Home /News /lifestyle /

थायरॉईड असल्यास शरीरात होतात 'हे' बदल, चुकूनही करु नका दुर्लक्ष

थायरॉईड असल्यास शरीरात होतात 'हे' बदल, चुकूनही करु नका दुर्लक्ष

अलीकडच्या काळात जीवनशैलीत (Lifestyle) मोठा बदल झाल्याचं दिसून येतं. बदलती जीवनशैली, चुकीचा आहार आणि ताण-तणावामुळे अनेकांना कमी वयातच हृदयविकार (Heart Disease), डायबेटीस यांसारख्या (Diabetes) गंभीर आजारांचा सामना करावा लागत आहे.

    मुंबई, 18 मे-   अलीकडच्या काळात जीवनशैलीत (Lifestyle) मोठा बदल झाल्याचं दिसून येतं. बदलती जीवनशैली, चुकीचा आहार आणि ताण-तणावामुळे अनेकांना कमी वयातच हृदयविकार (Heart Disease), डायबेटीस यांसारख्या (Diabetes) गंभीर आजारांचा सामना करावा लागत आहे. घराच्या जेवणाऐवजी बाहेरचे पदार्थ, फास्ट फूड खाण्याकडे कल वाढला आहे. हेदेखील शारीरिक समस्या वाढण्यामागचं प्रमुख कारण असल्याचं तज्ज्ञ सांगतात. हृदयविकार, डायबेटीस यांसोबत थायरॉइडशी (Thyroid) निगडित समस्याही वाढताना दिसत आहेत. खरं तर आजार होण्यापूर्वी शरीरात त्याची लक्षणं दिसून येतात. थायरॉइडशी निगडित विकारदेखील त्याला अपवाद नाहीत. त्यामुळे शरीरात अनैसर्गिक बदल जाणवल्यास किंवा अशा स्वरूपाची लक्षणं (Symptoms) दिसत असल्यास तातडीनं वैद्यकीय उपचार घेणं आवश्यक आहे. याविषयीची माहिती देणारं वृत्त `झी न्यूज हिंदी`ने प्रसिद्ध केलं आहे. थायरॉइडशी निगडित आजारामुळे शरीरात काही बदल दिसून येतात. थायरॉइड ही एक ग्रंथी (Gland) असून, ती गळ्यामध्ये असते. शरीरातली चयापचय क्रिया (Metabolism) या ग्रंथीद्वारे नियंत्रित केली जाते. आपण जे अन्नपदार्थ खातो त्यांचं ऊर्जेत रूपांतर करण्याचं काम ही ग्रंथी करते. या ग्रंथीत वाढ झाली तर समस्यांचा सामना करावा लागू शकतो. यामुळे शरीरावर दुष्परिणाम जाणवू शकतात. याची लक्षणं एकत्रित स्वरूपात दिसत नसल्याने याला सायलेंट किलर (Silent Killer) असंही म्हणतात. सर्वसामान्यपणे थायरॉइडचा त्रास असलेल्या व्यक्तीला झोप (Sleep) येण्यात अडचणी जाणवतात. थायरॉइड झाल्यावर गळ्यात गाठ येते. त्यामुळे गळ्याचा आकार मोठा दिसू लागतो. यामुळे बोलताना त्रास जाणवतो आणि गळ्यात वेदना वाढू लागतात. थायरॉइडशी संबंधित विकारामुळे चयापचय क्रियेवर परिणाम होतो. त्यामुळे एनर्जी कमी जाणवते. परिणामी संबंधित व्यक्तीला वेदना (Pains) आणि थकवा (Fatigue) जाणवू लागतात. तसंच गळ्याभोवतीची त्वचा काळी पडू लागते. वारंवार बद्धकोष्ठतेचा त्रास होणं हेदेखील थायरॉइडचं एक लक्षण आहे. तसंच यामुळे काही जणांना प्रमाणापेक्षा अधिक भूक लागते, तर काही जणांचं वजन वाढू लागतं. अशा स्वरूपाची लक्षणं दिसत असतील तर तातडीनं वैद्यकीय सल्ला आणि उपचार घेणं आवश्यक आहे. वारंवार भीती वाटत असेल तर त्याकडे दुर्लक्ष करू नये, अन्यथा यामुळे समस्या निर्माण होऊ शकतात. कारण वारंवार भीती वाटणं हेदेखील थायरॉइडचं लक्षण असू शकतं. काही जणांना भीती वाटल्याने घाम फुटतो. उपाय करूनही असा प्रकार कमी होत नसेल तर तातडीनं डॉक्टरांना दाखवणं आवश्यक आहे. एकूणच थायरॉइडशी संबंधित कोणत्याही लक्षणाकडे दुर्लक्ष केल्यास भविष्यात गंभीर आजार होण्याची शक्यता असते. त्यामुळे निदान, सल्ला आणि उपचार या गोष्टी तातडीनं करणं आवश्यक आहे.
    First published:

    Tags: Health Tips, Lifestyle

    पुढील बातम्या