हिवाळा सुरु झाला असून थंडीची चाहूल लागली आहे. थंडीमुळे अनेक जण आजारी पडतात. तसेच सध्या कोरोनानेदेखील थैमान घातलेलं आहे, त्यामुळे या काळात आरोग्याची काळजी घेणं अत्यंत गरजेचं असतं. हिवाळ्याच्या दिवसात अनेकांना गार हवेमुळे कफ (Cough Problem), खोकल्याचा त्रास होतो. घशात कफ जमा होणे ही एक सामान्य समस्या आहे. पण, सारखा कफ होत राहिल्यास हे एखाद्या गंभीर आजाराचं लक्षणही असू शकतं. रोगप्रतिकारशक्ती (weak immunity) कमकुवत असल्यासही अनेकांना कफचा त्रास होतो, म्हणूनच कफाने गंभीर स्वरुप धारण करण्याआधी त्याची लक्षणं अन् उपाय जाणून घ्या.
कफ होण्याची लक्षणे -
घशात आणि छातीत कफ जमा झाला की श्वास घ्यायला त्रास होतो. छाती जड वाटते, आवाज बसतो, श्वासाची दुर्गंधी येते आणि कधी-कधी छातीत दुखतं. तसेच घसा खवखवतो आणि रात्री खोकल्याचा त्रास होतो. ही सर्व घशात कफ तयार होण्याची लक्षणं (Cough Symptoms) आहेत. ही लक्षणं दिसल्यास तुम्ही अनेक घरघुती उपायांचा वापर करून कफ दूर करू शकता.
कफ झाल्यानंतर थंड पदार्थांचे सेवन करून नका. कफ कमी करण्यासाठी गरम पेये प्यावीत. तसेच सूप प्यायल्याने सुद्धा कफाची समस्या दूर होते. जर तुम्हाला कफ झाला असेल तर धूम्रपान टाळावं. धूम्रपान केल्यास तुमचा त्रास आणखी वाढू शकतो. यासोबतच कफ झाल्यास मिठाच्या पाण्याने गुळण्या कराव्या. हे देखील फायदेशीर ठरते, यामुळे घसा खवखवण्याची समस्या दूर होते. यासोबतच जर तुम्हाला सातत्याने घशात कफ होत असेल तर डॉक्टरांशी संपर्क साधा. घशात सारखा कफ तयार होत असेल तर फुफ्फुसांचे (Lung Disease) नुकसान होण्याची शक्यता असते. तसेच आरोग्याशी संबंधित इतर समस्याही उद्भवू शकतात, त्यामुळे वेळीच काळजी घ्या.
सर्दी-खोकल्यासाठी कोणते औषध घेणे सुरक्षित
कफ छातीत जमा होण्याची कारणे कोणती?
छातीत कफ (Cough Causes) जमा होण्याची अनेक कारणं आहेत. विषाणू संसर्ग किंवा फ्लू झाल्यानंतर घशात कफ तयार होतो. तसेच सर्दी-खोकला, ताप यामुळे सुद्धा घशात कफ जमा होऊ लागतो. एखाद्या गोष्टीची अलर्जी असल्यास कफाचा त्रास होतो. कफ जर बराच काळ राहत असेल तर याकडे दुर्लक्ष करू नका. हे फुफ्फुसाच्या काही गंभीर आजाराचे लक्षणही असू शकते. फुफ्फुस आणि खालच्या श्वसनमार्गाद्वारे कफ निर्माण होतो. शरीरात जास्त कफ तयार झाल्यावर तो घशात जमा होतो आणि कफामध्ये बॅक्टेरिया, विषाणू जमा होऊ लागतात.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Health, Health Tips