Home /News /lifestyle /

Mera Ration App: आता धान्य आणण्यासाठी रांगा लावण्याची गरज नाही; मोदी सरकारनं लाँच केलं नवीन App

Mera Ration App: आता धान्य आणण्यासाठी रांगा लावण्याची गरज नाही; मोदी सरकारनं लाँच केलं नवीन App

रेशन दुकानासाठी लांब रांगा लागलेल्या असल्याचं चित्र आता इतिहासजमा होऊ शकतं. ही प्रक्रियाही डिजिटल होत असून, केंद्र सरकारतर्फे Mera Ration हे मोबाइल App सादर केलं आहे. कशी करायची इथे नोंदणी?

नवी दिल्ली, 18 मार्च: रेशन दुकानावर रेशन घेण्यासाठी लांब रांगा लागलेल्या असल्याचं चित्र अजूनही अनेक ठिकाणी दिसतं. आता मात्र ती प्रक्रियाही डिजिटल होत असून, केंद्र सरकारतर्फे मेरा रेशन (Mera Ration) हे मोबाइल अॅप सादर करण्यात आलं आहे. त्यामुळे घरबसल्या मोबाइलवरून आपल्या रेशनधान्याची नोंदणी करणं शक्य होणार आहे. 'वन नेशन वन रेशन कार्ड' (One Nation One Ration Card) ही योजना केंद्र सरकारतर्फे काही काळापूर्वी सुरू करण्यात आली आहे. त्या योजनेचा भाग म्हणूनच हे अॅप सादर करण्यात आलं आहे. घरबसल्या रेशनचं बुकिंग कसं करायचं, याची माहिती घेऊ या. App डाउनलोड करून कसं वापरावं? - सगळ्यात आधी गुगल प्ले स्टोअरवर जावं. - सर्च बॉक्समध्ये Mera Ration App असं सर्च करावं. - आलेल्या सर्च रिझल्ट्समधून Mera Ration App डाउनलोड करून इन्स्टॉल करावं. - त्यानंतर ते अॅप ओपन करावं. - स्वतःचे रेशन कार्ड डिटेल्स भरून रजिस्ट्रेशन करावं. मेरा रेशन अॅपचे फायदे - सातत्याने बदली, स्थलांतर होणाऱ्या व्यक्तींना सर्वांत जास्त उपयुक्त - या अॅपद्वारे रेशन दुकानाबद्दलची सविस्तर माहिती मिळेल. - रेशन कार्डधारक या अॅपद्वारे स्वतःच्या सूचनाही सांगू शकतात. - रेशन धान्य घेण्यासंदर्भातली सगळी माहिती मिळेल. - किती, कोणतं धान्य मिळणार आहे, याचीही माहिती मिळेल. - सर्वांना सुलभपणे रेशन धान्य उपलब्ध होईल. मेरा रेशन अॅपद्वारे लोकांना त्यांच्यापासून सर्वांत जवळ असलेल्या रास्त धान्य दुकानाची माहिती मिळेल. तसंच आपली पात्रता, अलीकडे केलेले व्यवहार वगैरे माहितीही त्यातून मिळू शकेल. सध्या हे अॅप हिंदी आणि इंग्रजी भाषेत उपलब्ध आहे. लवकरच ते आणखी 14 भाषांमध्ये उपलब्ध केलं जाणार आहे. (हे वाचा: ना कागदपत्रांची गरज, ना बँकेत जाण्याची; घरबसल्याच उघडा बँक अकाऊंट)ज्यांची सातत्याने बदली होते, त्यांना प्रत्येक ठिकाणी गेल्यावर नव्याने रेशन कार्ड काढणं गैरसोयीचं होतं. त्यामुळे 'वन नेशन वन रेशन कार्ड' ही योजना राबवण्यात येत आहे. त्यामुळे कधी कोणत्या दुकानातून रेशन धान्य घेतलं होतं, याची नोंद या App मध्ये असेल. 'वन नेशन वन रेशन कार्ड या योजनेच्या अनुषंगाने सर्व लाभार्थी, खासकरून प्रवासी लाभार्थी, रेशन दुकान डीलर आणि सर्वच घटकांसाठी ही प्रक्रिया सोपी करणं हा अॅप सादर करण्यामागचा उद्देश आहे,' असं अन्न सचिव सुधांशू पांडे (Sudhanshu Pandey) यांनी सांगितलं.
First published:

Tags: Mobile app

पुढील बातम्या