मुंबई, 24 जानेवारी : तारुण्य ही निसर्गाने दिलेली देणगी आहे. परंतु जसजसे वय वाढत जाते तशी सर्वना आपल्या आरोग्याची विशेष काळजी घ्यावी लागते. विशेषतः महिलांना. तिशी पार करणं हे बहुतांश महिलांना इशारा देणारं असू शकतं. योग्य दिशेने टाकलेली छोटी पावलंही तिशीनंतरचं जीवन आरोग्यपूर्ण आणि सुंदर बनवण्यास मदत करू शकतात.
त्यामुळे तिशीनंतर महिलांनी आपल्या आहाराची काळजी घ्यावी तसेच व्यायामही करावा. मात्र सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे महिलांनी वयाच्या तीस वर्षांनंतर आपल्या काही वैद्यकीय तपासण्या नक्की करून घ्याव्या. फोर्टिस हॉस्पिटल, बेंगळुरू येथील कन्सल्टंट ऑब्स्टेट्रिशियन अँड गायनॅकॉलॉजिस्ट डॉ. गीत मोन्नप्पा यांनी या तपासण्यांबद्दल सविस्तर माहिती दिली आहे.
Lung Infection : लंग इन्फेक्शनपासून वाचण्यासाठी ओरल हेल्थची काळजी कशी घ्यावी?
तिशी ओलांडलेल्या महिलांनी नक्की कराव्या या आरोग्य तपासण्या
1. पॅप स्मिअर : महिलांना सर्व्हायकल कॅन्सर अर्थात गर्भाशयमुखाचा कर्करोग आहे का, याचं निदान करण्यासाठी पॅप स्मिअर ही टेस्ट केली जाते. वयाची 21 वर्षं पूर्ण झाल्यानंतर वयाच्या 65व्या वर्षापर्यंत दर तीन वर्षांनी पॅप स्मिअर टेस्ट करून घेण्याची शिफारस केली जाते.
2. एचपीव्ही (HPV) टेस्टिंग : वयाची 30 वर्षं पूर्ण झाल्यानंतर पॅप स्मिअर टेस्टबरोबरच HPV टेस्टिंगही करून घ्यावं. सर्व्हायकल कॅन्सर होण्याचा जास्त धोका आहे का याचं उत्तम निदान या माध्यमातून करता येऊ शकतं.
3. मॅमोग्राम : BRCA 1 आणि BRCA 2 म्युटेशन्स असलेल्या किंवा रक्ताच्या थेट नात्यातल्या व्यक्तीमध्ये अशी म्युटेशन्स असलेल्या महिलांना ब्रेस्ट कॅन्सर अर्थात स्तनाचा कर्करोग होण्याचा धोका मोठा असतो. अशा महिलांनी डॉक्टर्सकडून दर वर्षी क्लिनिकल ब्रेस्ट एक्झामिनेशन करून घ्यावी. त्यासोबतच तिशीनंतर मॅमोग्राम आणि स्तनांचा एमआरआयदेखील करून घ्यावा, अशी शिफारस अमेरिकन कॅन्सर सोसायटीने केली आहे.
4. प्रजननक्षमता आणि गर्भधारणापूर्व मूल्यमापन : आपली प्रजननक्षमता अर्थात फर्टिलिटी किती आहे याचा आढावा घेऊन त्या संदर्भात डॉक्टर्सशी चर्चा करण्यासाठी तिशी हे योग्य वय आहे. गर्भाशयातल्या बीजांडांची संख्या विशीनंतर कमी व्हायला सुरुवात होते आणि तिशीनंतर ही घट वेगाने व्हायला लागते. गर्भधारणा लांबवू इच्छित असलेल्या महिलांनी आपल्या गर्भाशयातल्या बीजांडांचं प्रमाण किती आहे हे तपासून घेणं श्रेयस्कर. म्हणजेच ते प्रमाण कमी असलं तर अन्य पर्याय काय आहेत याचा विचार करता येतो.
गर्भधारणापूर्व मूल्यमापन हे गर्भधारणा होऊ इच्छित असलेल्या सर्व वयाच्या महिलांनी करण्याचा सल्ला दिला जातो. गर्भवती होण्यासाठी त्या हेल्दी आहेत का, की थायरॉइड किंवा रक्तशर्करा यांचं प्रमाण गर्भधारणेपूर्वी सुधारण्याची गरज आहे, याचा अंदाज त्या चाचणीतून येतो. इम्युनिटी कमी असलेल्या महिलांना गर्भधारणेपूर्वी रुबेला व्हॅक्सिनेशनची शिफारस केली जाऊ शकते.
35 वर्षांपेक्षा जास्त वय असलेल्या महिलांना गर्भधारणेमध्ये वयानुसार असलेल्या जोखमी, डाउन्स सिंड्रोमचा धोका आदी संभाव्य गुंतागुंतींची माहिती असल्यास त्यांना लवकर निदान आणि उपचारांचे पर्याय समजून घेता येऊ शकतात.
5. लिपिड प्रोफाइल : वयाची वीस वर्षं पूर्ण केलेल्या प्रत्येक हेल्दी व्यक्तीने दर चार-सहा वर्षांनी लिपिड प्रोफाइल टेस्ट केली पाहिजे, अशी शिफारस अमेरिकन हार्ट असोसिएशनने केली आहे. आरोग्यपूर्ण आहार आणि व्यायाम/शारीरिक हालचाली यांवरही लक्ष केंद्रित करण्याचा सल्ला देण्यात आला आहे.
Diabetes And Peanut : डायबिटीजच्या रुग्णांनी शेंगदाणे खावे का? जाणून घ्या फायदे आणि नुकसान
6. थायरॉइड फंक्शन टेस्ट्स, कम्प्लीट हीमोग्राम : सौम्य अॅनिमिया आणि क्लिनिकल हायपोथायरॉयडिझम या बाबी कोणत्याही लक्षणांशिवाय होऊ शकतात. आपल्या रक्तातल्या हिमोग्लोबिनची पातळी आणि थायरॉइड प्रोफाइल माहिती असलं, तर लवकर निदान होण्यास आणि उपचारांसाठी मदत होते. साहजिकच त्यामुळे आयुष्य अधिक चांगलं जगता येतं.
तिशी हा आयुष्याचा असा टप्पा आहे, की जिथे हृदयाचा ताबा मन घेतं आणि प्रगल्भता येते. त्यामुळे जबाबदारीने राहा आणि आपले आरोग्य जपा!
(सूचना : या लेखात दिलेली माहिती आणि सूचना सामान्य माहितीवर आधारित आहेत. News 18 Marathi यांना दुजोरा देत नाही. यांची अंमलबजावणी करण्याआधी संबंधित तज्ज्ञाशी संपर्क करा.)
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Health, Health Tips, Lifestyle