनी त्या फॅशनने पुन्हा बाजारपेठेत प्रवेश केला आणि ट्रेंड पुन्हा सुरू झाला.
(हे वाचा: 'ममता सरकारचा पराभव पक्का', मोदींचा दावा! 'खेला होबे' घोषणेलाही दिलं उत्तर) काही ठिकाणी फाटलेली जीन्स विकत घेण्यासाठी लोक जास्त पैसे देतात आणि ते फाडण्याचं काम घरीही होऊ शकतं, अशी टीका या ट्रेंडवर केली जाते.
सुरुवातीला या जीन्स घरीच फाडल्या जायच्या. कारण त्या वेळी जीन्सचं कापड हलकं असायचं. आता मात्र हे कापड जाड आणि घट्ट असतं. त्यामुळे ते घरी फाडणं अवघड असतं.
जीन्स फाडण्याची दोन तंत्रं आहेत. लेसरचा वापर किंवा हाताचं तंत्र. 2500 वॅटची लेसर शार्प डेनिम एचडी अॅब्रॅजन सिस्टीम (Laser Sharp DenimHD Abrasion System) त्यासाठी वापरली जाते. जीन्स एका धातूच्या पृष्ठभागावर ठेवून त्यावर डिझाइनच्या अनुषंगाने योग्य ठिकाणी लेसर किरणांचा मारा केला जातो. त्यामुळे त्या त्या ठिकाणी जीन्स जळत जाते. आणि त्यापासून फाटकी जीन्स तयार होते. दुसऱ्या तंत्रात हाताचा वापर करून जीन्स फाडल्या जातात.
First published:

Tags: Politics

पुढील बातम्या