Home /News /lifestyle /

कैद्यांनी विणलेली पैठणी गृहमंत्र्यांनी विकत घेतली त्यांच्या होम मिनिस्टरसाठी आणि लिहिली भावुक पोस्ट

कैद्यांनी विणलेली पैठणी गृहमंत्र्यांनी विकत घेतली त्यांच्या होम मिनिस्टरसाठी आणि लिहिली भावुक पोस्ट

तुरुंगातील कैद्यांना पूर्वग्रहदूषीत नजरेनं पाहणं अतिशय चुकीचं असतं. त्यांचे मानवी अधिकार समजावून घेत त्यांना सन्मानानं वागवलं पाहिजे असा कृतीशील संदेश गृहमंत्र्यांनी दिला आहे.

  पुणे, 4 जानेवारी : एखाद्या गुन्ह्यामुळे कुणी कैदेत गेला की समाज नंतर त्याला जणू वाळीतच टाकतो. तुरुंगात (Jail) मात्र अनेक कैदी (prisoners) केलेल्या गुन्हयाचा पश्चाताप झाल्याने चांगल्या मार्गाकडे वळत नवी कौशल्यं शिकताना दिसतात. अशाच कैद्यांनी शिकलेल्या नव्या कौशल्यांचं कौतुक गृहमंत्री अनिल देशमुख (Home minister Anil Deshmukh) यांनी नुकतंच केलं आहे. यासंदर्भात त्यांनी इंस्टाग्रामवर (Instagram) आपल्या भावना व्यक्त करणारी सविस्तर पोस्टही लिहिली आहे. सोबत कैद्यानं समोर ठेवलेली गुलाबी रंगाची पैठणी (Paithani Saree) न्याहाळतानाचा फोटोही देशमुख यांनी टाकला आहे. गृहमंत्री अनिल देशमुख यांनी नुकतीच पुण्यातील येरवडा मध्यवर्ती (Central Jail of Yerwada) कारागृहाला भेट दिली. या भेटीत त्यांनी कैद्यांच्या कलाकौशल्याला आणि तिथे चालणाऱ्या कामांना समजून घेतलं. या कामांपैकी एक पैठणी निर्मिती केंद्र. कैद्यांनी रीतसर प्रशिक्षण घेत चालवलेल्या पैठणी निर्मिती केंद्राला देशमुख यांनी भेट दिली. कैद्यांनी विणलेल्या विविधरंगी पैठण्या त्यांनी पाहिल्या. सगळी प्रक्रिया समजावून घेतली. सोबतच एक गुलाबी रंगाची पैठणी त्यांनी आपल्या पत्नीसाठी विकतही घेतली.
  याबाबत इंस्टाग्रामवर पोस्ट लिहित भावना व्यक्त करताना देशमुख यांनी लिहिलं आहे, "पुण्यातील येरवडा कारागृहास भेट दिली असता तेथील कैद्यांनी विणलेले पैठणी मी माझ्या पत्नीसाठी खरेदी केली. तुरुंगात येणारा प्रत्येकजण सराईत गुन्हेगार नसतो. रागाच्या भरात त्यांच्याकडून गुन्हा घडून जातो पण त्यानंतरही माणूस म्हणून जगण्याचा त्यांना निश्चितच हक्क आहे. त्यांनी तयार केलेल्या वस्तू विकत घेतल्यास त्यांना तुरुंगाबाहेर आल्यावर नवीन आयुष्य जगण्यास मदत मिळेल. या भूमिकेतूनच मी ही पैठणी खरेदी केली." पोस्टाच्या शेवटी आवाहन करताना देशमुख लिहितात, "नागरिकांनीही कैद्यांनी बनवलेल्या वस्तू खरेदी कराव्या. जेणेकरून आपल्याच समाजातील वाट चुकलेले हे लोक पुन्हा मुख्य प्रवाहात येतील." देशमुख यांच्या या पोस्टला अडीच हजारांहून अधिक लोकांनी लाईक केलं आहे. सोबतच अनेकांनी कमेंट्स करत या भूमिकेला उचलून धरलं आहे.
  Published by:News18 Desk
  First published:

  Tags: Anil deshmukh, Instagram

  पुढील बातम्या