मुंबई, 26 फेब्रुवारी : वजन कमी (weight loss) करण्यासाठी अनेक जण डाएट (diet) करतात, आपल्या खाण्यावर नियंत्रण ठेवतात. वजन नियंत्रणात राहावं यासाठी काय खावं आणि काय खाऊ नये, असा प्रश्न प्रत्येकाला असतो. सर्वसामान्यपणे भात (rice) आणि चपाती (chapati) हा आपल्या जेवणात असतेच. त्यामुळे वजन कमी करण्यासाठी भात खावा की चपाती आणि त्याचं प्रमाण किती असावं हे समजत नाही.
भात आणि चपाती दोघांमध्येही पुरेशा प्रमाणात कार्बोहायड्रेट्स असतात. भारतीय थाळीत प्रोटिन कमी आणि कार्ब्स भरपूर प्रमाणात असतात. मात्र तुम्हाला वजन कमी करायचं असेल, तर कार्बयुक्त आहार टाळायला हवा. त्यामुळे तुम्ही वजन घटवायचा विचार करत आहात, तर तुमच्या ताटात किती भात आणि किती चपाती हव्यात ते पाहुयात.
हेदेखील वाचा - बारीक व्हायचंय मग पोटभर नाश्ता आणि जेवण कमी करा
चपातीमधून किती पोषण मिळतं?
चपातीमध्ये कर्बोदकांशिवाय इतर अनेक पोषक घटक असतात. यामध्ये अनेक प्रकारचे मायक्रो न्यूट्रिएंट्स, प्रोटिन आणि फायबर असतात. त्यामुळे काही जण गव्हाचं पीठ चाळून घेत नाही, जेणेकरून यातील फायबर्स निघून जाऊ नयेत. एका चपातीतून मिळणाऱ्या कॅलरीचा विचार केला तर यामध्ये 15 ग्रॅम कार्ब्स, 3 ग्रॅम प्रोटिन, 0.4 ग्रॅम फॅट आणि 71 कॅलरी असतात.
भातातून किती पोषण मिळतं?
एक तृतीयांश वाटी भातामध्ये जवळपास 80 कॅलरीज असतात. भातामध्ये 18 ग्रॅम कार्ब्स, 1 ग्रॅम प्रोटिन, 0.1 ग्रॅम फॅट असतं.
हेदेखील वाचा - ही आहे Snacks करण्याची योग्य वेळ; पाहा कोणत्या वेळेला नेमकं काय खावं?
चपाती की भात काय खावं?
फोलेट हे द्रवात विरघळणारं एसं व्हिटॅमिन आहे, जे शरीरात नव्या पेशींची निर्मिती करतं आणि डीएनएही तयार करतं. तसंच यामध्ये आवश्यक प्रमाणात आयर्नही असतं. भात आणि चपाती दोघांमध्येही फोलेट असतं, मात्र त्याचं प्रमाण वेगवेगळं असतं.
भात आणि चपातीची तुलना करता भातापेक्षा चपातीमध्ये फॉस्फरस आणि मॅग्नेशिअम जास्त असतं. मॅग्नेशिअम ब्लड प्रेशर आणि ब्लड शुगर लेव्हल नियंत्रित करतं. तर फॉस्फरस लाल रक्तपेशी आणि आयर्नची कमतरता भरून काढतं.
जर तुम्हाला वजन घटवायचं असेल आणि भात की चपाती यापैकी काय खाऊ असा प्रश्न पडला असे तर भातापेक्षा चपाती फायदेशीर आहे. मात्र तुम्हाला भात आवडत असेल तर तुम्ही ब्राऊन राइस खाऊ शकता.
सूचना - या लेखात दिलेली माहिती सर्वसामान्य माहितीवर आधारित आहे. अंमलबजावणीपूर्वी तज्ज्ञांचा सल्ला जरूर घ्यावा.