Home /News /lifestyle /

धुम्रपान करण्याची वयोमर्यादा 21 होण्याची शक्यता, सार्वजनिक ठिकाणी सिगरेट ओढणेही पडेल महागात

धुम्रपान करण्याची वयोमर्यादा 21 होण्याची शक्यता, सार्वजनिक ठिकाणी सिगरेट ओढणेही पडेल महागात

धुम्रपानासंदर्भातील काही नियम कठोर करण्याच्या विचारात केंद्र सरकार आहे. यासंदर्भात लवकरच महत्त्वाचे निर्णय घेण्यात येतील

    नवी दिल्ली, 07 जानेवारी: धुम्रपानासंदर्भातील काही नियम कठोर करण्याच्या विचारात केंद्र सरकार आहे. यासंदर्भात लवकरच महत्त्वाचे निर्णय घेण्यात येती. सिगरेट आणि तंबाखूजन्य उत्पादनांच्या वापरासाठी सध्या 18 ही किमान वयोमर्यादा आहे ती वाढवून 21 करण्यासंबंधी एक कायदा करण्याची केंद्र सरकारची तयारी सुरू आहे. त्यासंबंधी विधेयकाचा मसुदा तयार झाला आहे. यात किरकोळ किंवा सुटी मिळणारी सिगरेट याची विक्री बंद करणं, रेस्टॉरंट आणि विमानतळांवरील धुम्रपानासाठी असणाऱ्या रूमवर बंदी आणि सार्वजनिक ठिकाणी सिगरेट ओढण्यावर मोठा दंड आकारण्यासंबंधीचा प्रस्ताव समाविष्ट आहे. सरकारने सिगरेट आणि इतर तंबाखूजन्य उत्पादनं (जाहिरात आणि व्यापार तसंच वाणिज्य, उत्पादन, पूर्तता व वितरण निषेध) सुधारणा विधेयक, 2020 चा मसुदा तयार केला आहे. प्रमुख सुधारणा कलम 6 (A) अंतर्गत आहेत,  धुम्रपान करण्यासाठी कायद्याने ठरवलेलं वय 21 वर्षे केलं जाईल. या नव्या सुधारणेनुसार 21 वर्षांपेक्षा कमी वयाच्या कुठल्याही व्यक्तीने धुम्रपान किंवा अन्य तंबाखूजन्य पदार्थाचं सेवन करणं किंवा एखाद्या व्यक्तीकडून शैक्षणिक संस्थेच्या 100 मीटर परिघातील परिसरात सिगरेट किंवा तंबाखूजन्य उत्पादनांची विक्री करणं किंवा तसा प्रस्ताव देणं हे पण बेकायदेशीर ठरवण्यात आलं आहे. (हे वाचा-जगातल्या टॉप 10 Vaccine Women; दोन भारतीय स्त्रियाही आहेत कोरोना लशीत अग्रणी) सुट्टी सिगरेट विकण्याबाबतचा नियम बदलेल कलम 7 अंतर्गत अशी सुधारणा केली जात आहे की, कोणत्याही सिगरेट किंवा तंबाखूजन्य उत्पादनाचा व्यापार आणि विक्री ही अधिकृत सील, परवानगी आणि मूळ पॅकेजिंगमध्ये असतानाच केली जावी. म्हणजे या उत्पादनांची किंवा सिगरेटची किरकोळ (पाकिट फोडून आतील सिगरेट वेगळ्या विकणं) विक्री करण्यावर बंदी घालण्यात यावी अशी सुधारणा या विधेयकाच्या मसुद्यात आहे. (हे वाचा-कोरोना लशीसाठी माध्यम असलेलं Cowin नेमकं आहे तरी कसं; 10 वैशिष्ट्यं) कायदेशीर निश्चित वयापेक्षा कमी वयाची व्यक्ती सिगरेट आणि तंबाखूजन्य उत्पादनांची विक्री करताना आढळून आली तर त्याला करण्यात येणाऱ्या दंडाची रक्कम वाढवण्याचा प्रस्ताव आहे. यातील दोषीला दोन वर्षे तुरुंगवास आणि 1 हजार रुपये दंडापासून सात वर्षं तुरुंगवास आणि 1 लाख रुपये दंडापर्यंतची तरतूद करावी असं या मसुद्यात म्हटलं आहे. बेकायदेशीरपणे सिगरेट, तंबाखूजन्य उत्पादनांचं उत्पादन करणं  आणि विक्री करणं यासाठी 1 वर्षांचा तुरुंगवास आणि 50 हजार रुपये दंड होऊ शकतो. बेकायदेशीररित्या सिगरेट तयार करणाऱ्याला दोन वर्षांचा तुरुंगवास आणि 1 लाख रुपयांचा दंड होऊ शकतो. बंदी असलेल्या क्षेत्रात धूम्रपान केल्यास दंड 200 रुपयांवरून वाढवून 2 हजार रुपये होऊ शकतो.
    Published by:Janhavi Bhatkar
    First published:

    Tags: Smoking

    पुढील बातम्या