मुंबई, 27 मार्च : विज्ञानाच्या प्रगतीमुळे वैद्यकीय क्षेत्रामध्ये काही महत्त्वाच्या सुधारणा झाल्या, काही महत्त्वपूर्ण शोध लागले. गर्भनिरोधक पद्धती हा त्यापैकी एक महत्त्वाचा शोध. वाढत्या लोकसंख्येवर नियंत्रण आणण्यासाठी त्याचा खूप उपयोग झाला. नको असलेली गर्भधारणा टाळण्यासाठी काही उपचार व पद्धती अंगीकारल्या जातात. आज पुरुष व स्त्रिया दोन्हींसाठी विविध गर्भनिरोधक पद्धती उपलब्ध आहेत.
नसबंदी किंवा गर्भनिरोधक शस्त्रक्रिया ही कुटुंब नियोजनाची प्रभावी पद्धत आहे; मात्र त्यात पुन्हा मागे फिरणं शक्य नसतं. यात स्त्रियांच्या शरीरातल्या बीजवाहक नलिका बंद केल्या जातात. त्यामुळे बीज व शुक्राणूंचं मीलन होऊ शकत नाही. ट्युबेक्टॉमी अर्थात गर्भधारणा कायमस्वरूपी टाळण्याच्या या प्रक्रियेबाबत काही गैरसमज आहेत; मात्र ती सुरक्षित पद्धत असून त्याबाबत योग्य माहिती जाणून घेण्यासाठी स्त्रीरोग तज्ज्ञांची मदत घेतली पाहिजे.
हॉर्मोन्सद्वारे गर्भनिरोध करण्याच्या पद्धतीमध्ये तोंडाद्वारे घेण्याच्या गोळ्या, इंजेक्शन्स, पॅचेस, त्वचेच्या आत रोपण, इन्ट्रायुटेराइन उपकरणं आणि व्हजायनल रिंग यांचा समावेश होतो.
गर्भनिरोधक गोळ्या दोन प्रकारच्या असतात. एका प्रकारच्या गोळ्यांमध्ये प्रोजेस्टीन आणि इस्ट्रोजेन या दोन्ही हॉर्मोन्सचा समावेश असतो, तर दुसऱ्या गोळ्यांमध्ये केवळ प्रोजेस्टेरॉन असतं. त्याला काही वेळा मिनी पिल्स असंही म्हटलं जातं. यात ओव्ह्युलेशन रोखून आणि सर्व्हायकल म्युकसला घट्ट करून जीवनिर्मितीला प्रतिबंध केला जातो. दोन्ही हॉर्मोन्स असलेल्या गोळ्यांमुळे शिरा व धमन्यांमध्ये रक्ताच्या गुठळ्या होण्याचा धोका असतो. त्यामुळेच अशा गोळ्या घेण्याआधी स्त्रीरोगतज्ज्ञांचा सल्ला घेणं जरूरीचं असतं. प्रोजेस्टीनच्या गोळ्या, इंजेक्शन्स किंवा इन्ट्रायुटेराइन उपकरणांमुळे रक्ताच्या गुठळ्या होण्याची शक्यता नसते. स्तनपान देणाऱ्या माताही या गोळ्या घेऊ शकतात. त्याचा दूधनिर्मितीवर कोणताही परिणाम होत नाही; मात्र या गोळ्यांमुळे अनियमित रक्तस्राव होऊ शकतो.
इतर काही गर्भनिरोधक पद्धतींमध्ये शुक्राणूंना शरीरात प्रवेश करण्यापासून रोखणाऱ्या काही उपकरणांचा समावेश होतो. त्यात पुरुषांचे कंडोम व शुक्राणूनाशक असलेले स्त्रियांचे कंडोम यांचा समावेश होतो. या पद्धतीमुळे एचआयव्ही/एड्स सारख्या लैंगिक संबंधांतून निर्माण होणाऱ्या आजारांना प्रतिबंध करता येतो.
इंट्रायुटेराइनन उपकरणं (IUD) छोटी व ‘T’ आकाराची, तसंच तांब्यापासून बनवलेली किंवा प्रोजेस्टीन हॉर्मोन असलेली असतात. ते गर्भाशयात घातलं जातं. ही पद्धत खूप प्रभावी व कधीही बदलता येण्यासाठी असते. ती काढून टाकली, की पुन्हा प्रजननक्षमता पूर्ववत होते.
गर्भनिरोधक पद्धतींमध्ये काही अशा गोळ्या आहेत, ज्याला मॉर्निंग पिल्स किंवा आफ्टर पिल्स म्हटलं जातं. तसंच काही उपकरणंही आहेत, ज्यांचा वापर असुरक्षित शारीरिक संबंध आल्यानंतर गर्भधारणा टाळण्यासाठी केला जातो. त्यांचा वापर केवळ आपत्कालीन प्रसंगातच केला जातो. त्यात खूप जास्त प्रमाणात हॉर्मोन्स असल्यानं त्यांचा वापर नेहमी करू नये; मात्र या गर्भनिरोधकांचा वापर करूनही काही वेळा गर्भधारणा होऊ शकते.
स्त्रीरोगतज्ज्ञांशी चर्चा करून तुमच्या आरोग्यासाठी योग्य व तुमची गरज ओळखून मगच गर्भनिरोधक पद्धतींचा अवलंब करावा.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Health, Health Tips, Lifestyle