मुंबई, 21 डिसेंबर : जवळपास गेल्या दोन वर्षांपासून जगभरात कोरोनाने (Corona) धुमाकूळ घातला आहे. कोरोनाचा प्रादुर्भाव सुरू झाल्यानंतर लॉकडाऊन (Lockdown) करण्यात आलं होतं. लॉकडाऊनमध्ये ज्या कंपन्यांना घरून काम करून घेणं शक्य होत त्यांनी आपल्या कर्मचाऱ्यांसाठी 'वर्क फ्रॉम होम'चा (Work From Home) पर्याय खुला करून दिला. आता अनलॉक झालेलं आहे तरी देखील अनेक कंपन्यांनी वर्क फ्रॉम होमचा पर्याय सुरू ठेवला आहे. ज्यांना दररोज ऑफिसला जाण्याचा कंटाळा येतो किंवा ऑफिसमधील गर्दी नकोशी वाटते, अशा कर्मचाऱ्यांना वर्क फ्रॉम होम हाच सर्वोत्तम पर्याय असल्याचं वाटतं. कारण, सकाळच्या शिफ्टला (Morning Shift) काम करणाऱ्यांना जास्त लवकर उठावं लागतं नाही. घरून काम करताना एकदम टिपटॉप तयार व्हावं लागत नाही. मात्र, काही कर्मचारी असे देखील आहे ज्यांना हा पर्याय मनस्ताप वाटू लागला आहे. प्रदीर्घ काळापासून घरातून काम केल्यामुळं शारीरीक आणि मानसिक आरोग्याच्या (Physical Mental Health) समस्या जाणवू लागल्या आहेत. अनेकांच्या कामगिरीवरही नकारात्मक परिणाम झाला आहे. या अडचणींवर मात करून वर्क फ्रॉम होममधील परफॉरमन्स (remote work performance ) सुधारण्यासाठी आम्ही काही टिप्स तुम्हाला सांगणार आहोत.
अधून-मधून विश्रांती घ्या
ऑफिसमध्ये काम करत असताना दिवसभरात आपल्याला ठराविक अंतरानंतर ब्रेक (Break) मिळतात. मात्र, जेव्हा आपण घरून काम करतो तेव्हा बऱ्याचदा आपण ब्रेक घेणं टाळतो. मात्र, ही गोष्ट शारीरीक आणि मानसिक आरोग्यासाठी घातक आहे. त्यामुळे ऑफिससोबत टेलिकम्युटिंग (telecommuting) करून दिवसभरात लहान-लहान ब्रेक शेड्यूल करून घ्या. काम करत असताना पाय मोकळे करण्यासाठी आणि थोडी ताजी हवा मिळविण्यासाठी पाच मिनिटांचा ब्रेक घेऊन आपल्या कामाच्या जागेवरून नक्की उठा. दिवसभरात असे छोटे-छोटे रिफ्रेशिंग ब्रेक (Refreshing Break) घेतल्यास बर्नआउट टाळण्यास मदत होऊ शकते.
हेही वाचा : बजेटमध्ये Honeymoon चा प्लॅन करताय? आनंद द्विगुणीत करण्यासाठी हे ठिकाण सर्वोत्तम
विश्रांती केव्हा घ्यायची ते ठरवा
दिवसभर काम करत असताना अधून-मधून विश्रांती घेणं हा तर अतिशय सामान्य सल्ला आहे. मात्र, ती कधी आणि किती वेळ घ्यायची हे ठरवणं कठीण आहे. कारण, बॉडी सर्रकॅडियन रिदमनुसार (body circadian rhythm) आपल्या शरीराला दर 90 मिनिटांनी 90 मिनिटांचा ब्रेक आवश्यक असतो. मात्र, आपल्या एका शिफ्टमध्ये असं करणं शक्य होणार नाही. त्यामुळं प्रत्येकानं आपापल्या सोयीनुसार विश्रांती घ्यावी.
टाईम मॅनेजमेंटचा प्रभावी वापर करा
ऑफिसमध्ये काम करताना दिवसभरात आपला किती वेळ जातो हे सहज लक्षात येतं. मात्र, घरून काम करत असताना टाईम मॅनेजमेंट (time management) करणं कठीण जातं. काही वेळा तर टारगेट पूर्ण झालं नसेल तर जास्तवेळही काम करत बसावं लागतं. परिणामी संपूर्ण दिवस एकाच कामात निघून जातो. त्यामुळं वर्क फ्रॉम करताना टाईम मॅनेजमेंट करणं गरजेचं आहे. यासाठी तुम्ही पोमोडोरो मेथडचाही (Pomodoro Method) वापर करू शकता. या मेथेडमध्ये दोन ते तीन तास काम केल्यानंतर 20 ते 30 मिनिटांचा ब्रेक घेतला जातो.
हेही वाचा : कफ सिरप ठरलं विष! खोकल्याच्या औषधामुळे 3 चिमुकल्यांचा मृत्यू; 16 मुलं पडली आजारी
वारंवार येणाऱ्या ईमेल्समुळं कामावर परिणाम होऊ देऊ नका
आपल्या ईमेल (Email) आयडीवर दिवसभरात अनेक मेल्स येतात. ते तपासण्याच्या नादात आपला वेळही जातो आणि त्याचा कामावरही परिणाम होतो. आपल्या प्रॉडक्टिव्हिटीवर (Productivity) याचा परिणाम होऊ नये, यासाठी दिवसभर मेल लॉगइन करून ठेवू नका. दिवसातून ठराविक वेळाच मेल ओपन करा.
वरील गोष्टी लक्षात ठेवल्यास वर्क्र फ्रॉम होम जास्त सुखकर होईल. याशिवाय, शक्य असल्यास एका स्वतंत्र खोलीत तुमचं वर्क स्टेशन (Workstation) तयार करा. ते शक्य नसल्यास काम करण्यासाठी जास्तीत जास्त शांत जागा निवडा.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.