मुंबई, 23 मार्च : गुढीपाडव्यापासून चैत्र महिन्याला सुरुवात होते. संपूर्ण उत्तर भारतात चैत्र महिन्यात नवरात्रीचा उत्सव साजरा केला जातो. ज्याप्रमाणे महाराष्ट्रामध्ये शारदीय नवरात्रौत्सवाच्यावेळी नऊ दिवसांचा उपवास केला जातो, त्याचप्रमाणे उत्तर भारतात चैत्र नवरात्रीचा उपवास केला जातो. देवीचे भक्त उपवासाच्या वेळी आपल्या आहारावर नियंत्रण ठेवण्याचा प्रयत्न करतात. नियमित मीठ, गहू, तांदूळ आणि इतर अनेक पदार्थ टाळतात आणि फक्त फलाहार घेण्याचा प्रयत्न करतात. नवरात्रीच्या काळात उपवास केल्यानं शरीराला आणि मनाला अनेक फायदे होतात.
उपवासामुळे लिव्हर डिटॉक्स करण्यास आणि वजन कमी करण्यास मदत होऊ शकते. पण, उपवासाच्या काळात तळलेले पदार्थ खाल्यानं किंवा आपल्या आहारात पुरेसे फायबर आणि प्रोबायोटिक्स समाविष्ट न केल्याने नुकसानदेखील होऊ शकतं. अॅसिडिटी आणि बद्धकोष्ठतेसारख्या आतड्यांसंबंधी समस्या उद्भवू शकतात. रिकाम्या पोटी लिंबूवर्गीय फळं खाल्ल्याने आम्लपित्ताचा त्रास होऊ शकतो तर पुरेसं पाणी किंवा हायड्रेटिंग अन्न न घेतल्यानं बद्धकोष्ठता होऊ शकते.
जेव्हा पोटातील अॅसिड वारंवार अन्ननलिकेमध्ये परत जातं तेव्हा अॅसिडिटी किंवा गॅस्ट्रोइसोफेगल रिफ्लक्स डिसीज (जीईआरडी) उद्भवतो. यामुळे तुमच्या अन्ननलिकेच्या आवरणाला त्रास होऊ शकतो. दुसरीकडे, पाण्याच्या अपुऱ्या सेवनामुळे बद्धकोष्ठता होते. ही अशी स्थिती आहे ज्यामध्ये आतड्याची नीट हालचाल होऊ शकत नाही किंवा मल खूप कठीण होतो. पुरेशा प्रमाणात पाणी प्यायल्यास, आहारात फळं, फायबर, भाजीपाला आणि प्रोबायोटिक्सचा समावेश केल्यास या गॅस्ट्रोनॉमिकल समस्यांपासून मुक्त होण्यास मदत होऊ शकते.
न्यूट्रीशनिस्ट सोनिया बक्षी यांनी नवरात्रीचे उपवास करण्याबाबत काही टिप्स दिल्या आहेत.
1. लिंबूवर्गीय फळं खाणं टाळा: उपवास करताना मोसंबी, द्राक्ष आणि लिंबू यांसारखी लिंबूवर्गीय फळं रिकाम्या पोटी खाल्ल्याने आम्लपित्त होऊ शकतं. त्याऐवजी केळी, चिकू आणि खरबूज खाण्याचा प्रयत्न केला पाहिजे. ही फळं आतड्याला आराम देतात.
2. हायड्रेटेड राहा: उपवास करताना हायड्रेटेड राहणं महत्त्वाचे आहे. उपवास करत असताना थंड पाण्यापेक्षा कोमट किंवा गरम पाणी जास्त फायद्याचं ठरू शकते. तसेच, एकाच वेळी भरपूर पाणी पिण्यापेक्षा ठराविक अंतरानंतर थोडं-थोडं पाणी प्यायलं पाहिजे. एकाच वेळी भरपूर पाणी प्यायल्यानं ब्लॉटिंग आणि अॅसिडिटीच्या समस्या वाढू शकतात.
3. हेल्दी ड्रिंक्स घ्या: उपवासादरम्यान ताक आणि थंड दूधासारख्या पेयांचा आहारात समावेश करा. कारण त्यामुळे पोट शांत आणि थंड राहतं. तसंच नारळाचं पाणी प्यायल्यानं पीएच लेव्हल संतुलित राहण्यास आणि शरीरातील हानिकारक विषारी पदार्थ बाहेर टाकण्यात मदत होते.
4. फास्टिंग-फ्रेंडली फळं खा: उपवासाच्या काळात केळी आणि खरबूज यांसारख्या फळांना प्राधान्य दिलं पाहिजे. केळीमध्ये उच्च प्रमाणात पोटॅशियम असतं, जे अॅसिडिटीचा सामना करण्यासाठी आणि तिला प्रतिबंध करण्यासाठी ओळखलं जातं. शिवाय, केळांमध्ये फायबरदेखील असतं. केळांमुळे शरीरातील पीएच लेव्हल संतुलित राहण्यास मदत होते. खरबुजामुळे आम्लपित्त होत नाही.
5. व्यायाम करा: उपवासदरम्यान वर्कआउट्स तुम्हाला अधिक उत्साही बनवू शकतात. व्यायाम केल्यानं ओटीपोटातील रक्त प्रवाह वाढून तुमच्या आतड्यांच्या हालचाली सुरळीत राहतील.
6. हाय-फायबर फूड खा: जास्त फायबर असलेले खाद्य पदार्थ खाण्यावर लक्ष केंद्रित केलं पाहिजे. कारण ते बद्धकोष्ठता टाळण्यास मदत करतात आणि आतड्यांच्या हालचाली सुरळीत ठेवतात. राजगिऱ्यांच पीठ, गव्हाचं पीठ, भगर आणि मखाणा (फॉक्स नट्स) यांसारखे खाद्यपदार्थ शरीराला फायबरचा पुरवठा करतात.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Health Tips, Lifestyle, Navratri