दिल्ली, 8 मार्च: होळी (Holi) हा सण आता अगदी काही दिवसांवर येऊन ठेपला आहे. शुक्रवारी, 18 मार्चला देशभरात होळी साजरी केली जाणार आहे. रंग, भक्ती आणि स्नेहाचं प्रतीक मानला जाणारा हा सण दर वर्षी पारंपारिक उत्साहात साजरा केला जातो. आपल्या जीवनात सुख-समृद्धी, पैसा, यश, आनंद आणि समाधानाची उधळण व्हावी, असं प्रत्येकाला वाटतं. अर्थात त्यासाठी प्रत्येक जण परिश्रम घेत असतो; पण प्रत्येकाचं हे स्वप्न साध्य होतंच असं नाही. अशा वेळी आपण ज्योतिषशास्त्र (Jyotish shastra) आणि वास्तुशास्त्राचा (Vastu shastra) आधार घेतो.
होळी हा सण ज्योतिष आणि वास्तुशास्त्राच्या दृष्टिकोनातून विशेष मानला जातो. होळीच्या दिवशी वास्तुशास्त्रानुसार काही सोपे उपाय केल्यास मोठा लाभ मिळतो, असं या शास्त्राचे अभ्यासक सांगतात. हे सोपे उपाय करण्यासाठी काही विशेष गोष्टींची गरज असते. याविषयीची माहिती `आज तक`ने प्रसिद्ध केली आहे.
हे वाचा - Holi : शास्त्रानुसार कोणत्या रंगानी खेळायला हवी होळी, वाढेल सुख-समृद्धी-सौभाग्य
होळी या सणाला पारंपरिक, आध्यात्मिक महत्व आहे. या दिवशी घरामध्ये काही विशेष गोष्टी केल्यास घरात सुख आणि समृद्धी येते, असं वास्तुशास्त्राचे अभ्यासक सांगतात. अभ्यासकांनी दिलेल्या माहितीनुसार, होळी सणाच्या दिवशी श्री गणपतीची विधिवत पूजा करून थंडाई अर्पण केल्यास घर आणि कुटुंबात आनंदाचं वातावरण राहतं. घरातल्या व्यक्तींना नशिबाची साथ मिळू लागते. त्यांचं नशीब उजळतं.
होळीच्या दिवशी घरात भगवान श्रीकृष्ण (Lord Krishna) आणि राधा (Radha) यांचा फोटो लावणं शुभ मानलं जातं. हा फोटो तुम्ही तुमच्या देवघरात अथवा बेडरूममध्ये लावू शकता. कृष्ण-राधेचा फोटो आणल्यानंतर त्याची गंध, फूल वाहून पूजा करावी. त्यानंतर तो वास्तुशास्त्रानुसार घरात लावावा.
या झाडांमुळे उजळेल नशीब
झाडांमुळे नशीब उजळतं. होळीसारख्या शुभमुहूर्तावर तुम्ही तुमच्या घरात किंवा बेडरूममध्ये एखादं रोप (Plant) लावल्यास ग्रह दोष दूर होऊ शकतात. तुम्ही तुळस, मनीप्लांट किंवा घरात लावता येणाऱ्या कोणत्याही झाडांची लागवड करू शकता.
हे वाचा - या गोष्टींमुळे वाढू शकतात तुमच्या अडचणी, प्रगतीत येऊ शकतात अडथळे
घरावर ध्वज लावला असेल तर तो बदलण्यासाठी होळी हा सर्वोत्तम मुहूर्त मानला जातो. हा ध्वज कुटुंबात मान-सन्मान, सुख आणि समृद्धी आणतो.
कुठल्या दिशेला ठेवायचा फोटो?
एखाद्या कार्यात यश मिळण्यासाठी होळीच्या दिवशी घरात किंवा कार्यस्थळी पूर्व दिशेला (East Side) उगवत्या सूर्याचा फोटो लावावा. असं केल्यानं तुमचा भाग्योदय होईल आणि जीवनातले अनेक अडथळे आपोआप दूर होऊ लागतील. घरात सुख-समृद्धी, यश, पैसा, आनंद राहावा यासाठी होळीच्या दिवशी हे उपाय करणं फायदेशीर ठरू शकतं, असं वास्तुशास्त्राच्या अभ्यासकांनी सांगितलं.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.