मुंबई, 23 मार्च : एपिलेप्सी अर्थात अपस्मार हा एक मेंदूशी संबंधित आजार आहे. या आजारात पेशींद्वारे संदेश मिळूनही मेंदूतील अॅक्टिव्हिटींमध्ये अडथळा निर्माण होतो. इलेक्ट्रिक अॅक्टिव्हिटीमधील अचानक बदलामुळे एपिलेप्सीचा झटका येतो. एपिलेप्सीचा त्रास असणाऱ्या रुग्णाची काळजी कशी घ्यावी, अपस्माराचा झटका आला असता रुग्णाला कशी मदत करावी, या विषयी बेंगळुरू येथील अॅस्टर सीएमआय हॉस्पिटलमधील न्यूरॉलॉजी आणि एपिलेप्टॉलॉजी कन्सल्टंट डॉ. केनी रविश राजीव यांनी माहिती दिली आहे.
अपस्माराचा झटका आल्यास एखाद्या व्यक्तीमध्ये अवयव मुरगळणे, थरथरणे अशा प्रकारच्या अनावश्यक हालचाली दिसून येतात. या हालचाली काही मिनिटं टिकू शकतात. तसेच हा झटका आला असता रुग्ण एखाद्या व्यक्तीला विनाकारण टक लावून पाहतो. अपस्मार नेहमीच आणीबाणी निर्माण करणारा नसतो. मात्र हा झटका पाच मिनिटांपेक्षा जास्त काळ टिकल्यास व्यक्तीला वैद्यकीय मदतीची गरज भासू शकते.
एपिलेप्सीचा त्रास होणाऱ्या रुग्णाला असणारा संभाव्य धोका टाळण्यासाठी, त्याला वैद्यकीय मदत मिळण्याआधी रुग्णाच्या आसपासचे लोक तातडीने त्याच्यावर महत्त्वपूर्ण प्राथमिक उपचार करू शकतात.
एखाद्याला फेफरं आल्यास कशी मदत करावी?
अपस्मार झालेल्या रुग्णाला कोणत्याही प्रकारचा अपघात होऊ नये म्हणून तुम्ही खालील उपाय करू शकता-
- रुग्णाला मोकळा श्वास घेता यावा यासाठी मोकळी जागा तयार करा.
- रुग्णाला आराम वाटावा यासाठी त्याच्या शरीरातील घट्ट कपडे सैल करा.
- रुग्णाला इजा होऊ नये, यासाठी काच, आरसा, फर्निचर यासारख्या वस्तू त्याच्यापासून दूर ठेवा.
- झटका संपेपर्यंत रुग्णासोबत राहून त्याच्या मानेखाली सपोर्ट म्हणून उशी किंवा टॉवेल ठेवा.
- झटक्याच्या कालावधीकडे लक्ष ठेवा. डॉक्टरांना रुग्णाची स्थिती कळवा. अपस्माराचा सामान्य झटका 20 सेकंद ते 2 मिनिटांपर्यंत जाणवतो.
- रुग्णाच्या नातेवाईकांना याबाबत तातडीने कळवण्यासाठी त्याच्या बॅग किंवा वॉलेटमध्ये आपत्कालीन संपर्क क्रमांक आहेत का हे तपासा.
- रुग्णाच्या जबड्यामध्ये काहीही ठेवू नका. तसेच रुग्ण पूर्णपणे बरा होईपर्यंत त्याला काहीही पिण्यास देऊ नका.
- झटका आलेल्या रुग्णाच्या हालचाली थांबल्या की त्याला एका बाजूला वळवा आणि एअर-वे सुरळीत करण्याचा प्रयत्न करा. ही स्टेप काहीशी गंभीर असते, कारण अपस्माराचा झटका आल्यावर रुग्णाची जीभ मागं सरकते तसेच त्याचा श्वास रोखला जातो. त्यामुळे रुग्णाला एका बाजूला वळवावे आणि त्याचा जबडा पुढच्या दिशेने ठेवण्याचा प्रयत्न करावा.यामुळे त्याचा श्वासोच्छवास योग्य प्रकारे होण्यास मदत होईल. झटका आल्यानंतर त्याच्या तोंडातून अन्न किंवा उलटी बाहेर पडली पाहिजे.
डॉक्टरांशी केव्हा संपर्क करावा?
अपस्माराची लक्षणं सौम्य ते गंभीर स्वरुपाची असू शकतात. तथापि, ही लक्षणं काही मिनिटांत कमी होतात. ही लक्षणं पाच मिनिटांपेक्षा जास्त काळ टिकल्याचे दिसून आल्यास तुम्ही खालील लक्षणांची अंदाज घेत रुग्णवाहिकेला कॉल करू शकता.
- जर रुग्णाला दुसरा झटका येत असेल तर तातडीने रुग्णवाहिकेला कॉल करावा.
- झटक्यानंतर रुग्ण कोणताही प्रतिसाद देत नसेल तर.
- अपस्माराच्या झटक्यानंतर रुग्णाला खूप ताप येत असेल किंवा उष्मा, थकवा जाणवत असेल.
डायबेटिसचे रुग्ण किंवा गरोदर स्त्रियांसाठी असा झटका असुरक्षित ठरू शकतो. जर तुम्हाला असा कोणताही रुग्ण आढळला तर तुम्ही त्याला तातडीने जवळच्या रुग्णालयात दाखल करावे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Health, Health Tips, Lifestyle