नवी दिल्ली, 13 डिसेंबर : पृथ्वीवरचे प्राणी नष्ट होण्याचं काही चक्र असतं का? एका ठराविक काळानंतर पृथ्वीवरच्या प्राण्यांना महाविनाशाला सामोरं जावं लागतं का? अलीकडेच झालेल्या एका संशोधनात या गोष्टीकडे लक्ष वेधण्यात आलं आहे.
अवकाशात फिरणाऱ्या लघुग्रहांची (Asteroids) पृथ्वीशी टक्कर होणं किंवा विशाल ज्वालामुखीचा उद्रेक (Volcanic Eruptions) आदींच्या चक्राशी प्राण्यांच्या महाविनाशाचा (Mass Extinction) संबंध असल्याचं या संशोधनातून पुढे येतं आहे.
जमिनीवर राहणारे प्राणी (त्यात उभयचर, सस्तन प्राणी, सरपटणारे प्राणी, तसंच पक्षी आदींचा समावेश) 270 लाख वर्षांच्या एका चक्राला सामोरं जातात. त्याचा संबंध त्याआधी महासागरात झालेल्या महाविनाशाशी असतो. ‘हिस्टॉरिकल बायोलॉजी जर्नल’मध्ये या संशोधनाबद्दलचा लेख प्रसिद्ध झाला आहे.
या विनाशाला कारणीभूत ठरलेला लाव्हाचा उद्रेक किंवा लघुग्रहाची टक्कर यांची कारणं मिळतीजुळती वाटतात. या संशोधनाचे प्रमुख लेखक, तसंच न्यूयॉर्क युनिव्हर्सिटीच्या (New York University) बायोलॉजी (Biology) विभागाचे प्राध्यापक मायकेल रॅम्पिनो यांनी सांगितलं, ‘दर 270 लाख वर्षांच्या अंतराने लघुग्रहांची टक्कर आणि लाव्हाचा उद्रेक आदी गोष्टी घडत असल्यासारखं वाटत आहे. आपल्या आकाशगंगेच्या कक्षेद्वारे या बाबीत गतिमान होत असाव्यात, असा अंदाज आहे.’
660 लाख वर्षांपूर्वी जमीन आणि महासागरातले 70 टक्के प्राणी नष्ट झाले. त्यातच डायनोसॉरचा (Dinosaur) समावेश आहे. मोठ्या आकाराचा लघुग्रह किंवा धूमकेतूची पृथ्वीशी झालेली टक्कर हे त्यामागचं कारण होतं. जीवाश्मविषयक संशोधकांनी केलेल्या अभ्यासातून असं लक्षात आलं आहे, की महासागरांमध्ये झालेल्या महाविनाशकारी घटनांमध्ये 90 टक्के प्रजाती (Species) नष्ट झाल्या; मात्र त्या घटना अचानक केव्हाही घडत नव्हत्या, तर दर 260 लाख वर्षांच्या चक्राने त्या घटना घडत होत्या.
रॅम्पिनो यांच्यासह ‘जो कार्नेगी इन्स्टिट्यूशन फॉर सायन्स’चे केन काल्डेरिया आणि न्यूयॉर्क युनिव्हर्सिटीच्या ‘सेंटर फॉर डेटा सायन्स’चे यूहोंग झू यांनी महाविनाशाच्या जुन्या नोंदी अभ्यासल्या. त्यातून त्यांच्या असं लक्षात आलं, की पृथ्वीवरचे महाविनाश महासागरातल्या महाविनाशासोबत झाले होते. जमिनीवरील प्राण्यांच्या प्रजाती नामशेष होण्याच्या घटनांचं सांख्यिकीय विश्लेषण नव्यानं करण्यात आलं. त्यात त्यांच्या असं लक्षात आलं, की या घटना 275 लाख वर्षांनंतर घडत आहेत.
यावरून पुढचा प्रश्न असा उपस्थित होतो, की जमीन आणि महासागर अशा दोन्ही ठिकाणी एका ठराविक काळानंतर होणाऱ्या या महाविनाशांचं (Mass Extinctions) कारण काय असेल? कारण केवळ महाविनाशच नव्हे, तर लघुग्रह आणि धूमकेतूच्या पृथ्वीशी झालेल्या टकरांमुळे तयार होणाऱ्या विवरांच्या निर्मितीमागेही असंच एक चक्र आहे.
खगोल-भौतिकशास्त्रज्ञांच्या (Astro Physicist) म्हणण्यानुसार, आपल्या सूर्यमालेत दर 260 ते 300 लाख वर्षांनी धूमकेतूचा वर्षाव होतो. त्यामुळे महाविनाश होतो. आपली पृथ्वी ज्याप्रमाणे सूर्याभोवती फिरते, त्याप्रमाणे आपली सौरमालाही मिल्की-वे आकाशगंगेभोवती (Milky Way Galaxy) दर तीन कोटी वर्षांनी फेरी मारते. त्यादरम्यान एकदा धूमकेतूचा वर्षाव होऊ शकतो. ते धूमकेतू पृथ्वीवर आदळू शकतात. त्यामुळे मोठ्या प्रमाणावर अंधार पसरणं, थंडी वाढणं, जंगलांमध्ये आगी लागणं, आम्लवर्षा होणं, ओझोनचा थर नष्ट होणं अशा कारणांमुळे जमीन आणि महासागरातलं जीवन नष्ट होऊ शकतं.
रॅम्पिनो यांनी सांगितलं, की या अभ्यासातून असं स्पष्ट झालं आहे, जमीन आणि महासागरात अचानक झालेले महाविनाश आणि दर 260 लाख वर्षांच्या एका चक्राशी त्याचा ताळमेळ असणं, या गोष्टीला पुष्टी देतं, की ठरावीक काळानंतर होणाऱ्या या घटना महाविनाशाला कारणीभूत ठरतात. गेल्या 25 कोटी वर्षांत तीन वेळा घडलेल्या अशा घटनांची माहिती आपल्याला आहे. त्या तिन्ही वेळा वैश्विक दुर्घटना घडल्या आणि महाविनाशही झाला होता.
केवळ लघुग्रह पृथ्वीवर आदळणं एवढं एकच महाविनाशाचं कारण नव्हतं, तर ज्वालामुखीच्या उद्रेकामुळे पसरलेल्या लाव्हारसामुळे पृथ्वीवर जीवसृष्टीसाठी फारच प्रतिकूल वातावरण निर्माण झालं होतं, असं शास्त्रज्ञांचं म्हणणं आहे.