भटक्या कुत्र्यांना खाऊ घालणाऱ्या कुटुंबाला ठेवलं ओलीस, त्यांना अन्न देण्याबाबत काय सांगतो कायदा?

भटक्या कुत्र्यांना खाऊ घालणाऱ्या कुटुंबाला ठेवलं ओलीस, त्यांना अन्न देण्याबाबत काय सांगतो कायदा?

एका श्वानप्रेमी व्यक्लीला त्याची तीन वर्षाची चिमुरडी आणि त्याच्या पत्नीसह कारमध्येच ओलीस ठेवण्याचा धक्कादायक प्रसंगाला सामोरं जावं लागलं.

  • Share this:

गुरुग्राम, 03 मार्च: भटकी कुत्री ही अनेक शहरांतील मोठी समस्या आहे. अनेकजण या कुत्र्यांना रस्त्यांवरच खायला घालतात. अन्न मिळत असल्याने ती कुत्री त्याच परिसरात राहतात आणि त्याचा अनेकदा त्या परिसरातील लोकांना त्रास होतो. अशा एका श्वानप्रेमी व्यक्तीला खूपच भयंकर प्रसंगाला सामोरं जावं लागलं. गुरुग्रामच्या सेक्टर 83 मध्ये वाटिका 21 ही हाउसिंग सोसायटीमध्ये ही घटना घडली आहे. तिथं राहणाऱ्या हा श्वानप्रेमी कुटुंबाला सोसायटीतील रहिवाशांनी ओलीस धरलं आहे. ही व्यक्ती त्याची पत्नी आणि तीन वर्षांची मुलगी भटक्या कुत्र्यांना अन्न देतात आणि त्यामुळे ती कुत्री त्याठिकाणी येऊन लहान मुलांना चावतात, अशा या रहिवाशांचा आरोप आहे.

सोमवारी रात्री हा श्वानप्रेमी इसम, त्याची बायको आणि तीन वर्षांची मुलगी कारने परत आले. तेव्हा सोसायटीतील इतर रहिवाशांनी त्याच्या कारला घेराव घातला आणि त्यांना कारमधून बाहेरच येऊन दिलं नाही. याचा व्हिडीओही व्हायरल झाला असून त्यात लोक ‘बाहर निकालो कुत्ते को’ अशी घोषणा देताना दिसत आहेत.

भटकी कुत्री याआधी सोसायटीतल्या लहान मुलांना चावली आहेत त्यामुळे त्यांच्यापासून सोसायटीला धोका आहे असा दावा या रहिवाशांनी केल्याचं एनडीटीव्हीच्या बातमीत म्हटलं आहे. काही दिवसांपूर्वीच एका भटक्या कुत्र्याने एका रहिवाशालाही चावा घेतला होता, त्यामुळे लोक अधिकच संतापले होते.

ज्या कुटुंबाला ओलीस धरण्यास आलं होतं त्यांनी त्यावेळी फेसबुक लाइव्ह करत त्यांची परिस्थिती मांडली होती. त्यांच्या आजुबाजूला साधारण 100 जणांचा घोळका होता, ज्यामुळे त्यांची तीन वर्षांची चिमुरडी घाबरली होती.

(हे वाचा-पार्लरमध्ये चेहऱ्याची लागली वाट; कुणाचा चेहरा भाजला तर कुणाची त्वचा काळी पडली)

या कुटुंबाला ओलीस धरल्यानंतर कुणीतरी पोलिसांना बोलवल्यामुळे परिस्थिती नियंत्रणात आली. या प्रकरणी कोणतीही तक्रार नोंदवण्यात आलेली नाही अशी माहिती द इंडियन एक्सप्रेसच्या बातमीत दिली आहे. पण या घटनेनंतर भटक्या कुत्र्यांना अन्न देणं हा कायद्याने गुन्हा आहे का? हा प्रश्न पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. तसं नसेल तर प्राणीप्रेमींनी कुत्र्यांना खायला घातल्यावर विरोधकांकडून हल्ला झाला तर त्यांनी काय पवित्रा घ्यायचा?

2011 मध्ये दिल्ली उच्च न्यायालयाने एका आदेशाद्वारे भटक्या कुत्र्यांना अन्न देणाऱ्यांवर काही कडक निर्बंध लादले आहेत. मीडिया अहवालानुसार हे सगळे निर्बंध भटक्या कुत्र्यांना अन्न देणाऱ्यांनी पायदळी तुडवले आहेत. संबंधित मार्गदर्शक तत्त्वांचे पालन होत असेल तरच कुत्र्यांना अन्न द्यायला परवानगी आहे.

(हे वाचा-आता 'या' वेळेत घेता येणार कोरोना लस; मोदी सरकारकडून सर्वसामान्यांना मोठा दिलासा)

2014 मध्ये द अनिमल वेलफेअर बोर्ड ऑफ इंडियाने एक सर्क्युलर काढलं होतं त्यात म्हटलं होतं की भटक्या कुत्र्यांना अन्न देणाऱ्यांविरुद्ध कोणताही कायदा भारतात अस्तित्वात नाही, असंही इंडियन एक्सप्रेसच्या बातमीत म्हटलं आहे.

24 फेब्रुवारी 2014 च्या या सर्क्युलरमध्ये म्हटलंय,‘ भटक्या प्राण्यांना अन्न पदार्थ देऊ नयेत असा कोणताही कायदा भारतात नाही. जे या भटक्या प्राण्यांना अन्न देतात ते उलट भारतीय संविधानाने घालून दिलेल्या सर्व प्राणीमात्रांबद्दल दया दाखवण्याच्या कर्तव्याचं पालनच करतात. कुत्र्यांना खाद्य दिल्यामुळे (त्यांना पकडणं महानगरपालिकेला सोपं जातं) त्यांचा जननदर नियंत्रणात ठेवणं सोपं होतं, मानव-प्राणी संघर्ष कमी होतो अशी कारणं देत देशातील अनेक उच्च आणि कनिष्ठ न्यायालयांनीही कुत्र्यांना रस्त्यांवर खाद्य देण्याच्या कृतीला पाठिंबाच दिला आहे.’

त्यात असंही म्हटलंय की भटक्या कुत्र्यांना मारणं आणि त्यांच्यात दहशत निर्माण करणं याला परवानगी नाही त्यामुळे त्यांचा जननदर कमी करण्यासाठी स्टरिलायझेशन हाच पर्याय उपलब्ध आहे. त्यानंतर त्यांना त्यांच्या परिसरात सोडून दिलं जातं.

दिल्ली उच्च न्यायालयाने 2011 मध्ये दिलेल्या आदेशाला धरूनच एडब्ल्युबीआयने सर्क्युलर काढलं आहे. न्यायालयाने घालून दिलेल्या निर्बंधांचं पालन करूनच भटक्या कुत्र्यांना अन्न द्यायला परवनागी देण्यात आली आहे.

जरी न्यायालयाने सार्वजनिक ठिकाणी कुत्र्यांना अन्न द्यायला परवनगी दिली असली तरीही श्वानप्रेमींनी गर्दीच्या ठिकाणी कुत्र्यांना अन्न देऊ नये असंही स्पष्ट केलं आहे. यामध्ये सार्वजनिक रस्ते, फुटपाथ, पादचारी मार्ग, सार्वजनिक कॉजवे, सोसायटीतील घरांच्या बाहेरचा परिसर, सोसायटी आणि अपार्टमेंटची प्रवेशद्वारं या सगळ्या ठिकाणांचा समावेश होतो. जेव्हा त्या परिसरात कमी गर्दी आणि रहदारी असेल अशाच वेळी कुत्र्यांना खायला द्यायला परवानगी आहे.

गुरुग्राममध्ये कुटुंबाला ओलीस ठेवून त्यांना धमकावण्याचा घडलेला प्रकार हा यावरील उपाय नाही. पण गेल्या काही वर्षांत दिल्लीतील कुत्र्यांनी चावण्याच्या प्रकारांमध्ये झालेल्या वाढीचा आकडा पाहता हा प्रश्न पुन्हा समोर येतोच की भटक्या कुत्र्यांच्या नियंत्रण आणि देखभालीसाठी कोण जबाबदार आहे?

टाइम्स ऑफ इंडियात ऑगस्ट 2020 मध्ये छापून आलेल्या बातमीनुसार 2017 पासून दिल्लीत दररोज सुमारे 120 जणांना कुत्रे चावा घेतात. तेव्हापासून यावर उपचार करून घेतलेल्यांची संख्या 1.5 लाख आहे. एक दशक आधी म्हणजे 2009 मध्ये भटक्या कुत्र्यांची संख्या मोजण्यात आली होती.

First published: March 4, 2021, 7:18 AM IST

ताज्या बातम्या