बंगळुरू, 18 सप्टेंबर : माझ्यामध्ये कोरोनाची (coronavirus) सौम्य लक्षणं आहे, रुग्णालयापेक्षा घरीच माझ्यावर उपचार करून मी लवकर बरा होईन, माझ्याकडे घरी आयसोलेट (home isolation) होण्यासाठी पुरेशी जागा किंवा स्वतंत्र खोली आहे, असा सर्व विचार करून तुम्हीदेखील कोरोना झाल्यानंतर रुग्णालयात दाखल होण्याऐवजी घरीच आयसोलेट होण्याचा निर्णय घेत असाल तर सावध राहा. कारण तुमचा हा निर्णय तुमच्या जीवावर बेतू शकतो.
कर्नाटकच्या बंगळुरूमध्येदेखील (Bengaluru) अशाच कित्येक रुग्णांनी होम आयोसेलेट होण्याचा पर्याय निवडला. जो त्यांना चांगलाच महागात पडला. कोरोना रिपोर्ट पॉझिटिव्ह आल्यानंतर स्वत:हून होम आयसोलेट झालेल्या रुग्णांची चार ते पाच दिवसांतच प्रकृती खालावू लागली आणि अखेर त्यांनी रुग्णालयात धाव घेतली. असे कित्येक रुग्ण रुग्णालयात भरती होण्यासाठी कोरोना केंद्राशी संपर्क साधत आहेत.
द हिंदूच्या रिपोर्टनुसार, बंगळुरू महापालिकेला मदत करणाऱ्या एका स्वयंसेवी संस्थेच्या डॉक्टरांनी सांगितलं, ज्या रुग्णांनी प्राथमिक लक्षणं दिसल्यानंतर भरती होण्यास नकार दिला होता, त्यांची लक्षणं तीव्र झाली आणि आता ते रुग्णालयात दाखल होण्यासाठी संपर्क करत आहेत. दररोज असे 10 ते 15 फोन येत आहेत.
स्टेपवन या संस्थेतील स्वयंसेवक डॉक्टर निहाद निलोफर म्हणाले, "रुग्णांचा कोरोना रिपोर्ट पॉझिटिव्ह आल्यानंतर जेव्हा आम्ही त्यांना फोन करून रुग्णालयात भरती व्हायला सांगतो. तेव्हा रुग्ण आपल्या घरी आयसोलेशनसाठी अनेक खोल्या असल्याचं सांगतात. गेल्याच आठवड्यात एकाच कुटुंबातील सात जणांची कोरोना चाचणी पॉझिटिव्ह आली होती. त्यावेळी त्या कुटुंबाने आपल्या घरी आयसोलेशनसाठी सात खोल्या असल्याचं सांगत, रुग्णालयात दाखल होण्यास नकार दिला"
हे वाचा - कोरोनाचं संकट नेमकं कधी संपणार? भारतीय तज्ज्ञांनी पहिल्यांदाच व्यक्त केला अंदाज
जे रुग्ण घरीच उपचार घेत आहे. डॉक्टरांशी फोनमार्फत संवाद साधत आहेत, त्यांचा सल्ला घेत आहेत. असे काही रुग्ण तर तर आपल्याला असलेले आजार आणि लक्षणंही डॉक्टरांपासून लपवत आहेत.
याच संस्थेतील डॉक्टर पौर्णिमा एस. म्हणाला, "79 वर्षांचे रुग्ण जे लठ्ठही आहेत आणि 10 वर्षांपासून त्यांना स्लीप अप्निया आहे. नीट श्वास घेता यावा यासाठी ते मशीनही वापरतात, मात्र टेली-कन्सलटेशनमध्ये त्यांनी याबाबत आम्हाला माहितीच दिली नाही. तीन दिवसांनंतर त्यांच्या मुलाने आम्हाला फोन केला आणि त्यांना तीव्र स्वरूपात श्वसन समस्या जाणवू लागली. श्वास घ्यायला त्रास होऊ लागल्याचं सांगितलं"
हे वाचा - भारतात कोरोनाच्या संकटकाळात मेडिकल ऑक्सिजनाचा पुरवठा घटला, का जाणवतोय हा तुटवडा?
असे एक दोन नाही तर कित्येक रुग्ण आहेत. जे डॉक्टरांपासून आपले आजार, लक्षणं आणि खरी परिस्थिती लपवतात. घरीच आयसोलेट होतात आणि मग लक्षणं गंभीर होऊन त्रास होऊ लागला की रुग्णालयात धाव घेत आहेत.
"गेल्या एका आठवड्यात असे कमीत कमी 60 रुग्ण आपण पाहिले आहेत. कोरोना संसर्गात फक्त ऑक्सिजनचा प्रश्न नाही तर रुग्णांना हृदय आणि मेंदूसंबंधी उद्भवू शकतात, ज्या प्राणघातक ठरू शकता. गेल्याच आठवड्यात यामुळे तीन रुग्णांचा मृत्यू झाल्याचं आम्ही पाहिलं आहे. त्यामुळे लोकांनी गांभीर्याने घ्यावं", असं एचबीएस रुग्णालयातील कोव्हिड केअर कन्सलटंट मोहम्मद रफिउद्दीन राशिद म्हणाले.