मुंबई 19 सप्टेंबर : दाट, काळे केस स्त्रियांच्या सौंदर्यात भर घालतात. तर केसांमुळे पुरुषांचं व्यक्तिमत्त्वही खुलून दिसतं. पण जसजसं वय वाढतं तसं केसगळतीच्या समस्येला सामोरं जावं लागतं. वयाची चाळीशी गाठेपर्यंत अनेक पुरूषांना तर टक्कल पडलेलं असतं. पण सकस निरोगी आहारावर लक्ष केंद्रीत करण्यासह इतर काही साधे उपाय करून तुम्ही गमावलेले केस परत मिळवण्यासाठी प्रयत्न करू शकता.
माणसाचं वय वाढत जातं तेव्हा हळूहळू त्याच्या चयापचयात व त्वचेत बदल होऊ लागतो. वाढत्या वयात केसगळती होत असेल तर ही सर्वसामान्य प्रक्रिया आहे. परंतु, लहान वयात केस झडत असतील तर चिंतेचा विषय असतो. तुमच्या केसांची प्रचंड प्रमाणात गळती होत असेल आणि ते केस पुन्हा उगवावेत असं वाटत असल्यास साधारण उपाय केले जाणं अत्यंत आवश्यक आहे. यात प्रामुख्यानं आहारात प्रथिनांचा (Protein) समावेश असायला हवा. केस वाढीसाठी प्रोटिन फार महत्त्वाची भूमिका बजावतं. प्रोटिनपासूनच केसांचे बीजकोष (Hair Follicle) तयार होतात.
आहारात मिठाचं प्रमाण कमी करायचंय, पण सोडिअमदेखील हवंय; हे पदार्थ आहेत उत्तम पर्याय
आहारात प्रोटिनचं प्रमाण कमी असल्यानं केसगळतीच्या समस्येचा सामोरं जावं लागतं. त्यामुळे प्रोटिनयुक्त आहार वाढवण्याचा नेहमी सल्ला दिला जातो. यात अंडी, मासळीसारख्या कमी चरबी असलेल्या पदार्थांचं सेवन करणं गरजेचं असतं. यातून केसगळती थांबून दुसरे केस येण्यास मदत होते. याशिवाय आहारात योग्य व्हिटॅमिन्सचा समावेश असायला हवा. ‘व्हिटॅमिन ए’मुळे कवटीतील सीबमचे प्रमाण (नैसर्गिक तेलासारखा घटक) योग्य ठेवण्यास मदत होते. आणि व्हिटॅमिन ई मुळे डोक्यातील रक्ताभिसरण क्रियेला (Blood Circulation) चालना मिळते.
काही घरगुती उपायही फायदेशीर
केसगळतीवर अनेकदा घरगुती उपायही फायदेशीर ठरतात. यात काही आठवड्यापर्यंत लसूण, आलं आणि कांद्याच्या रसाची डोक्याला मालिश करू शकता. रात्री ते लावल्यानंतर सकाळी डोकं स्वच्छ धुवावं. यामुळे गेलेले केस पुन्हा येण्यास मदत होऊ शकते.
दररोज करा डोक्याचा मसाज
केसांची वाढ करायची असल्यास किंवा गेलेले केस परत येण्यासाठी नियमित टक्कल करायला हवं. यामुळे कवटीतील रक्ताभिसरण योग्य पद्धतीनं होत राहतं. शिवाय केसांना मजबूतीही मिळत असते. डोक्याचा नियमित मसाज केला जाणंही आवश्यक आहे. केस चांगले राहावेत म्हणून बाजारात अनेक प्रकारचे शॅम्पू मिळतात. केसांना चमकदार आणि निरोगी बनवण्याचा दावा शॅम्पूच्या जाहिरातींत केला जातो. पण शॅम्पूमध्ये अनेक प्रकारची रसायनं (Chemicals) असतात. केसांच्या वाढीसाठी ते नुकसानदायक ठरू शकतं. त्यामुळे शॅम्पू खरेदी करताना त्यात असलेल्या घटकांची माहिती घ्यावी. शॅम्पू मध्ये फळ, सीड ऑइल उदा. नारळ, ऑलिव्ह, कोरफड (Aloe Vera), कॅफिन यांचा समावेश असायला हवा.
आहारात बायोटिनचा करा समावेश
बायोटिन किंवा व्हिटॅमिन बी 7 तुमच्या केसांना कॅरोटिन तयार करण्यास मदत करतं. बायोटिनमुळे केसगळती थांबू शकते याचे ठोस पुरावे नाहीत; पण यामुळे केसांच्या वाढीला नक्कीच मदत होऊ शकते. अंडी, कांदे, रताळी, ओट्स, काजूंमध्ये मोठ्या प्रमाणात बायोटिन असतं.
केसांच्या वाढीवर परिणाम करणारे घटक
केसांची वाढ रोखण्यासाठी अनेक घटक कारणीभूत आहेत. यात प्रामुख्यानं अनुवांशिकता हे कारण असू शकतं. तुमच्या कुटुंबात कुणाला केसगळतीचा त्रास झाला असेल तर तुम्हालाही या समस्येला सामोरे जावं लागतं. याशिवाय हॉर्मोनमध्ये बदल, पोषक घटकांची कमतरता, किमोथेरेपी, ताण, झपाट्यानं वजन कमी होणं असे काही आजार किंवा उपचार सुरू असतील तेव्हा केस गळती होते व केसांच्या वाढीवर त्याचा परिणाम होतो.
केसगळती रोखण्यासाठी सर्वांत महत्त्वाचं म्हणजे तणावमुक्त जीवन जगलं पाहिजे. याशिवाय झोपही फार महत्त्वाची असते. जेव्हा तुम्ही चांगली झोप घेता तेव्हा हॉर्मोनची वाढ होते व पेशींचं उत्पादन वेगाने होण्यास मदत होत असते व केसांची निरोगी वाढ होण्यास फायदा होतो. त्यामुळे केसांची वाढ चांगली व्हावी असं वाटत असल्यास दररोज 8 ते 9 तास झोप आवश्यक आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Woman hair