भारतात Covid-19 उलटतोय! मुंबईपाठोपाठ आणखी एका शहरात कोरोनामुक्त रुग्णाला पुन्हा संसर्ग
कोरोनाव्हायरसची एकदा लागण झाल्यानंतर त्या व्यक्तीला पुन्हा संसर्ग (coronavirus reinfection) होऊ शकतो का, असा प्रश्न अनेकांच्या मनात आहे. दरम्यान भारतात आता अशी काही प्रकरणं दिसू लागली आहेत.
बंगळुरू, 06 सप्टेंबर : एखाद्या व्यक्तीला एकदा कोरोनाव्हायरस (Covid-19) झाल्यानंतर त्याला पुन्हा कोरोनाची लागण होऊ (Coronavirus reinfection) शकते का? तर आता अशी काही प्रकरणं समोर येऊ लागली आहे. आधी हाँगकाँग आणि आता भारतातही असं प्रकरण दिसून आलं आहे. भारतातही कोरोनामुक्त व्यक्तीला पुन्हा कोरोनाव्हायरसची लागण झाली आहे. मुंबईपाठोपाठ आता बंगळुरू शहरातही असं प्रकरण समोर आलं आहे.
भारतात कोव्हिड-19 हा आजार उलटण्याचं दुसरं प्रकरण समोर आलं आहे. आधी मुंबईतील एका महिलेला पुन्हा कोरोनाची लागण झाली होती. आता बंगळुरूतील महिलाही पुन्हा संक्रमित झाली आहे. ANI या वृत्तसंस्थेने बंगळुरूतील खासगी रुग्णालयातील महिलेला कोरोनाचं रिइन्फेक्शन झाल्याचं सांगितलं आहे.
A 27-yr-old female found to be the 1st confirmed case of #COVID19 reinfection in Bengaluru. She tested positive in July & was discharged after testing negative. However, in a month she developed mild symptoms & confirmed to have transmitted COVID again: Fortis Hospital, Bengaluru pic.twitter.com/aE6w0NkgaU
एएनआयच्या ट्वीटनुसार, बंगळुरूतील 27 वर्षीय महिला पुन्हा कोव्हिड-19 संक्रमित झाली आहे.जुलैमध्ये तिची कोरोना चाचणी पॉझिटिव्ह आली होती. उपचारानंतर तिची चाचणी नेगेटिव्ह आली आणि तिला डिस्चार्ज देण्यात आला. महिनाभरातच तिच्यामध्ये पुन्हा सौम्य लक्षणं दिसू लागली. तिला पुन्हा कोव्हिडचा संसर्ग झाल्याचं निदान झालं. अशी माहिती बंगळुरू फोर्टिस रुग्णालयाने दिली आहे.
देशात Covid-19 चा संसर्ग पुन्हा होण्याचं पहिलं प्रकरण आढळलं आहे ते मुंबईत. मुंबईतील सायन रुग्णालयातील डॉक्टरला पुन्हा कोरोना झाला आहे. सायन रुग्णालयातील अनेस्थिशिया विभागातील ही महिला डॉक्टर आहे, जी दुसऱ्यांदा कोरोना संक्रमित झाली आहे.
सायन रुग्णालयाचे अधिष्ठाता डॉ. मोहन जोशी यांनी दिलेल्या माहितीनुसार, कोरोनामुक्त झालेल्या या डॉक्टरमध्ये कोरोनाव्हायरसची लक्षणं पुन्हा दिसून आली. चाचणी केली असता पॉझिटिव्ह आली. त्यामुळे एकदा कोरोना झाला, शरीरात आता अँटिबॉडी आहेत म्हणून त्याकडे दुर्लक्ष करू नका. शरीरात पुरेशा अँटिबॉडी नसतील तर कोरोनाची पुन्हा लागण होऊ शकते.
कोरोनाव्हायरसची लागण झाल्यानंतर त्याला प्रतिकार करणाऱ्या अँटिबॉडीज शरीरात तयार होतात. शरीरात अँटिबॉडीज तयार झाल्यास त्या व्यक्तीला कोरोनाची पुन्हा लागण होण्यापासून आणि ज्यांना कोरोना लस दिली जाईल त्यांना कोरोनाचं संक्रमण होण्यापासून संरक्षण देऊ शकतात. मात्र वेगवेगळ्या अभ्यासांमध्ये या अँटिबॉडीज वेगवेळ्या कालावधीसाठी शरीरात राहत असल्याचं समोर आलं आहे.
मुंबईतल्या जेजे रुग्णालयाने (JJ hospital) आयबीट्स फाऊंडेशनसह मिळून कोरोनाव्हायरसची लागण झालेल्या आरोग्य कर्मचाऱ्यांचा अभ्यास केला. या अभ्यासात कोरोनाविरोधातील शरीरातील अँटिबॉडीज (corona antibody) 50 दिवसांतच कमी होत असल्याचं दिसून आलं. तर आइसलँडमधील बायोटेक कंपनी डिकोड जेनेटिक्सने केलेल्या अभ्यासानुसार कोरोनाची लागण झाल्यानंतर तयार होणाऱ्या अँटिबॉडीज कमीत कमी चार महिन्यांपर्यंत इम्युनिटी देऊ शकतात.
इंडियन मेडिकल काऊन्सिल रिसर्च (ICMR) ने दिलेल्या माहितीनुसार कोरोनाविरोधातील इम्युनिटी पाच-सहा महिने ते काही वर्षांपर्यंत टिकून राहू शकतं, असं वेगवेगळ्या अभ्यासात दिसून आलं आहे.