पावसाळ्यात होणाऱ्या 'या' 5 आजारांची अशी घ्या काळजी

पावसाळ्यात कावीळ, लेप्टोस्पायरोसिस, कॉलरा, मलेरिया, डेंग्यू या आजारांचा धोका संभवतो

News18 Lokmat | Updated On: Jun 18, 2019 04:00 PM IST

पावसाळ्यात होणाऱ्या 'या' 5 आजारांची अशी घ्या काळजी

मुंबई, 18 जून : पावसाळा सुरू होताच वातावरणातील बदलामुळे डेंग्यू, मलेरिया, कॉलरा, लेप्टोस्पायरोसिस, हिपेटायटीस या पाच आजारांचा जास्त धोका संभवतो. या आजारांचा सामना करताना अनेकांचा अर्धा जीव टांगणीला लागतो. आज आम्ही तुम्हाला या आजारांची लक्षणं, ते होऊ नेयेत म्हणून घ्यायची खबरदारी आणि झालेच तर काय काळजी घ्यायला हवी हे सांगणार आहोत.

हिपेटायटीस (कावीळ) - हा संसर्गजन्य आजार विषाणूमुळे पसरतो. हा विषाणू पाण्यातून पसरतो. बाधित विष्टेमुळे दूषित झालेलं अन्‍न किंवा पाण्यामुळे हा आजार संभवतो. कावीळ झाल्यामुळे डोळे आणि त्वचा पिवळी पडते. लघवीचा रंगसुद्धा गडद पिवळा असतो. पोटदुखी, भूक मंदावणे, अन्‍नावरील इच्छाच उडणे, ताप, डायरिआ आणि अशक्‍तपणा जाणवतो. खबरदारी म्हणून स्वच्छ पाणी प्यावं आणि सकस आहार घ्यावा. कावीळ झालेल्या रुग्णाचे लक्षणं पाहून त्याची उपचार ठरवले जातात. यासाठी एक विशिष्ठ उपचारपद्धती आहे. हा आजार वाढू नये म्हणून सुरुवातीलाच डॉक्टरांचा सल्ला घेणं फायद्याचं ठरतं.

पावसाळ्यात घ्या तब्येतीची काळजी! आहारात खा 'हे' पदार्थ

लेप्टोस्पायरोसिस - नाक, कान, तोडं, डोळे किंवा त्वचेचा कुठलाही कापलेला भाग प्राण्यांच्या मल-मुत्राशी संपर्क झाला, तर लेप्टोस्पायरोसिस हा भयानक आजार उद्भवतो. डोकेदुखी, स्नायूतील वेदना, फुफ्फुसात रक्‍तस्त्राव, मेंदूदाह किंवा कोणतिही लक्षणं दिसून न येणे ही या रोगाची प्रमुख लक्षणं आहगेत. त्यामुळे खबरदारी म्हणून प्राण्यांचं मलमूत्र असलेल्या दूषित पाण्याशी संपर्क टाळावा. निदान झाल्यावर डॉक्टरांच्या सल्ल्याने विशिष्ट प्रतिजैविके घ्यावीत.

मलेरिया - मलेरिया हा आजार अ‍ॅनोफेलस जातीच्या मादी डासामुळे होतो. पावसाळ्यात ठिकठिकाणी साचलेल्या पाण्यात आणि डबक्यांमध्ये या डासांची उत्पत्ती होते. थंडी वाजून ताप येणं, अंगदुखी ही या लक्षणं आहेत. उपचार वेळेवर झाले नाहीत तर प्रचंड अशक्‍तपणामुळे रुग्णाचं यकृत आणि मूत्रपिंड निकामी होण्याची शक्यता असते. खबरदारी म्हणून तुम्ही जीथे राहता त्या भागात पावसाचं पाणी साचणार नाही आणि त्यात डासांची उत्पत्ती होणार नाही याची काळजी घ्यायला हवी. रात्री झोपताना मच्छरदाणी किंवा डास घालविणारे रिपलन्ट वापरावे. मलेरियाचं निदान झाल्यानंतर डॉक्टरांच्या सल्ल्याप्रमाणे औषधं सुरू करावी.

कॉलरा - अस्वच्छतेमुळे हा आजार पसरतो. मुख्यत्वे दुषित पाणी प्यायल्याने किंवा दुषित अन्न खाल्ल्यामुळे हा आजार होतो. कॉलरा झालेल्या रुग्णाला जास्त प्रमाणात जुलाब आणि उलट्या होतात. परिणामी रुग्णाच्या शरीरातलं पाण्याचं प्रमाण झपाट्यानं कमी होतं. कॉलरा होऊ नये म्हणून स्वच्छतेची काळजी घ्यायला हवी. अन्‍नपदार्थ स्वच्छ धुवून आणि शिजवून खाणं महत्त्वाचं. कच्चं किंवा अर्धवट शिजवलेले अन्नपदार्थ खायचं टाळा. पावसाळ्यात शक्यतो फिल्टरचं किंवा उकळून थंड केलेलं पाणीच प्या. कॉलरा झालेल्या रुग्णाच्या शरीरातलं पाण्याचं प्रमाण कमी होऊ  नये म्हणून जास्तीत जास्त पाणी, फळांचा रस असे द्रव पदार्थ सेवन करावे. जास्त उलट्या आणि जुलाब होत असतील तर रुग्णाला तात्काळ रुग्णालयात दाखल करावं.

वातावरण बदलामुळे सर्दी, खोकला झालाय का? करा 'हे' 8 घरगुती उपाय

डेंग्यू : पहाटेच्या वेळी चावणाऱ्या डासांमुळे डेंग्यू हा आजार पसरतो. डेंग्यूची लक्षणं म्हणजे खूप ताप येतो आणि रुग्णाचं सतत डोकं दुखतं, तापामुळे अंगावर पुरळ येतात. सांधे आणि स्नायूंमध्ये वेदना होतात. पोटदुखी, रक्‍तस्त्राव आणि चक्‍कर येणे अशी लक्षणे या आजारात संभवतात. हा आजार होऊ नये म्हणून झोपताना संपूर्ण अंग झाकलं जाईल असे सुती कपडे घालावे. मच्छरदानी किंवा मॉस्कीटो रिपलंट क्रीम सुद्धा तुम्ही वापरू शकता. जर डेंग्यू झालाच तर रुग्णाने भरपूर प्रमाणत पाणी प्यावं. हा आजार बरा करण्यासठी अद्याप विशिष्ठ उपचार पद्धती अस्तित्वात नाही. लक्षणं बघूनच त्याचं निदान केलं जाऊ शकतं.


बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags: health
First Published: Jun 18, 2019 03:49 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...

Live TV

News18 Lokmat
close