मुंबई, 11 नोव्हेंबर : दिवाळी (diwali) म्हटलं की तेलातून तळलेली चकली, करंज्या, चिवडे आणि गोड लाडू आलाच. दिवाळीचा सण म्हणजे खवय्यांसाठी पर्वणीच. पण हेच खवय्ये जर डायबेटिजचे रुग्ण असतील तर हे तळलेले आणि गोड फराळाचे पदार्थ त्यांच्या आरोग्याला धोकादायक ठरू शकतात.
Beat O च्या एका अहवालानुसार उत्सवांदरम्यान लोकांच्या रक्तातील साखरेच्या पातळीवर खूप परिणाम होतो. गेल्या तीन वर्षांच्या अभ्यासानुसार, 250 mg/dL (milligrams per decilitre) पेक्षा जास्त ब्लड-ग्लुकोज लेव्हल असणाऱ्यांमध्ये दिवाळीनंतर 15% इतकी ब्लड-ग्लुकोज लेव्हल वाढली आणि 300 mg/dL पेक्षा जास्त ब्लड-ग्लुकोज लेव्हल असणाऱ्यांमध्ये दिवाळीनंतर 18% इतकी वाढ दिसली. मुख्यतः दुर्गा पूजा आणि दिवाळी दरम्यान ही वाढ झाली आहे आणि त्यानंतर आणखी तीन दिवस हे ब्लड-ग्लुकोज लेव्हल वाढलेलंच असतं. यावर्षी योगायोगाने दिवाळी ही 14 नोव्हेंबर रोजी साजरी होणार आहे ज्यादिवशी वर्ल्ड डायबेटिज डेसुद्धा आहे.
"भारतीय सण उत्सव, रंग, भोजन आणि आनंद यांनी भरलेले असून आपली समृद्ध आणि संस्कृती त्यातून दिसते. त्यापासून होणारा सकारात्मक परिणाम मोजताही येणार नाही. जरी एखाद्याला दीर्घकालीन आजार असला किंवा नसला तरीही त्याच्या या उत्सवाचा उत्साह मात्र कमी झाला नाही पाहिजे. सणांदरम्यान खाणं हे कमी जास्त होतच. आपल्या डॉक्टरांचा सल्ला घेऊन शुगर लेव्हल्स आटोक्यात आणू शकतो. त्याच सोबत उत्सवात तळलेले आणि गोड पदार्थ खाण्यावर काहीसा संयम आणून तब्येत उत्तम ठेवू शकतो. हायपोग्लायकेमिया (कमी शुगर लेव्हल) आणि हायपरग्लायकेमिया (जास्त शुगर लेव्हल) यांना नियंत्रणात आणण्यासाठी योग्य ती पावलं वेळीच उचलावी लागतील आणि इन्सुलिन वापरत असलेल्या रुग्णांनी विशेष काळजी घ्यावी," असं मुंबईच्या अपोलो स्पेक्ट्रा रूग्णालयाचे डायबेटीज हेल्थ फिजिशियन आणि सल्लागार डॉ. भाविक सागलानी यांनी IANSlife ला सांगितल्याचं टाइम्स ऑफ इंडियाच्या रिपोर्टमध्ये म्हटलं आहे.
हे वाचा - फक्त वेदनाच नाही तर झपाट्यानं कमी होणारं वजनही आहे पाठदुखीचं लक्षण
पुण्यातील अपोलो डायग्नोस्टिक्स वेस्ट इंडियातील टेक्निकल हेड आणि झोनल पॅथॉलॉजिस्ट डॉ. संजय इंगळे म्हणाले, "रुग्णांनी प्रत्येकवेळी जेवणाआधी इन्शुलिनचा डोस किती घ्यायचा हे ठरवण्यासाठी त्यांची ब्लड-शुगर लेव्हल तपासायला हवी. असं न केल्यास बर्याच समस्या होऊ शकतात. डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार औषधं आणि व्यायाम आणि त्याचनुसार आपला आहार जर सुनिश्चित केला तर नक्कीच रुग्णांना सणांचा आनंद दिलखुलासपणे घेता येईल. उत्सवांदरम्यान सुद्धा आपल्या ब्लड-शुगर लेव्हल्सवर लक्ष ठेवून ते मॅनेज करणं गरजेचं आहे."
या काही टीप्स आहेत ज्या तुम्ही फॉलो करून डायबेटिजवर नियंत्रण ठेवून सणांचा आनंद घेऊ शकता
1. एका दिवसात 3 वेळा जास्त जेवण न जेवता 4-5 वेळा थोडं थोडं जेवा. यामुळे ब्लड-शुगर नियंत्रणात राहिल आणि पोटही भरलेलं राहिल.
2. मिठाई आणि फराळ न खाता त्याऐवजी हेल्दी नाश्ता किंवा फळं खावीत. मिठाईचा एखादा छोटा तुकडा खाल्ल्याने काही फार त्रास होणार नाही.
3. सामान्य चॉकलेट्सपेक्षा चांगल्या क्वालिटीचे डार्क चॉकलेट खाल्ल्याने शुगर लेव्हल नियंत्रित राहिल. गोड पेय न पिता एखादा ग्लास पाणी किंवा शुगर फ्री ज्युससुद्धा पिऊ शकता.
हे वाचा - काढा, गरम पाण्याने कोरोनाचा काटा काढता काढता बळावले इतर आजार
4. व्हाइट राईसऐवजी ब्राउन राईस खा.
5. बेकरीमधले पदार्थ जसे बिस्किट्स आणि केक्स यांच्यापासून दूर राहावं. तळलेले समोसे किंवा भज्यासुद्धा खाऊ नका.
6. मद्यपानसुद्धा या उत्सवाच्या दिवसात टाळावं. कारण दारूमध्ये खूप प्रमाणात शुगर असतं ज्यामुळे रक्तातील साखरेची पातळी वाढते.
7. नियमितपणे आपल्या ब्लड-शुगर लेव्हल्सची तपासणी करत राहावी आणि काहीही त्रास आढळल्यास लगेच डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.