नवी दिल्ली : घनदाट जंगल, तिन्ही बाजूंनी वाहणारं पाणी, एक मुलगी नदीतून पाणी घेऊन येते. आता ती स्वयंपाक करत आहे. मुलीची ओढणी चेहऱ्यावरून बाजूला होते. जळालेला भयंकर चेहरा दिसतो. एक डोळा बंद, नाकाच्या जागी फक्त एक टोक, ओठ गायब. स्वयंपाक करून आणि जेवून ती एका घराकडे जाते. इथं तिचा अर्धा चेहरा पूर्ण होतो. एखाद्या कादंबरीत शोभेल, असं आयुष्य जगलेल्या पद्मश्री प्लॅस्टिक सर्जन डॉ. योगी एरन यांची ही कहाणी.
अमेरिकेतलं एक शानदार हॉस्पिटल. तिथं एक मुलगी भेटायला आली. चेहरा एका बाजूने झाकला होता. खुर्चीवर बसल्यावर तिने स्कार्फ काढला. डोळ्यांपाशी एक तीळ. त्याकडे बोट दाखवत ती म्हणाली, “हे” काढून टाकायचं आहे. मग 75 वर्षांची एक महिला पोहोचली. तिला ब्रेस्ट नीट करून घ्यायची होती.
पेशंट येऊन अशी काही मागणी करायचे की मला डॉक्टर असण्याचाच राग यायचा. दुसरीकडे भारतातील जंगलांत, गावांत राहणारे लोक. त्यांचा चेहरा आणि हातपाय जळाले तरी त्यांच्याकडे उपचार करण्यासाठी पैसे नसतात. मला माझ्या देशाची फारच आठवण येऊ लागली. मी परत आलो. भारतात ऍसिडनं जळालेले चेहरे माझी प्रतिक्षाच करत होते.
माझं नाव डॉ. योगी एरन. 1983 साली डेहराडून शहरापासून काही अंतरावर स्वतःचं हॉस्पिटल काढलं होतं. त्याच काळात माझ्याकडे एक महिला आली. जंगलात मधाचं पोळं काढताना अस्वलानं तिच्यावर हल्ला केला होता. पूर्ण चेहऱ्यावर जखम झाली होती. दोन्ही जबडे गायब होते. एक डोळा गेला होता. नाकाच्या जागी फक्त दोन खड्डे दिसत होते मी सर्जरी सुरू केली. हळूहळू जबडे तयार झाले. मग ओठ तयार झाले. मी नाक तयार करत असताना तिनं मला थांबवलं. म्हणाली, डॉक्टर ओठ तयार झाले, बास झालं. आता मी चहा पिऊ शकते, बिडी ओढू शकते आणि माझ्या नवऱ्याची बोलू शकते. एवढं पुरेसं आहे. नाकाची गरज नाही. मी तिला थांबवत होतो, पण माझं काहीच न ऐकता ती निघून गेली.
डोंगराळ प्रदेशात जळण्याच्या घटना अनेकदा घडतात. अनेकदा तर मुलं जळालेल्या अवस्थेतच जन्माला येतात. एका मुलाची केस आली होती. डोक्यापासून पायापर्यंत एखादं कणीस भाजावं, तसा भाजला होता. वय जेमतेम एका आठवड्याचं असावं. त्याची आजी त्याला शेगडीवर शेकत होती. तिचा हात सुटला आणि बाळ शेगडीत पडलं. ही काही अशी एकमेव केस नव्हती.
घरात चूल किंवा शेकोटी तशीच पेटती ठेऊन आईवडील कामावर निघून जातात. कधी पाणी आणायला, कधी मजुरीसाठी. खेळणारी लहान मुलं आगीत भाजतात. गेल्या काही दिवसांपासून एक 18 वर्षांचा मुलगा आईच्या कडेवरून उपचारांसाठी येत आहे. दोन्ही हात लहान असतानाच जळाले होते. गावातच उपचार घेतले. चुकीचे उपचार झाले. जळालेले अवयव बरे होऊ शकतात, याची त्यांना कल्पनाच नव्हती. ते फक्त मलमपट्टी करायचे आणि बरं होण्याची वाट पाहायचे. नंतर माझ्याकडे यायचे.
ऍसिड हल्ला झालेल्या अनेक मुलीही येतात. एक मुजफ्फरनगरहून आली होती. चेहरा पाहून काळजाचा थरकाप उडावा, इतकी भयंकर परिस्थिती. तिच्या पतीला तिच्यावर संशय होता. झोपलेल्या पत्नीवर बादलीभर सल्फ्युरिक ऍसिड ओतलं. पण मुलगी शूर होती, जगण्याची प्रचंड उमेद होती. मी पोटात एक बलून बसवला. तिथंच पूर्ण चेहरा तयार केला. बरेच दिवस लागले. हळूहळू तो चेहरा खऱ्या चेहऱ्याच्या जागी लावणार होतो. मात्र एके दिवशी वॉर्डमध्येच तिचा मृत्यू झाला. त्या घटनेनंतर अनेक दिवस मी बेचैन होतो. ऍसिड बर्नच्या घटना अशाच भयंकर असतात. पेशंट कधी खचेल, याची खात्री नसते. आपल्यालाच धीर धरणं भाग असतं.
ऍसिड हल्ला झालेल्या मुली जुने फोटो सोबत आणतात. अगदी फुलासारख्या नाजूक चेहरा असलेल्या, चमकणारे डोळे असणाऱ्या मुली. आता नाकाच्या जागी फक्त दोन भोकं असतात. डोळे गेलेले असतात. चेहरा विद्रुप झालेला असतो. रडतात तेव्हा अश्रू नाही, ऍसिड टपकतं.
यातली प्रत्येक केस मला आतून हादरवून टाकते. अशा रुग्णांना बरं व्हायला वर्षभर जावं लागतं. अनेकदा यापेक्षाही जास्त. या काळात त्या थंड आणि पांढऱ्या रंगाच्या हॉस्पिटलमधील खोल्यांमध्ये राहणं हेदेखील सतत तो जळण्याचा अनुभव घेण्यासारखंच आहे. हा विचार करूनच मी जंगल आणि पाण्याच्या मध्ये हॉस्पिटल तयार केलं. रुग्णाचे नातेवाईक आणि स्वतः रुग्ण यांनी झाडं बघावीत, तिथल्या नदीत अंघोळ करावी, आजूबाजूच्या शेतातून भाजीपाला आणावा आणि स्वयंपाक करावा आणि जणू सहलीला आल्यासारखं आनंदात जगावं, हा त्यामागचा हेतू.
गरीबांना मोफत उपचार देतो, तर श्रीमंत नाराज होतात. छोट्या मोठ्या जखमा घेऊन उपचारांसाठी येतात आणि स्वतः गरीब असल्याचं खोटं सांगतात.
चेहरा पाहून मला लगेच सत्य समजतं. मात्र तरीही मी उपचार करतो. या लूटमारीमुळे मीपण थोडा जास्तच गरीब झालो आहे. दिलासा एवढाच की वर्षातून दोनदा अमेरिकी डॉक्टरही मदतीसाठी येतात. स्वतः गडगंज असतानाही घरांना कुलपं लावून इथल्या कच्च्या पक्क्या घरात राहून सेवा देतात.ते जर एवढं करू शकतात, मग मी तर इथलाच आहे. याच मातीतला आहे.
लग्नानंतरची काही वर्ष बायको नाराज असायची. म्हणायची, डॉक्टरशी लग्न करून मी गरीब झाले. तिची फारशी अपेक्षा नव्हती, मात्र आरामाचं जगणं असावं, असं तिला वाटायचं.
कार, बंगला, नवऱ्याचा वेळ आणि चांगलं जेवण. मात्र पती जंगलात राहायला गेला आणि ऑपरेशनच्या वेळी मला चाकू आणि सुऱ्या उकळत बसायला सांगायचा. वडील घराचं भाडं आणि किराणा पाठवायचे. तिचा राग योग्यच होता. पण माझा उद्देशही चुकीचा नव्हता. हळू हळू सर्वांनाच त्याची सवय झाली.
आज मी 82 वर्षांचा आहे. एकाच जागी उभा राहून सलग 7-8 तास सर्जरी करू शकतो. नजर आणि बोटं अजूनही तरूण आहेत. कितीही भयंकर केस असो, कधीच थरकाप उडत नाही.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Doctor contribution, Human story, Padma award, Padma Shri